Cash For Job Scam: थट्टा आज मांडली...

Goa Opinion: ही थट्टा म्हणजे आपणच आपल्या ‘गोंयकार’पणाच्या हाती तुणतुणे देऊन गोवेकरांच्या भविष्याचा समाजिक मंचावर मांडलेला राजकीय तमाशा आहे. थट्टाही आमचीच आणि त्या थट्टेला टाळ्या वाजवणारेही आपणच.
Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Cash For Job ScamCanva
Published on
Updated on

Cash For Job Scam In Goa

व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ चित्रपटात पाय घसरणारा शिक्षक केवळ ‘त्या’ कथेपुरता मर्यादित राहिलेला नाही. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’मधूनही प्रोफेसर विद्यानंदच्या रूपात तो दिसला होता. ‘जॉब स्कॅम’मध्ये तब्बल एक कोटी वीस लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी ढवळीतील शिक्षकाला अटक झाल्याने प्रलोभनांचा ‘पिंजरा’ विविध रूपांत कायम असल्याचे दिसते.

सरकारी नोकऱ्या मिळवून देण्याचे आश्वासन पाळले नसल्याने योगेश कुंकळ्येकर नामक शिक्षकाविरोधात २० लोकांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली. समाज किती पोखरला गेला आहे, याचे हीन उदाहरण आणखी काय असावे! भ्रष्टाचाराला राजमान्यता आणि लोकमान्यता लाभलीय. पैसे घेऊन गैरमार्गाने काम तडीस नेल्यास तो शिष्टाचार; परंतु ‘ते’ काम फत्ते न झाल्यास ‘तो’ भ्रष्टाचार.

नोकऱ्यांच्या आशेने फसवले गलेले आणि फसवणूक करणारे, यांची रोज नवी नावे समोर येत आहेत. पोलिस नोंदीत कॉलम, कलमे तीच; केवळ नावे व फसवणुकीची रक्कम निराळी. २१ ऑक्टोबरपासून किती जणांवर गुन्हे दाखल झाले आणि किती जण जामिनावर सुटले, याची मोजदाद न केलेली बरी. पुढील दिवसांत यादी आणखी लांबत जाईल.

आश्चर्य याचेच की, ज्यांनी उद्याच्या पिढ्या घडवायच्या, तेच हात नोकऱ्यांचा काळाबाजार करू लागले तर अपेक्षा ठेवायची तरी कुणाकडून! एका शिक्षकाला जेव्हा गुन्हेगारी कृत्यामुळे गजाआड जावे लागते तेव्हा त्याचे धक्के धरणीकंपाहून कमी नव्हेत. यापूर्वी माशेलातील एका मुख्याध्यापिकेला अटक झाली होती. मान्य आहे, उडदा माजी काळे गोरे; परंतु विद्येच्या प्रांगणातील शुचिर्भूत प्रतीकांना पोखरणारा भ्रष्टाचार पाहून ‘थंड’ बसणे षंढत्वाचेच लक्षण.

माशेलातील मुख्याध्यापिका असो वा ढवळीतील शिक्षक, उद्या मुलांना न्यायाने, सत्याने वागा असे ते कोणत्या मुखाने सांगतील? मुलांच्या मनातील आदर्श असे रसातळाला जाऊन नाही चालणार. शिक्षकांसाठीही आता समुपदेशक नेमावे लागतील. मारझोड, लैंगिक अत्याचार असे कित्येक प्रकार समोर आल्याने शिक्षकांना कर्तव्याचे भान द्यावे लागेल, असे खेदाने म्हणावे लागत आहे. नोकऱ्यांचा बाजारच मांडायचा असेल तर

आम्ही का शिकावे, असा तरुणांनी सवाल केल्यास सरकारकडे त्याचे काही उत्तर आहे का? नोकऱ्यांच्या चोरबाजाराचा विळखा घट्ट झाला आहे; परंतु मूळ गुन्हेगारांना हात लावण्याची धमक सरकारने अद्याप दाखवलेली नाही. समोर येणारे भामटे ‘पोहोचवते’ हात आहेत. ‘जे’ नोकऱ्या लावू शकतात ‘ते’ खरे भ्रष्टाचारी आहेत.

‘सर्फरोश’ सिनेमात गुलफाम हसनच्या भूमिकेतील नसिरुद्दीन शहा हा बडा शायरच दहशतवादी कारवायांचा जनक असतो. त्याचे पितळ उघडे पाडण्यास अमीर खानसारखा तडफदार पोलिस अधिकारी असतो. इथे आपलेच दात आणि आपलेच ओठ. जलस्रोत खात्यातील अभियंता जॉब स्कॅममध्ये सापडल्याचे उघड होऊनही मंत्री ‘कारवाई होईल’, असे उसने अवसान आणून आश्वासन देतात. संशयितांना अटक होते, ते जामिनावर सुटतात. संबंधित कसे ऐषआराम जीवन जगले, याच्या सुरस कथा समोर येत राहतील.

जरब बसावी अशी कठोर कारवाई होत नाही. यातून लोकांनी काय बोध घ्यावा? सामाजिक नैतिकतेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. याच स्तंभातून आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. परंतु तसे काही पाऊल उचलले जाईल, अशी लक्षणे दिसत नाहीत. आता आधार न्यायालयाचाच. न्यायालयाने ह्या भ्रष्टाचाराची बजबजपुरी रोखण्यासाठी स्वेच्छा दखल घ्यावी, अशी आमची विनंती आहे.

लोकशाहीच्या दोन स्तंभ आचार भ्रष्ट होतात, तेव्हा लोकांच्या आशा केवळ न्यायपालिका या तिसऱ्या स्तंभावर टिकून राहतात. उशिरा मिळालेला न्याय अन्यायापेक्षाही जास्त अन्यायी असतो. अशा प्रकरणांत निकाल लागायला एक दोन वर्षे जरी गेली, तरी लोक पूजा नाईकला विसरलेले असतील; तोपर्यंत बहुधा दुसऱ्या कुठल्या तरी पूजाचे भ्रष्टाचार प्रकरण तेव्हा गाजत असेल. इथे लक्षांत घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे न्याय वेळेत न झाल्यामुळे नावे, माणसे, जागा, रक्कम बदलते; भ्रष्टाचार कायम चालतच राहतो.

Cash For Job, goa government job scam, goa job fraud
Cash For Job: 1 कोटी 20 लाखांची फसवणूक? 'Cash For Job Scam' प्रकरणात ढवळीतील शिक्षकाला अटक

याला खीळ बसेल, किमान नियंत्रणात येईल असे होण्यासाठी न्याय वेळेत व जलद मिळून कठोर शिक्षा होणे अनिवार्य आहे. मुळापर्यंत न्यायालयीन चौकशी व फास्ट ट्रॅक कोर्टात याचा निवाडा लागणे या दोनच बाबी हे चक्र थांबवू शकतात. चंद्रचुडांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली; आता ती पाहू शकते याचे प्रत्यंतर येण्याची ही वेळ आहे. गंगेवाणी निर्मळ असलेल्या गोव्याची चाललेली थट्टा ही कुणा नर्तकीने मास्तराला तुणतुणे हाती धरून तमाशात नाचवण्यासाठी लावलेला ‘पिंजरा’ नाही. ही थट्टा म्हणजे आपणच आपल्या ‘गोंयकार’पणाच्या हाती तुणतुणे देऊन गोवेकरांच्या भविष्याचा समाजिक मंचावर मांडलेला राजकीय तमाशा आहे. थट्टाही आमचीच आणि त्या थट्टेला टाळ्या वाजवणारेही आम्हीच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com