Goa fishing: इज फिश कमिंग फ्रॉम स्काय? गोव्यातील मासे नष्ट होताहेत, अधिवासासाठी तडफडत आहेत

Traditional fishing in Goa: मानव शिकारी-संग्राहक जीवनशैलीतून कायमस्वरूपी वसाहतींच्या शैलीत जगताना अन्नाचा प्रमुख स्रोत मासेमारी होता.
Traditional fishing in Goa
Goa fishing CultureCanva
Published on
Updated on

विकास कांदोळकर

मासेमारी कला मानवी इतिहासाच्या अगदी सुरुवातीपासूनच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. ‘निअँडरथल्स’ सुमारे २००,००० वर्षांपूर्वी मासेमारी करत. ४०,००० वर्षे जुना आधुनिक मानव, ‘तियानयुआन’ला नियमितपणे गोड्या पाण्यातील मासे खाण्याची कला अवगत होती.

मानव शिकारी-संग्राहक जीवनशैलीतून कायमस्वरूपी वसाहतींच्या शैलीत जगताना अन्नाचा प्रमुख स्रोत मासेमारी होता. मासेमारी कला मानवाचा संयम, सर्जनशीलता आणि निसर्गाशी असलेल्या संबंधाची विविधांगी अभिव्यक्ती प्रदर्शित करते.

त्यात मासेमारीच्या अनेक पद्धती, मासे पकडण्याची दृश्ये, अनुभव, साहित्याच्या अंगातून चित्रण आणि मच्छीमार समुदायांच्या समृद्ध परंपरांचा समावेश होतो. मासेमार, माशांचे वर्तन, पाण्याच्या प्रवाह, पृष्ठभागावरील प्रकाश आणि सावलीच्या खेळातून नैसर्गिक जगाशी असलेल्या कलात्मकतेचे दर्शन घडते.

आमच्या लहानपणात मुलांना कितीतरी कला अवगत असल्यामुळे पैसे नसतानाही नैराश्याची किंवा उपाशी ‘मरण्याची’ मुळीच शक्यता नव्हती. मासे खाणाऱ्या जवळजवळ सर्वच ‘गोंयकारांना’ मासे पकडण्याचीही कला अवगत असे.

सर्वसामान्य जातीचे मासे पकडण्याबरोबरच ‘नाल्लो’, ‘रातोळी’, ‘अखरेक’, ‘मूतरो’, ‘काटयालो’, ‘काळुंदर’, ‘दिनोशी’, ‘खवळ’, ‘पोलार’, ‘मानमोडो’, ‘चोरबोटी’, ‘शेतुक’, ‘मुदडोशी’, ‘खर्चाणी’, ‘पेळो’, ‘पोटींग’, ‘शिवट’, ‘वागी’, ‘कुकू’, ‘करकारो’, ‘घुबर’, ‘वाटू’, ‘घूर’, ‘थिगूर’, ‘केर’, ‘मरल’, ‘शेंगट’, ‘कोंकारी’, ‘कोंमो’, ‘तोकी’, ‘रावस’, ‘भुयारी’, ‘मोतयांळे’, यासारखे स्वादिष्ट मासे तसेच ‘कोंगे’, ‘लाळे’, ‘माडयो’, ‘लाळये खूबे’, ‘घुलो’, इ. आम्ही ‘कडसरी’, ‘पाटो’, ‘येणी’, ‘कोबळें, ‘रामळ’, ‘घोळ’, ‘खून्ट’, ‘घूड’, ‘कॉण ढवळणे’, ‘चिरूक मारणे’, ‘तलवारबाजी’, ‘दीपावणे’, ‘दुबकणे’, ‘रांपणे’, ‘गरवणे’, ‘पागणे’, ‘कवां घालणे’, वगैरे प्रकारांतून, सुकती-भरती, अमावास्या-पौर्णिमा यांचा विचार करून, अचूकपणे पकडत असू.

रात्रीच्यावेळी मासेमारीला गेल्यानंतर आपली ‘राखण’ अढळ असलेले ‘कोणीतलो’, ‘बांनावयलो, ‘मानशेवयलो’, ‘शिमेवयलो’ देवचार करतात यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असे. मासे पकडल्यावर त्यांना पहिला मासा अर्पण करून मान दिला जात असे.

त्यांच्या ‘वाटेला’ जाणे म्हणजे संकटास आमंत्रण, असे स्थानिक समजत. काही वेडेवाकडे, ‘चाळागत’ झाल्यास गावचे पुरोहित-ब्राह्मण या ‘देवचारांना’ शरण जाण्यास भाग पाडत. (आता बाहेरच्या विद्वानांपाशी ‘राखणदारांनाच’ स्थलांतर करण्याची ‘अघोरी विद्या’ आहे.)

