
मधू य. ना. गावकर
महाराष्ट्रातील दोडामार्ग तालुक्यात भेडशी गावात मोठी बाजारपेठ आहे. ती बाजारपेठ काढून पुढे काही अंतरावर तिळारी नदीवरील पूल ओलांडल्यावर तिळारी घाटाला सुरुवात होते. त्या परिसरात उजव्या बाजूला तिळारी धरण आहे. महाराष्ट्रातील दोडामार्ग, बांदा आणि गोव्यातील पेडणे आणि डिचोली तालुक्यांना त्या धरणातून पाणीपुरवठा होतो.
पश्चिम घाटात आज शेकडो धरणे उभी करून लांबलचक कोकण किनारपट्टीतील गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांना पाणी पुरवठा होत आहे. महाराष्ट्रातील कोयना धरणाप्रमाणे तिळारी नदीवर उभारलेले धरण बरेच विस्तीर्ण आहे, हे सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील कर्नाटक सीमाभागातील हुळंद गावातील पठारी सड्यावरील उंच कड्यावरून पाहावयास मिळते.
हे धरण उभारताना तिळारी खोऱ्यातील जंगल आणि कैक जैवविविधता पाण्याखाली मोठ्या प्रमाणात गेली आहे. ज्याप्रमाणे सांग्याचे साळावली धरण उभारताना तेथील गावांची गावे पाण्याखाली गेली, त्याहीपेक्षा किती तरी पट जास्त जैवसंपदा तिळारी धरणाखाली बुडून नष्ट झाली आहे.
हा प्रकार म्हणजे दुसऱ्याला जगवण्यासाठी स्वत:ला मरावे लागणे. हे प्रत्येक धरणा ठिकाणीच्या गावागावांत गेल्यावर समजते. तिळारी धरण उभारण्यासाठी पाल, पाटये, चरगावे, कद्रेबिद्रुक, कद्रेखुर्द, चिघुळेे, तुळ्ये गावातील आणि इतर डोंगराळ भागातील लोकांना आपली जैविक संपत्ती आणि धर्म संस्कृतीचा बळी द्यावा लागला आहे. हे त्यांचे मोठे उपकारच आहेत.
महाभारतात कर्णाने कवच कुंडले दान दिली म्हणतात; त्याचप्रमाणे धरण परिसरातील लोकांनी आपली घरे, कुळागरे, शेती, देवालये आणि संस्कृतिवर्धनासाठी आवश्यक मांड, धरणासाठी दान दिले आहेत.
त्या दान दिलेल्या पश्चिमघाटाच्या खोल खोऱ्यातील गावांमधून फोफावत वाहणाऱ्या नद्या, ओहळ, झऱ्यांनी व धबधब्यांनी मानवाच्या गरजांसाठी उभारलेल्या धरणाच्या बांधाने मोठे सरोवर निर्माण करून पिण्यास लागणारे पाणी आणि (ऊर्जा) वीज निर्माण केली आहे. ते मिळवण्यासाठी जंगले, कुळागरे, शेती नष्ट करावी लागली.
तिळारी धरण भरण्यासाठी तिळारी उगमाची पोटली उपनदी, घुरक, आंब्याचा ओहळ, तळयेची नदी, गवानाचा नाला, हटयेचा नाला, वाड्याची नदी, वाफ्याकडील ओहळ या उपनद्यांनी सह्याद्रीच्या उंच कड्यावरून धबधब्यांच्या रूपाने खाली उड्या घेऊन एकत्र होत, तिळारीचे रौद्ररूपी धरणातून वाहत भेडशी, कुडाशे, दोडामार्ग, मणेरी, साळ, धुमासे, मेणकूरे, पीर्ण, रेवोडे, कोलवाळ, धारगळ, तुयें, कामुर्ली, चोपडें, मोरजी, शिवोली समुद्र किनाऱ्याकडे मिळणारी तिळारी नदी आपले नाव बदलीत मुखाकडे शापुरा होऊन अरबी समुद्रास मिळते.
धरण बांधण्याअगोदर त्या नदीला पावसाळ्यात पूर येत नव्हता. आता पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्यास धरणाच्या बांधाला न पेलण्या इतके पाणी भरते, मग खबरदारीचे उपाय म्हणून धरणाची कवाडे उघडी करावी लागतात. त्याने खालच्या भागातील गावांना नित्याचाच तडाखा बसतो. अशा त्या धरणाचे स्वरूप सह्याद्रीच्या उंच कड्यावरून पाहण्याचे भाग्य मला प्रा. राजेंद्र केरकर सरांच्या मदतीने लाभले.
कर्नाटकातील हुळंद गावात जाण्यास कणकुंबी गावच्या घनदाट जंगलातून खडकाळ मार्गाने साधारण चौदा, पंधरा किमी आत जावे लागते. गावात पोहोचल्यावर त्या गावची पूर्वजांची मानवीय संस्कृती पाहावयास मिळते. तिथून पुढे सात आठ किमी पायी घनदाट जंगलातून चालत जात तिळारी खोऱ्याच्या उंच कड्यावरून संपूर्ण खोरे दर्शन देते.
