

सोहम नाईकची केस सीआयडीकडे देणार हे जाहीर झाले आणि मागील सर्व प्रकरणांची उजळणी परत डोळ्यासमोर आली. ना त्या केसेस कधी धसास लागल्या, ना त्यातून कुणाला सजा झाली. उलट उथळ माथ्याने यातील आरोपी दुसरा गुन्हा करण्यासाठी सज्ज झाले. पोलिसांनी प्रथम त्या केसेसचे काय केले हे समजून घेण्याचा अधिकार जनतेला आहे. त्याचे स्पष्टीकरण प्रथम सीआईडी ने द्यावे, मग ही केस घ्यावी.
वृत्तपत्र संपादकांचे धारिष्ट्य आणि विशाल, उदय ह्यांच्यावर दाखवलेला विश्वास हा कौतुकास पात्र आहे. त्या मुलाचा माज उतरवणे गरजेचे आहे. त्याचा बेशरमपणा आणि त्याला आधार देणारे हे सूत्रधार आहेत. त्यामुळे हे छोटे झाड वटवृक्षात वाढले आणि अनेक सावल्या त्याला पांघरूण घालत राहिल्या. ह्याची पाळेमुळे सावर्डे सोडून इतरत्र ही नसतील कशावरून?
वृत्तपत्रातील बातमी, लागलेली कुजबुज त्या बापाला अस्वस्थ करून गेली असेल. म्हणून त्याने जिवाचा आटापिटा करणे स्वाभाविक आहे. राजीनामा द्या आणि मोकळे व्हा. महाराष्ट्र त्या बाबतीत आघाडीवर म्हणावे लागेल. नगरसेवक हादेखील राजकारणी. आपण या होळीत पोळले जाऊ ही दूरदृष्टी लक्षात घेऊन त्यांनी पोलिसस्थानक गाठले. ही दक्षता वाखाणण्यासारखी आहे. कुठे गप्प राहावे, कुठे ऐकू नये आणि कुठे डोळेझाक करावी, ह्याची जाणीव त्यांना आहे.
पाठीशी अनुभव आहे, गणित आहे.
पोलिस कधी मदत करतील, कधी कुठला सल्ला देतील, कुणी ह्या बातमीचे कुणकुणी सुतोवाच केले, कुठे केले त्याचे समीकरण सावर्डे रहिवासी ठरवतील. पोळी भाजली नी कुणीतरी टाळी वाजवायला साथ दिली. नावडतीचे मीठ अळणी म्हणत पोलिस त्यांचा न्याय म्हणत हात झटकले खरे पण तिथून वस्त्रहरण सुरू झाले. नगरसेवक म्हणतात माझा लाडका या योजनेचा भाग नाही. मग पितामह कोण ? त्यावेळी पितामह, ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ ह्या शर्यतीचा हिस्सा का झाला? आपला धीट पुत्र अंगलट आलेले प्रकरण संभाळू शकला असता हे कर्म. त्याला हा बाप सुरक्षित करतो थोडक्यात त्याची हिंमत वाढवतो. फाजील आत्मविश्वास वाढीस घालणारा बाप या सर्व मुलींची जबाबदारी घेणार आहे का?
पोरगा कला दाखवत होता तेव्हा साथ दिली म्हणून तो नसते नाद करत राहिला आणि आपण तयार केलेले क्षेत्र वाढीव केले. स्पष्ट म्हणेन ह्याच्या अभिनयाला पाठिंबा देणारे अनेक असतील. ही ओवाळून टाकलेली औलाद कुणाची असो, त्याची निष्ठा प्रगल्भ. सर्वांचा दाता एक. मुली इतक्या आंधळ्या होतात की मैत्री कितपत करावी ह्याचे भान नाही राहत. पाय चाटणारी मांजर पोट भरलं की नखं लावतेच. सावधानता बाळगायला हवी. ‘सो ऽऽ हम’ हा ‘सो ऽऽ व्हॉट’सारखा वागला तर आरती कुणाची उतरवायची? त्याचा लंपटपणाला खतपाणी मुलींनी घातलं हे मान्य करावे लागेल.
राहता राहिली तक्रार. कोण आपली बदनामी करून घेणार? कोर्ट कचेरी त्यात होऊ घातलेली लग्नं. तो व्याप, ते फिर्याद मागे घे ह्यासाठी वेगळा सापळा, मिळणारे पैसे हे डावपेच. राजकीय व्यक्ती असेल तर तक्रार नोंद करून घेण्यास कुचराई केली जाते. पोलिसांना बूस्टर डोस दिला जातो. त्यामुळे ते निष्ठा दाखवतात. प्रमोशन , बदली, पुरस्कार एक दगड परिस्थितीवर अवलंबून.
राज्य महिला आयोग हे पद साहायक अभिनेत्रीसारखं छत्री धरून उभं असतं. अधिकार शून्य. दात नसलेले वाघ. तडजोड, उच्चपदस्थ.
पण, गोमंतकीय पत्रकारितेला मानले पाहिजे. या कार्यात यशस्वी. कुणाच्याच आहारी न जाता अत्यंत ठामपणे आपली बाजू मांडून प्रकरण सखोल व पारदर्शकपणे चौकशी करायला भाग पाडले. अशा पत्रकारितेला दंडवत! चुकीचे पायंडे पडू नये ह्यासाठी सावर्डे उठले दोषीवर कायद्याचा वचक दाखवा म्हणत. तांडव श्रुत होता.
ह्यात आज माझ्या बहिणी , मुलगी अडकू शकते हे वादळ रोखलं पाहिजे म्हणून जो जनमानस आला. तो कदाचित दोषीला ठेचून गेला असता. त्या दोषीला जास्त दुखापत न करता ज्याचा अभिमान आहे त्याचे निर्जंतुकीकरण केले तरी भोग भीषण वास्तवात बदलले असते. काय मिरवणार मग? काही विधी करावे लागतील नुसता संताप करून नि:पक्षपातीपणा होणार नाही.
ना रहेगा बास ना बजेगी बासुरी।
बघा. पोलिस म्हणणार तपास चालू आहे. जनक्षोभ लक्षात घेऊन न्यायालयीन कोठडीत वाढ ही बातमी. संशयास्पद काही नाही, पुरावे? त्यांचा अभाव. ‘कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही’ हा डायलॉग असणार. त्याला शस्त्रहिन करू असे म्हटलेले वाक्य का नाही येत? निदान पीडितांना न्याय मिळेल.
वृत्तपत्राचे विशेष कौतुक, त्यांनी निरपेक्ष बातमी दिली. त्याचा पडसाद गोवाभर उमटला. स्पंदने वाढून नात्यांचे धागे, विश्वासाचा मणी ओवला गेला. ह्यात ‘पॉस्को लावा’, ‘सो मोटो’चा आग्रह झाला. अशा घटना कालबाह्य होऊ नये ह्यासाठी गोवा सतर्क राहील असा संदेश मिळाला.
- नीना नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.