आजच्या पिढीला वर उल्लेखीत नावांचे ‘फॉरमेलीनरहित’ अस्सल गोव्यातील मासे पाहणे मुश्कील आहे. कारण आज गोव्यात, समुद्र-नदी-कालव्यातील जुगारी जहाजे, बेमालूम पर्यटनसफरी, रासायनिक सांडपाणी, महाकाय व्यापारी जहाजांचे सांडपाणी व त्यांच्या नांगरांमुळे समुद्रतळाची होणारी हानी, समुद्र आणि नदी-किनारे वापरण्यास मच्छीमारांऐवजी प्रदूषण फैलावणाऱ्या पर्यटकांना दिलेली मुभा, खाजन जमिनी पुरल्यामुळे माशांवरील संकट, पाणी प्रदूषणामुळे मासे खोलवर समुद्रात जाणे, गोव्याचे जलद शहरीकरण, अतिव्यावसायिक मासेमारी, अनियंत्रित आणि प्रदूषणयुक्त समुद्र-नदीतील वाहतूक व पर्यावरणीय र्‍हासामुळे, पारंपरिक मासेमारी कलाच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. माडांच्या ‘चुडतांच्या वळयानी’ ‘कांवा’ घालून किंवा लोखंडी हुक बनवून बिळातून खेकडे पकडण्याची कला इतिहासजमा झाली आहे.

गोव्यातील मासे आपल्या अधिवासासाठी तडफडत आहेत. नद्यांच्या खाजगीकरणांमुळे परिस्थिती आणखी बिकट होतेय. राज्यकर्ते, ग्रामपंचायत, पीडबलूडी, विद्युत, महसूलसारखी सरकारी खाती व अधिकारी, स्थानिकांच्या खाजगी जमिनी गैरमार्गांनी लुटून, माशांचा अधिवास नष्ट करण्यात अग्रेसर आहेत.

Traditional fishing in Goa
Goa Fish Festival: महोत्सव झाला, कचरा साठला! फिश फेस्टिव्हलनंतर रिकाम्या बाटल्या, घाणीचे साम्राज्य; व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न

उदाहरणार्थ तुये-पेडणे येथील इलेक्ट्रॉनिक-सिटीच्या डोंगरावरील जागेत पावसाळ्यात मासे येण्याचे गोव्यातील एकमेव ठिकाण आहे. सदर जागा ‘संवर्धित’ ठिकाण म्हणून सांभाळणे गोवा सरकारचे कर्तव्य होते. जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार दिल्यानंतर त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देताच ‘ज्ञानाअभावी’ त्यांनी तक्रारदाराला ‘इज फिश कमिंग फ्रॉम स्काय?’ असा प्रश्न विचारून त्याची खिल्ली उडवून तपासकामाचा धुव्वा उडवला. विकासकामामुळे डोंगरावर मासे येणे बंद झाले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना भलतेच वळण देऊन मूळ प्रश्नच गायब करण्याचे प्रकार घडतात. तक्रार केल्याशिवाय खाजन-जमिनी, रेतीउपसा, बेसुमार पर्यटन, प्रदूषण यांसारख्या बाबींवर अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे, गोव्यात मुबलक असणारे मासे आज दिसेनासे होऊन, माशांच्या कित्येक जाती नामशेष झाल्या आहेत. जमीनदारांकडून ना हरकत दाखला घेऊन बनवलेली किनाऱ्यांवरील सार्वजनिक गणपती विसर्जन स्थळे, भविष्यातील नद्यांच्या खाजगी मालकांचे, सागरी मार्गातील दळणवळणाचे ‘एक्सेस पॉइंट’ होऊन, स्थानिक मासेमारी हद्दपार झाल्यास नवल नाही.

Traditional fishing in Goa
Goa Fishing: 'गोव्यात घुसलेल्या बेकायदेशीर बोटी आम्ही पकडल्या, आमच्या सुरक्षेचे काय? आमचा संयम संपतोय!' मच्छीमारांचा इशारा

पोर्तुगीज काळाच्या पूर्वीपासून ‘खाऊन पिऊन सुखी’ अशी जीवनाची व्याख्या असणाऱ्या ‘आत्मनिर्भर गोंयकारांचा’ सत्यानाश पंधरा वर्षांच्या ‘दाखलाधारक’ गोवेकरांना कळणे शक्यच नाही. गोव्यातील निसर्गाचा र्‍हास फक्त ‘नीज गोंयकार’च थांबवू शकतो. पण हा ‘नीज गोंयकार’ कसा ओळखावा? साधे ‘पिढीजात’ गणित. दोन पिढ्यातील अंतर सर्वसाधारणपणे तीस वर्षे धरूया. गोवा मुक्त झाला त्या १९६१साली ज्याचे वडील ‘गोंयकार’ त्याचा मुलगा ‘गोंयकार’! १९९१साली ज्याचा आजोबा ‘गोंयकार’ त्याचा नातू ‘गोंयकार’ आणि २०२१ साली ज्याचा पणजोबा ‘गोंयकार’ त्याचा पणतू ‘गोंयकार’ !!! पणतूकडे ताबा असलेली जमीन पणजोबांपासून असेल तर जमीन-जुमल्यासहित सर्व प्रश्न झटक्यात सुटतील. आहे की नाही एनआय (नॅचरल इंटेलिजन्स)?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com