
अॅड. सूरज मळीक
नवी समाजाबरोबर समस्त प्राणिमात्रांचे जीवन निसर्ग आणि पर्यावरणातील विविध घटकांवर अवलंबून आहे. आदिमानवाने जंगली श्वापदांचे मांस भक्षण करण्याबरोबरच रानटी फळे, फुले, पाने, कंदमुळे यांचा अन्न म्हणून उपयोग केला होता. कधीकाळी विवस्त्र वावरणाऱ्या माणसाला अन्नधान्य उत्पन्न करण्याची प्रेरणा मिळाली आणि शेतीचा शोध लागला. अग्नीमुळे अन्नाला शिजवणे शक्य झाले.
चांद्र कालगणनेनुसार येणारा श्रावण हा पाचवा महिना; हवा, पाऊस आणि उन्हासोबत हिरवळीच्या वैभवाने झळकतो. श्रावणात अधूनमधून काही दिवस विश्रांती घेऊन बरसणाऱ्या सरींमुळे नवोदित वृक्ष-वेलींना कोवळ्या उन्हाचा आस्वाद घ्यायला मिळतो. माळराने, जांभ्या दगडानेयुक्त पठार व इतरत्र मोकळ्या जागेत अंकुरून आलेल्या तृण वनस्पतींना भरभरून वाढ होण्यासाठी ऊर्जा लाभते.
पालेभाज्या, कंदमुळे यांच्यातल्या उपजत असणाऱ्या पौष्टिक आणि औषधी घटकांचा आस्वाद घेण्यासाठी श्रावणातील व्रतवैकल्यांत शाकाहाराला इथल्या लोकमानसाने प्राधान्य दिले असावे.
नागपंचमीच्या सणात तांदळाच्या मळलेल्या पिठावरती किसलेले खोबरे, गूळ, वेलची यांचे मिश्रण एकत्रित करून हळदीच्या पानात लपेटले जाते आणि मंद अग्नीवर काही काळ वाफवल्यावर हळदीच्या घमघमटातली पातोळी जिभेची पकड घेण्यास सिद्ध होते. १५ तारखेला संपन्न होणाऱ्या अजमप्शन सायबिणीच्या फेस्ताला पातोळी हवीच.
भातापासून तयार होणाऱ्या लाह्या आणि मधुरसाने युक्त दुधाचा आस्वाद घेण्याची उत्सुकता नाग पंचमीदिनी लहान मुलांना होती. जेवणात वरणभात, सोलकडी, मुगा-गाठी, भेंडीच्या भाजीबरोबर फणसाच्या बिया आणि लसूण, मोहरीची फोडणीयुक्त अळू यांची खासियत असते. श्रावणात गोव्यातल्या ग्रामीण भागात आकाशातल्या सूर्यदेवाच्या पूजनाची परंपरा आयतार म्हणून परिचित आहे.
श्रावणालेल्या पहिल्या रविवारी सुवासिनी महिला सुरय तांदळापासून पातोळ्या बनवतात, दुसऱ्या रविवारी गूळ खोबरे यांच्या मिश्रणाने वाफलेल्या मुटल्या बनवून त्यांचा आस्वाद घेतात, तिसऱ्या रविवारी सान्ना आणि चौथ्या रविवारी पोळ्यांचा नैवेद्य अर्पण करून आपणही त्याचा वर्षातून एकदा तरी मनमुराद आस्वाद घेतात.
तायकुळो, कुड्डुक म्हणजे कुरडू अशा जंगली भाज्यांची तूरडाळ, कुळीथ, उडीद, आठळ्या घालून शिजवतात, जेवतात आणि श्रावणातल्या शाकाहारातल्या चवीला द्विगुणित करतात.
पूर्वीच्या काळी भारंगी, गुळवेल, घोटवेल अशा जंगली भाज्यांना श्रावणात स्थान होते त्यामुळे वनौषधी तत्त्वांचा लोकांना लाभ व्हायचा. आज बाजारात उपलब्ध बटाटे, टोमॅटो, बीट , मिरची, अननस, काजू हे गोमंतकीय अन्नातले घटक पोर्तुगीजांमुळे उपलब्ध झाले असल्यामुळे एकेकाळी या घटकांचा उपयोग शाकाहारात होत नसे. आज श्रावणात या विशेष प्रसंगी बनवल्या जाणाऱ्या खतखत्यात टॉमेटो, बटाटे, ढब्बू मिरची, बीट या विदेशांतून आलेल्या घटकाशिवाय फणसाच्या बिया, सुरण, भोपळा आदीचा उपयोग करून त्याची चव वृद्धिंगत केली जाते.
श्रावणातल्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी फर्मागुडी येथील पठारावरील कटमगाळ देवचाराप्रीत्यर्थ ‘गोडशे परब’ साजरी केली जाते. आमराईत, जांभूळ, चिंचेसारख्या वृक्षांच्या सान्निध्यात अदृश्य रूपातील कटमगाळ दादा मोसमी भाज्यांनी युक्त मळ्यांचे रक्षण करतो.
