
श्रावण महिन्यात सूर्याला पर्जन्य मानतात, या महिन्यात सरसरणाऱ्या सरीचा पाऊस पडल्याने जमिनीच्या अंगावर तयार झालेल्या वारुळांना अळंबी फुलतात. या अळंब्याच्या फुलोऱ्यात अळ्या, किडे जन्म घेतात. निसर्ग ते खाद्य सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी निर्माण करतो. कारण पावसाळ्यात सरपटणारे प्राणी वारुळात दडी मारून बसतात. पावसाच्या ओलाव्यामुळे ते सहसा बाहेर पडत नाहीत. म्हणून निसर्गाने त्यांच्या अन्नाची व्यवस्था म्हणून अळंबी खाद्य तयार केले आहे. या श्रावणातील व्रतकैवल्यांनी चातुर्मास बनवला.
कुंद धुंद वातावरणातून वर्षा ऋतू हिवाळ्याकडे झुकत जातो. ऊनपावसाच्या खेळात इंद्रधनुष्याचे सौंदर्य घेणारा श्रावणमास मागच्या पुढच्या ऋतूंना आपल्या मिठीत धरून जलबिंदूतून सूर्याच्या सप्तरंगी किरणांचे दर्शन देतो. श्रावण राजासाठी मुंजा पिंपळ आपली लाल पालवी डौलाने फडकवत रानफुलापेक्षाही नाजूक भासतो. पावसाच्या सरी बाकी वृक्षांच्या फुलांचा बहर गळून खाली टाकतो.
वसंताचे रूप दिसले नाही म्हणून आपले अडते कुठे? म्हणत, श्रावण मुंजा पिंपळाचे लाल वस्त्र बदलीत हिरव्या पानांनी वाऱ्याच्या झुळकेने सळसळत वातावरण बदलून टाकतो. समुद्राच्या लाटांनी तटाला धडक दिल्याने त्या आवाजाने झाडांच्या मनात धडकी भरते, त्याचप्रकारे वाऱ्याच्या लहरीने उचंबळून जाणारा पिंपळ मनात बंडखोर वृत्ती उपजून त्या वाऱ्यावर वचक निर्माण करतो. पिंपळ, वड, रुमड वंशातील वृक्षांना फुले न दिसता फळांचा बहर पाहावयास मिळतो. हे वृक्ष भारतीय संस्कृतीत अमर झाले आहेत. पिंपळाला फळांचे घोस, वडाला बोराच्या आकाराची लाल फळे आणि रुमडाला द्राक्षांच्या घोसाप्रमाणे हिरवी, पिवळी, केसरी रंगाची फळे पिकल्यावर वेगवेगळ्या पक्षांची झुंबड उडालेली पाहावयास मिळते.
धो धो पडणाऱ्या श्रावणातील पावसाच्या सरीत यमुनेच्या तीरावर जन्म घेणाऱ्या श्रीकृष्णाला व्यापारी विश्वाची अफाट प्रतिमा त्या अश्वत्थ पिंपळात सामावलेली दिसली. विश्वरूपी भगवंताला पिंपळाचे मूळ पाताळात, फांद्याचा पसारा विश्वात आणि माथा हिमालयाच्या शिखरात दिसला, अशा मुंजा पिंपळाने भगवंताला आपल्या अंगाचे वेगवेगळे स्वरूप दाखवले. वसंतात पिंपळ आपली पाने सुकलेल्या धरणीवर पसरवून आपल्या पानातील ओलावा देतो.
ग्रीष्म उलटून गेल्यावर त्याच्या फांद्यांना लाल पालवीचे मनमोहक गेंद तो परिधान करून सजतो. मानवाने त्याला सनातनी कृष्णरूपात पाहून हिंदू, बौद्ध, जैन त्याची पुजा करतात. श्रावणात तो अगदी शांत असतो. पिंपळाची पाने जमिनीवर पडून लवकर कुजत नाहीत. त्यांच्या पानातील गर जाऊन ते सुकलेले पान जाळीदार बनते, ऊनपावसाला ते दाद देत नाही, एखादा चित्रकार त्याचे स्वरूप पाहत नक्षीदार तैलचित्र रेखाटतो. किती भाग्य त्या पानाचे!
