
‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित करणाऱ्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक, मोहन भागवत यांचा आज ७५वा वाढदिवस. त्यानिमित्त हा विशेष लेख...
गेल्या आज ११ सप्टेंबर. खरे तर हा दोन परस्परविरोधी घटनांचे स्मरण करून देणारा दिवस. यापैकी पहिली घटना म्हणजे १८९३ सालची. त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये आपले ऐतिहासिक भाषण केले होते. आपल्या भाषणातील ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो’ या अवघ्या काही शब्दांनी त्यांनी सभागृहात उपस्थित हजारो लोकांची मने जिंकली होती.
त्यांनी भारताच्या शाश्वत आध्यात्मिक परंपरेची आणि विश्वबंधुत्वाच्या तत्त्वाची जगाला ओळख करून दिली. आता दुसरी घटना म्हणजे ९/११च्या क्रूर दहशतवादी हल्ल्यांची. खरे तर, दहशतवाद आणि कट्टरतेच्या धोक्यामुळे याच विश्वबंधुत्वाच्या तत्त्वावर हल्ला झाला होता.
या दिवसाची दखल घ्यायला लावणारी आणखी एक बाब म्हणजे, आज एका अशा व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस आहे, ज्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या तत्त्वाने प्रेरित होऊन आपले संपूर्ण जीवन सामाजिक परिवर्तन तसेच सलोखा आणि बंधुभाव वृद्धिंगत करण्यासाठी समर्पित केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले लाखो लोक, त्यांचा परमपूज्य सरसंघचालक असाच आदरभावपूर्ण उल्लेख करतात.
होय, मी मोहन भागवत यांच्याबद्दलच बोलतोय. महत्त्वाचा योगायोग असा की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आपली शताब्दी साजरी करत असलेले वर्ष त्यांच्याही ७५व्या वाढदिवसाचे वर्ष आहे. मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो.
माझे मोहनजींच्या कुटुंबाशी अगदी जवळचे संबंध आहेत. मोहनजींचे वडील कैलासवासी मधुकरराव भागवत यांच्यासोबत मला जवळून काम करण्याचे अहोभाग्य लाभले. माझ्या ‘ज्योतीपुंज’ या पुस्तकात मी त्यांच्याबद्दल अगदी सविस्तर लिहिले आहे. कायद्याच्या क्षेत्राशी संबंधित असूनही, त्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी स्वतःला वाहून घेतले होते.
गुजरातमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बळकटी देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मधुकरराव यांची राष्ट्रनिर्माणासाठीची तळमळ इतकी होती की, त्यांनी आपला मुलगा असलेल्या मोहनजी यांची जडणघडणच भारताच्या पुनरुत्थानासाठी केली होती. जणू काही स्वतः पारसमणी असलेल्या मधुकररावांनी मोहनजींच्या रूपात दुसरा पारसमणीच घडवला होता!
मोहनजी हे १९७०च्या दशकाच्या मध्यात संघाचे प्रचारक बनले. प्रचारक हा शब्द ऐकल्यावर एखाद्याला, कदाचित प्रचारक म्हणजे केवळ प्रचार करणारा किंवा मोहीम चालवणारा, विचारांचा प्रचार प्रसार करणारी व्यक्ती असे वाटू शकते. परंतु जे कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीशी परिचित आहेत, त्यांना याची जाणीव आहे, की प्रचारकांची ही परंपरा संघटनेच्या कार्याचा गाभा आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये, देशभक्तीच्या भावनेने प्रेरित होऊन हजारो तरुणांनी ‘भारत प्रथम’ हे ध्येय साध्य करण्यासाठी आपले घरदार आणि कुटुंबाचा त्याग करत, आपले आयुष्य समर्पित केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भागवतजींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विविध पदे भूषवली.
यातील प्रत्येक कर्तव्य त्यांनी अत्यंत कौशल्याने पार पाडले. १९९०च्या दशकात अखिल भारतीय शारीरिक प्रमुख म्हणून मोहनजी यांच्या कार्याचे आजही अनेक स्वयंसेवक स्नेहपूर्वक स्मरण करतात. या काळात त्यांनी बिहारच्या गावांमध्ये काम करताना अमूल्य वेळ व्यतीत केला. या अनुभवांमुळे तळागाळातील समस्यांशी ते अधिक खोलवर जोडले गेले. २०व्या शतकाच्या सुरुवातीला ते अखिल भारतीय प्रचारप्रमुख बनले. २०००मध्ये ते सरकार्यवाह झाले आणि येथेही त्यांनी आपल्या कामाच्या अनोख्या शैलीने कठीण परिस्थिती सहजतेने आणि अचूकतेने हाताळली. २००९मध्ये ते सरसंघचालक बनले आणि आजही ते अतिशय उत्साहाने काम करत आहेत.
जर मोहनजींनी त्यांच्या हृदयात जपलेल्या आणि त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केलेले दोन गुण मी आठवायचे म्हटले तर ते आहेत, सातत्य आणि जुळवून घेणे. त्यांनी नेहमीच अतिशय कठीण प्रसंगांमध्ये संघटनेचे नेतृत्व केले आहे, आपल्या सर्वांना अभिमान असलेल्या मुख्य विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही आणि त्याच वेळी समाजाच्या उदयोन्मुख गरजा पूर्ण केल्या आहेत. व्यापकपणे सांगायचे तर, संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वांत परिवर्तनकारी कालखंड मानला जाईल.
गणवेशातील बदलापासून ते प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुधारणा करण्यापर्यंत, त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वपूर्ण बदल झाले. कोविड काळात अनेक ठिकाणी वैद्यकीय शिबिरे भरवण्यात आली. आम्ही आमचे अनेक कष्टकरी स्वयंसेवकदेखील गमावले, परंतु मोहनजी यांची प्रेरणा अशी होती की त्यांचा दृढनिश्चय कधीही डगमगला नाही.मोहनजींच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव. श्रवणाची अपवादात्मक क्षमता त्यांना लाभली आहे. सामाजिक कल्याणाला वाव देण्यासाठी, सामाजिक सुसंवाद, कौटुंबिक मूल्ये, पर्यावरण जागरूकता, ‘पंच परिवर्तन’ मोहनजींनी मांडले.
त्यांच्या अत्यंत व्यग्र अशा वेळापत्रकातदेखील मोहनजी संगीत आणि गायन हे आपले छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढतात. कित्येक भारतीय संगीत वाद्ये वाजवण्यात ते पारंगत असल्याचे फार थोड्या लोकांना माहीत असावे. त्यांची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते.
यावर्षी, अगदी थोड्याच दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी पूर्ण करणार आहे. यावर्षी विजयादशमी, गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आरएसएसचा शताब्दी सोहळा एकाच दिवशी येत असून हा उत्तम योगायोग आहे. आरएसएसशी निगडित असलेल्या भारतातील आणि परदेशातील लाखो लोकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण असेल! आणि आम्हांला या काळात संघटनेला मार्गदर्शन करणारे अतिशय सुज्ञ आणि कठोर परिश्रम करणारे संघचालक म्हणून मोहनजी लाभले आहेत.
मोहनजी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या विचारधारेचे जितेजागते उदाहरण असून जेव्हा जेव्हा आपण या सीमारेषा ओलांडतो आणि सर्वांना आपले मानतो तेव्हा समाजात विश्वास, बंधुभाव आणि समता वाढीस लागते, हे सांगून मी समारोप करतो. मी पुन्हा एकदा मोहनजींना मातृभूमीची सेवा करण्यासाठी दीर्घ आणि आरोग्यमय आयुष्य लाभो अशा शुभेच्छा देतो!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.