तांदूळ, मूग, गूळ आणि किसलेले खोबरे तांब्याच्या मोठ्या भांड्यात घालून शिजवलेल्या गोडश्याचा आस्वाद घेण्यासाठी आतुरलेले असतात. सागवान वृक्षाच्या पानावर गोडश्याचा आस्वाद घेतला जातो. गावडा, धनगर, भंडारी अशा कष्टकरी जाती जमातीतील लोक श्रावणातल्या गोडशे परबाच्या आनंदोत्सवात सहभागी होतात.
आज औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे आपण स्थानिक रानभाज्यांपासून दुरावत चाललो आहोत. गावातील जंगले, माळराने, पाणथळीच्या जागेत उगवणाऱ्या रान भाज्यांचे शास्त्रीय ज्ञान आपल्या पूर्वजांना माहीत नसले तरी अनुभवांद्वारे त्यांच्यात कोणकोणते औषधी गुणधर्म आहेत याची त्यांना जाण होती आणि त्यामुळे कोणत्या भाज्या कधी खाता येतात आणि कधी खाऊ नयेत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी अशा काही रानभाज्यांची सांगड लोकधर्म आणि उत्सवांशी पूर्वापार घातली होती.
गोव्यातील अनेक भागात काही भाज्यांना विशेष प्राधान्य दिलेले पाहायला मिळते. कुठे गवत म्हणून पहिल्या जाणाऱ्या तृण वनस्पतीला काही गावात चवदार भाजी म्हणून उपयोग केला जातो. गोव्यातील गाव, शहराच्या रस्त्याकडेला उगवणाऱ्या, सर्वत्र आढळणाऱ्या वनस्पतीला दुणदुण्याची भाजी म्हणून सत्तरीतील काही गावात उपयोग केला जातो.
त्याचे शास्त्रीय नाव ‘अल्टरनंथेरा सेसिल्स’ असे आहे. तर त्याच कुळातील, तशाच आकाराच्या लहान पानाच्या वनस्पतीला ‘गुनगुन’ असे नाव आहे. या दोन्ही वनस्पतीला पांढरी फुले येतात. चविष्ट भाजी बनवण्यासाठी ही बहरण्याअगोदर त्याची कोवळी पाने काढली जातात.
गोव्यात तोणीया मेळ म्हणून शिगमोत्सवात नृत्य केले जाते. त्यामध्ये हातात ज्या प्रकारे काठ्या घेतल्या जातात त्याच प्रकारे बांबूप्रमाणे सरळ वाढणारी गवत भाजी तोणियाची भाजी म्हणून ओळखली जाते.
गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी गौरी पूजनात ही भाजी विशेष महत्त्वाची ठरलेली आहे. धारबांदोड्यातील साकोर्डे या गावात त्याला गौरीची भाजी म्हणून ओळखले जाते. आज कमी प्रमाणात आढळणाऱ्या या भाजीची लागवड करून मुद्दाम गौरीसाठी म्हणून ती राखून ठेवलेली या गावात पाहायला मिळते.
सत्तरीतील वांते गावात तर एका भाजीमुळे स्थलांतरित होऊन आलेल्या गावकऱ्यांच्या आठवणी दडलेल्या आहेत. गोव्यातील इतर भागात सुईची भाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाजीला वांते गावात पोडशेची भाजी म्हणून ओळखले जाते. या गावातील काही लोक पोडशे गाव सोडून आलेले सांगितले जाते.
मान्सूनच्या पावसानंतर एका महिन्यात गावातील घाटीयेर म्हणून नाव असलेल्या जागेत जणू काही भाजीचा मळा असल्यासारखी ही भाजी उगवलेली दिसते. या गावातील लोक सायकिण्याची भाजी खूप आवडीने खातात. तामीळ लेसविंग फुलपाखराची ही जीवन वनस्पती आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदरच ती डोंगरमाथ्यावर उगवायला सुरुवात होते. श्रावण महिन्यात ही वेलवर्गीय वनस्पती एक मीटरपेक्षाही उंच वाढलेली असते. काणकोणसारख्या प्रदेशात या भाजीला शिरमंडोली या नावाने ओळखले जाते.
गोव्यातील ओहोळाच्या काठावर किंवा वायंगणी शेताच्या बाजूने आढळणाऱ्या ब्राह्मी नामक भाजीला तर काही ठिकाणी आरोग्यवर्धक चटणी बनवण्यासाठी उपयोग केला जातो. सत्तरीमध्ये तिला कारूण्णो किंवा म्हेरेची भाजी अशा नावांनी ओळखले जाते. संपूर्ण जगात १० आक्रमक प्रजाती कोणत्या आहेत हे पाहिले तर त्यामध्ये टाकीळा या भाजीचे नाव मिळते.
भारतीय संस्कृतीने अन्नाला पूर्णब्रह्माच्या रूपात पाहिले असून निरोगी आरोग्यासाठी सकस आणि संतुलित आहाराची नितांत गरज असल्याचे स्पष्ट केलेले आहे. चुकीची जीवनशैली आणि चुकीचे अन्नसेवन केल्यामुळे हृदयरोग मधुमेह आणि कर्करोगासारख्या व्याधींचे प्रमाण वाढत चाललेले असून त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय झालेली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.