त्या खोऱ्यात उभे राहिलेले धरण पाहून, भारताच्या कैक नदीकाठांवर उगम पावलेल्या संस्कृती नष्ट झाल्याचा तो इतिहास मन खिन्न करतो. तशाच प्रकारे हे धरण उभे राहिल्याने या खोऱ्यातील संस्कृती नष्ट झाली आहे.
हुळंद गावात पोहोचल्यावर हवामानात झालेला बदल लगेच अनुभवास येतो. आपल्या गोव्यात दुपारच्यावेळी अंगाची लाही लाही होते. शरीराची आग थांबवण्यासाठी पाण्याकडे धाव घ्यावी लागते. पण हुळंद गावात दुपारच्यावेळीही गारवा आहे. आमच्या प्रवासात दुर्गाचे पठार लागले. त्या पठारावर भली मोठी आदिमानवाची गुंफा आहे.
विष्ठेतून बी पेरत वृक्षारोपण करणारी वटवाघळे या गुंफेत हजारोंच्या संख्येने राहतात. ती डोक्यावरून जाण्याचा थरारही अनुभवला. शिवाय निसणीचो मधला सडा, दुरागसडा, पेडीचामळ सडा, तळयेचा सडा, कोलापर्वा सडा, मोरंबी सडा, नानगा बैलाचा सडा, कुमभागोठन सडा, असे अनेक सडेही पालथे घालता आले.
या सड्यांवर थेवणेची राय, चवाठ्याची राय, बामणाची राय अशा देवराया पाहावयास मिळतात. सड्यावरील जंगलात धावजा, खांदो, नंद्रक, धूप, पणशी, टोपली कारवी अशी औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत. या झाडांनी सह्याद्रीचे जंगल सजवले आहे.
त्या सड्या पठारावरून पाळाची नदी, इरकाचो नाला, बोकाचो नाला, वडाचो नाला, मोमीचो नाला, दोनीचा नाला हे धबधब्याच्या रूपाने उंच कड्यावरून खालच्या तिळारी खोऱ्यातून धरणाला पाणी पुरवतात. अस्वल, पट्टेरी वाघ, हत्ती, बिबटा, मेरू, ससा, डुक्कर, गवा, चितळ, काळा वाघ, रानमांजर, किंग कोब्रा अशा हिंस्र प्राण्यांचे वसतिस्थान कर्नाटकातील हुळंद गाव आहे. शिवाय कैक प्रकारच्या पक्ष्यांना वर्षाचे बाराही महिने या गावच्या सड्यांवर फळे मिळतात.
हुळंद गावात टुमदार कौलारू घरे, घरात मातीची जमीन, घराच्या सभोवार लाकडी कुंपण ही वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. परसदारी कंदमुळे, भाजीपाला पाहून आपल्या पूर्वजांची कृषी संस्कृती पाहावयास मिळते. जंगल परिसरात बहाळा, हिरडा, घागरी निवडुंग फळ कांगल, जिना, करमळ, कुमयो कुसमो, गेळ, कवचामाड अशा कैक प्रकारची वनस्पती झाडांचे ते माहेरघर आहे.
त्यात घागर, कुंफळ, नागुल कुडा, रान आंबाडा, नारळ कैक प्रकारच्या वेली झुडपे दर्शन देतात. अमृतवाल आपल्या अंगावर पान न ठेवता दिगंबरावस्थेत पिटकोळासारखी लाल फळे पक्ष्यांना खाऊ घालतात.
सड्यावर कैक प्रकारच्या गवताने सूर्याचे किरण झेलून भाताच्या कोंड्याचे रूप घेतले आहे. त्यात आपले बियाणे साठवून मौसमी पावसाची वाट पाहत धरणीच्या कवेत ते फैलावले आहे. गावात युवा पिढी दिसत नाही. पोटाच्या व्यवस्थेसाठी गोव्यात काम करतात. तिथे पिकणारी कडधान्ये आणि कंदमुळे विकण्यासाठी घाटमाथ्यावरून गोव्यातील साखळी बाजारात लोक डोक्यावर सामानाचे ओझे घेऊन चालत येतात.
आम्हांला हुळंद गावचे जंगल आणि तिळारीचे विशाल खोरे दाखवण्यास तिथले जाणकार कृष्णा मोहन गावडे आणि इतर काहीजण आले होते. आमच्या प्रवासात त्यांनी दाखवलेले सडे, घनदाट जंगल, सड्यावर माकडाच्या तोंडाप्रमाणे दिसणारे काळे दगड, रानफळांची झाडे, पक्ष्यांचे-जनावरांचे आवाज, वरून दिसणारे खोल दरीतील विशाल तिळारीचे धरण, सड्याच्या मैदानी भागात फिरताना दिसणारी हिंस्र जनावरांची विष्ठा, हत्ती, गव्यांचे शेणखत आणि या खतावर उगवणारे वेगवेगळ्या जातीचे गवत.
त्याच गवताला पावसाळ्यानंतर इंद्रधनुष्याच्या रंगाची फुले फुलल्यावर तो पठार वेगळेच निसर्गचित्र निर्माण करतो. हे सारे पाहताना सूर्य कधी मावळला हे आम्हांला कळलेच नाही. त्याचा निरोप घेत घर गाठले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.