

अलका दामले
Goa City Development : वास्कोच्या, किंबहुना संबंध गोवा आणि भारताच्या सौंदर्यीकरणाला नवी दिशा तेव्हाच मिळेल जेव्हा आम जनता लोकशाहीमधील आपली जबाबदारी ओळखून वागेल. तसेच कुठल्याही प्रकारचे विक्रेते, गाडावाले, दुकानदार, दुचाकी, चारचाकी ह्यांना फुटपाथ किंवा इतर ठिकाणी कुणी अतिक्रमण करणार नाही. तसेच राजकारणी, सरकारी अधिकारी हेही अनधिकृत अतिक्रमण करू देणार नाहीत. तसे ते होऊ नये याकडे डोळ्यांत तेल घालून लक्ष देतील.
आपली मानसिकताही बदलणं जरुरीचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे मला जसं पाहिजे तसं मी वागणार ही वृत्ती जबाबदारीच्या जाणिवेत बदलणं जरुरी आहे. त्यासाठी माझ्या कुठल्याही वागण्यामुळे दुसऱ्याला असुविधा होणार नाही ह्याची जाणीव करून देणारं असं आपलं शिक्षण हवं. माझं झालं की झालं, दुसऱ्याचे मला काय देणंघेणं ही वृत्ती बदलली पाहिजे.
जसं की एखादा आपली चारचाकी मागे काढत असला तर स्वत:ची गाडी कशी पुढे काढता येईल, हे न पाहता एक मिनिटभर थांबावं; कारण गाडी मागे काढणं हे जास्ती जिकिरीचे काम असते. पण कुठेही पाहा कुणालाही कुणासाठीही क्षणभर थांबायला वेळ नसतो. खरं तर पर्वा नसते. सतत ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ चालू असतं . केवळ स्वकेंद्रित वृत्ती. कचरा फेकणं, थुंकणं इथपासून ते कुठे साधी लाईन लावणं असो कुणीही शिस्त लावून घ्यायला तयार नाही.
केवळ बेपर्वाई, ‘सब कुछ चलता है’ ही मानसिकता. देशप्रेम वगैरे गोष्टींशी देणंघेणं फक्त १५ ऑगस्टसारख्या तत्सम दिवसापुरतेच. जग फिरल्यावर कळतं की आपला देश खरं तर प्रत्येक बाबतीत किती समृद्ध आहे; केवळ जनतेच्या बेशिस्त व बेजबाबदार वागण्यामुळे आपण अजूनही विकसित देशांच्या यादीत स्थान मिळवू शकत नाही.
भारत म्हणजे एक गलिच्छ, बजबजपुरी, अंदाधुंदी असलेला मागासलेला देश अशीच प्रतिक्रिया श्रीलंकेसारख्या देशातही मिळते तेव्हा खूप वाईट वाटतं. थोडक्यात सौंदर्यीकरणासाठी वास्कोला मिळालेले १३० कोटीच काय पण कितीही कोटी खर्च केले तरी जोपर्यंत आपण प्रत्येकजण स्वत:हून जबाबदार नागरिक म्हणून वागत नाही तोपर्यंत स्वच्छ, सुंदर, नितळ देश तर सोडाच पण छोटंसं वास्कोही होणं शक्य नाही.
बाकी ‘भ्रष्टाचारमुक्त देश’ वगैरे ते काय असतं हो? तेव्हा जे आपल्या हातात आहे ते तर आधी करूया. आशा धरूया आपण बदललो तर राजकारणी, सरकारी सेवक हेही बदलतील कारण ते ह्याच समाजातून घडत असतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.