

मी शाश्वत व चिरंतन काळासाठी जगणार नाही. मी सुध्दा एक दिवस या जगात राहणार नाही. पण आणखीन चार समजदार शहाणी झाडे याच टेकडीवर पुढंही वाढावीत म्हणून जग सोडून जाण्यापूर्वी, वंशवृध्दीसाठी बिया सोडण्याचं एकमेव उत्तरदायित्व आपलं आहे, याची जाणीव त्या चौथ्या झाडाला होती.
टेकडीवर चार झाडं होती. तीन उर्मट, उध्दट, गर्विष्ठ. आम्ही आणखीन मोठी व उंच होऊ या फुशारक्या ती मारायची. चौथं झाड हे सर्वार्थानं खरंच तृप्त व आतून कायम खूश असायचं. वर्षं सरली. तीन झाडं आणखीन सुंदर, रूबाबदार दिसू लागली. उंच वाढली. त्यांचं हरीत आवरण, फांद्या वाढल्या. आता आम्ही कायमचे इथंच राहणार, जगणार हा अहंकार त्यांना जडला. चौथं झाड इतरांपेक्षा सुंदर वा उंच नव्हतं, पण फक्त झाड राहण्यात त्याला खुशी होती.
एक दिवस आला लाकूडतोड्या. त्यानं तीनही उंच झाडं जमीनदोस्त केली. कापली. एकाचं लाकूड शहराच्या वेशीवर मुख्य द्वारासाठी वापरलं. दुसऱ्याचा वापर लढाऊ नौका बनवण्यास केला. तिसऱ्या झाडाच्या लाकडाचा वापर प्रार्थनागृहाच्या मुख्य द्वारासाठी केला. इतकं होऊनही तिघांची ऐट तशीच होती. मी इतरांपासून किती मोठ्या कार्यासाठी समिधा टाकत आहे, याचाच तोरा. सुंभ जळाला तरी अहंकाराचा पीळ तसाच होता. चौथं छोटं झाड सुंदर वा उंच नव्हतं पण फक्त झाड राहण्यात ते संतोषी होतं.
एक दिवस अचानक शेजारील सैन्यानं या राज्यावर केला हल्ला. मुख्य द्वाराची मोडतोड केली, तुकडे. हल्ल्यात ती महान युध्दनौका बंदरात बुडाली. आणि या गदारोळात ते प्रार्थनागृह मुख्य द्वारासह जळून खाक. चौथं झाड टेकडीवर आरामात आनंदात जगत होतं. त्याला समज व स्पष्टता होती. मी शाश्वत व चिरंतन काळासाठी जगणार नाही. मी सुध्दा एक दिवस या जगात राहणार नाही. पण आणखीन चार समजदार शहाणी झाडे याच टेकडीवर पुढंही वाढावीत म्हणून जग सोडून जाण्यापूर्वी, वंशवृध्दीसाठी बिया सोडण्याचं एकमेव उत्तरदायित्व आपलं आहे, याची जाणीव त्या चौथ्या झाडाला होती. या बांधिलकीचं पालन करण्याची जबाबदारी आपण पार पाडू, याचा आत्मविश्वास त्या झाडाला होता.
बोध घेऊ शकतो चौथ्या झाडाकडून.
डोक्यात जगभराचा नकारात्मक कचरा घेऊन फिरणारी खूप माणसे आहेत. त्यांच्या कपाळावरच्या आठ्या पाहून त्यावर इस्त्री मारावी असं वाटतं. हे लोक गोळा केलेला जगभराचा कचरा तुमच्यावर आमच्यावर शिंपडतात. म्हणून काळजी घेऊन दक्ष राहावं. आम्हांला तीन झाडांसारखं व्हायचं नाही. आम्हांला शांती हवी. ताप, संताप नको. आखाती युध्दावर चिंता करून काय साधणार? पेट्रोल दर वाढणार त्याची चिंता करून काय होणार? आग लागो त्या सगळ्या समस्यांना. अगोदर तुझं माझं डोकं शांत, थंड हवं. जगातील वाईट गोष्टी ठिकाणावर घालायला गेलो तर आमची चटणी बनून जाईल. अव्यवस्थितपणा हा जगाचा स्वभाव आहे. आपली भूमिका चोख बजावावी. अगदी प्रामाणिकपणे. आमचा स्वभाव चौथ्या झाडासारखा असावा. तोच चांगला.
जग म्हणजे वाळवंटासारखं. पुढं पुढं जात राहायचं. आहे ती फक्त वाळू. उन्हात तापलेली. प्रवासात बरोबर काही गोष्टी घ्यायला हव्यात. गरजेच्या. डोईजड नव्हे. तहान लागली तर प्यायला पाण्याच्या बाटल्या. रखरखीत उन्ह सगळीकडे असणार. तुला आराम करावासा वाटला, शीतल सावली पाहिजे असं वाटलं तर तू झाड तयार करणार काय? म्हणून आपल्यापुरता एक छोटासा तंबू दुमडून व्यवस्थित बरोबर असावा. एक चादर आराम करायला. झालं. जग-रूपी तप्त वाळवंटाच्या प्रवासात इतकंच पाहिजे. वाळवंटातील रखरखीत रेती ओली करण्याची क्षमता आणि सामर्थ्य आमच्या ठायी नाही. चौथ्या झाडानं शेजारच्या माजलेल्या तीन झाडांकडे, टोमण्यांकडे दुर्लक्ष करून निश्चिंतपणे जीवनाचं चवीने सेवन केलं. आनंद घेतला. चौथ्या झाडाच्या पक्वतेपासून बोध घेऊ.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.