
Challenges In Goa Tourism
पणजी: कधीकाळी खाण व्यवसायाचे जे मातेरे झाले, तेच पर्यटन क्षेत्राचे होऊ नये म्हणजे मिळवले. बऱ्याच घटकांसाठी पर्यटन क्षेत्र सोन्याचे अंडे देणारी कोंबडी ठरली आहे. तिचा बळी देण्याचा प्रयत्न सुरू आहे. हल्लीच्या घटना त्यास पुष्टी देतात. कळंगुट येथे जलसफर घडवून आणणारी बोट व्यक्ती मर्यादा ओलांडल्याने (ओव्हरलोड) बुडाली आणि एका पर्यटकाचा मृत्यू झाला.
अतिथी देवो भव: संस्कृतीचा विसर पडलेल्या शॅकचालकांनी किरकोळ कारणावरून पर्यटकांना जीवघेणी मारहाण केल्याचे दोन प्रकार घडले, त्यात एक जण मृत्यू पावला. ‘पर्यटना’च्या लौकिकाला गालबोट लावणाऱ्या प्रकारांत बेकायदा ‘पॅराग्लायडिंग’मुळे झालेल्या दोन मृत्यूंची भर पडली आहे. केरी किनाऱ्यावर पॅराग्लायडिंग कोसळून महिला पर्यटकासह पायलट जिवास मुकल्यावर पर्यटन खात्याने कठोर कारवाईचा परवलीचा सूर आळवला.
जणू काही धोकादायक पर्यटनाचा हा प्रकार काही काल-परवाच सुरू झाला! वास्तविक, गेली चार वर्षे केरी परिसरातील उंच खडकाळ भागात पॅराग्लायडिंग होत आले आहे. परवानाधारक एखादा अन् बेकायदा व्यवसाय करणारे कित्येक! दरदिवशी किमान चाळीस पर्यटक दहा मिनिटांच्या साहसी अनुभूतीसाठी चार ते पाच हजार रुपये मोजत होते. त्यात बरेच जण जखमीही झाले. तेव्हा संबंधित विभागांचे डोळे उघडले नाहीत. कारण बेकायदा पॅराग्लायडिंग ‘चरायचे कुरण’ बनले होते.
पॅराशूट केवळ केरीच नव्हे तर पालये, हरमल पंचायतीच्या हद्दीतून हवेत तरंगतात, ही सबब पुढे करून कित्येक पंच सदस्यांनी ‘हात ओले’ करून घेतले आहेत. काही पोलिस खंडणीखोर बनले. त्यांच्यासमोर कायदेशीर धंदा करणेही अवघड होऊन बसले. ‘ॲडव्हेंचर्स’नामक व्यावसायिकाकडे खंडणी मागताना हेड कॉन्स्टेबल संजय तळकर, राजू कलंगुटकर यांना रंगेहात पकडण्यात आले होते. अशी खाबूगिरीची पूर्वपीठिका असताना पर्यटन खाते बेकायदा पॅराग्लायडिंगपासून कसे अनभिज्ञ असू शकेल? पॅराग्लायडिंग करण्यास मनाई करण्यास केरी पंचायतीने केलेला ठराव देखील कागदाचा कपटा बनून राहिला. हे पाप कुणाच्या आशीर्वादाने होत राहिले, हे उघड होणे गरजेचे आहे.
पर्यटन क्षेत्रात सर्व काही अलबेल आहे, असे मुळीच नाही. या क्षेत्रातील वाढते गैरप्रकार रोखावेच लागतील. पर्यटन मोसमाच्या उत्तरार्धात पर्यटन समभागधारक, मंत्र्यांच्या बैठकीत व्यक्त झालेली खदखद पुरेशी बोलकी आहे. खुद्द पर्यनटमंत्री इतर खाती, अधिकारी यांच्या अपेक्षित प्रतिसादाअभावी नाराज असल्याचे उघड झाले आहे. तशी परिस्थितीही आहे. किनारपट्टीवर पर्यटन खात्यापेक्षा आमदारांचा दबाव अधिक चालतो. ते आपल्या मतदारसंघाचे ‘राजे’ बनलेत.
‘रिपब्लिक’ पद्धत त्यांना अपेक्षित असावी. जरा खुट्ट झाल्यास ते मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतात. अशा प्रकारांमुळे पर्यटकांचे बळी जातात. केरीतील प्रकार भ्रष्टाचाराच्या बळावर रुजला व पोसला गेला, अशी खुलेआम चर्चा आहे. धकाधकीच्या जीवनात चार क्षण आनंदाचे मिळवण्यासाठी पर्यटक गोव्यात येतात. ‘पॅराग्लायडिंग’ असो वा ‘वॉटर स्पोर्टस’! त्याकडे पर्यटक सहजगत्या आकर्षित होतात. असे प्रकार कायद्याच्या चौकटीत व सुरक्षित असतील, याची काळजी घेणे सरकारची जबाबदारी आहे. ती झटकता येणार नाही.
पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्यासोबत पर्यटन सुविधांची इत्यंभूत माहिती पुरवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांनीच त्याची शहानिशा करून घ्यावी, असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. ग्लायडर हवेत झेपावताना वारा असावा लागतो. तो नसताना झेपावण्याचा प्रयत्न फसला व खडकावर आपटून एका निष्णात पायलटसह आयुष्याच्या इंद्रधनूचे स्वप्न रंगवणाऱ्या तरुणीचा अकाली अंत झाला. किमान यापुढे साहसी खेळांसाठी परवाना, सुरक्षेच्या उपाययोजनांची खात्री करणारी यंत्रणा विकसित करा. केवळ एकाच्या अटकेने हा मुद्दा संपत नाही. केरीसारखे प्रकार पुन्हा घडू नयेत, म्हणून सावधगिरी बाळगा. ‘सोन्याचे अंडे’ कथेतील तात्पर्यही लक्षात घ्या- कोणत्याही गोष्टीचा हव्यास वाईटच!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.