आंबा, फणसाचे पान जाळीदार बनते, मात्र पिंपळ पानासारखे टिकाव धरू शकत नाही. श्रावणमासात पाऊस झाडांना भरपूर पाणी देतो. श्रावणात देवदेवतांना सुगंधित फुले आणि एकवीस प्रकारची पत्री लागते. दूर्वा, छत्री, माड, चिरडा, बेल, तुळशी, मंदार, रुई, राजहरळद, शर्वड, कुर्डुक, आघाडा, जास्वंद, जाई, मोगरा, चाफा, झेंडू, शेवंती, चंद्रवेल, सिताबोटे, अनंत, पारिजातक, अबोली, धोत्रा, अळू, कासाळी, हळद अशा वनस्पती झाडांची पत्री रविवारी तांब्यात पाणी भरून त्यावर नारळ ठेवून सूर्याच्या नावे वनस्पती पत्रीने पूजन करतात. हा चमत्काराचा संगम घडवते ते पाणी हे तत्त्व आपला दृष्टांत दाखवते आणि अदृश्यही होते. ते सूर्याकडून पृथ्वीकडे आणि पृथ्वीकडून सूर्याकडे जाते.
माझा आजचा प्रवास डिचोली तालुयातील कौंडिण्य म्हणजे कुडणे गावात तिथल्या पूर्वजांनी जगण्यासाठी हातांच्या ताकदीने दीड दोन किमी ओहोळाप्रमाणे (चर) कालवा खोदून त्या कालव्यातून शेजो नदीचे पाणी शेतीला नेऊन आपण जगत, भविष्य घडवीत तिथली कृषी संस्कृती वाढवली, तो गाव हे माझे आजोळ. त्या गावात माझे बालपण गेले. १९५८ आणि १९५९ साली मी तिथल्या रवळनाथाच्या देवळात मुळाक्षरे काढली. पोर्तुगीज सोलजरांच्या भीतीने पुस्तकावरील तिरंग्याला पांढरा कागद चिकटवून शिकलो आणि लहान वयात कुणालाच न सांगता पळून माझी कर्मभूमी खांडोळा गाव गाठला. हा माझा प्रथम पराक्रम!
कुडणे गावचा इतिहास वाचल्यास पूर्वी त्या गावात जैनांचे वास्तव्य होते. त्या परिसराला गुजरार म्हणतात. त्या परिसरात कालव्याच्या काठाकडे त्यांनी देवळाच्या शिखराप्रमाणे एक स्तूप बांधलेला पाहावयास मिळतो, त्याच परिसरात पुराणवास्तू सूर्यमंदिर आहे, व्यापारीकरणाने त्यांनी कुडणे गावात तीन बंदरे निर्माण केली. सास्तधडो, नावतान नदी आणि हरवळे शेजो नदी यांचा जिथे संगम होतो ते मोपान ठिकाण आणि पेठेर शेजो या तीन बंदरावर ते व्यापाराची देवाणघेवाण करीत होते. त्यांच्या होड्या वाळवंटीच्या मुखातून वरच्या भागातील हरवळे आणि नावतान नद्यांत येत होत्या.
तिथले पूर्वज शेजो हरवळे नदीच्या पात्रात पेठेर भागात नैसर्गिक बंधारा उभारून पाणी अडवून ते खोदलेल्या कालव्यातून वडशेत, खिळ्यामळ, खुनयानी, बानपाट, आर्कार, कुमारखणकडून घरासखल भागातून विशाल सरदवायगण शेतीला पुरवीत होते. त्या पाण्यावर शेतात बैलाच्या साहाय्याने नांगरणी करून खुनयानी, वाव, एरका, हळवटा, मळ्यो, खवलेपाट, पातयानी, पोयकडे, म्हारमळी, घुड्यार, इफळीकडे ढवळालोत अशा नावांनी ओळखली जाणारी भातशेतीत तिथली बियाणी लागवड करून त्या गोड पाण्यावर पिकलेल्या भाताच्या राशी घरी आणीत होते.
शेतीला गोपालनाचे शेणखत आणि चुलीतील राख वापरून त्या खताने भातशेताच्या जमिनीचा कस राखायचे. हिवाळ्यात कालव्यातील पाणी लाटीने उपसून घराशेजारील मरड जमिनीत मिर्ची, कांदा, अळसांदा, चवळी, वाल हे पीक घेत होते, पावसाळ्यात मरडशेतीत नाचणी, पाखड, उडीद, तीळ, भात, कुळीथ पीक घेत होते, परसबागेत भोपळा, दोडगी, अळू, सुरण, कणगी, चिकी, कुवाळा आदी भाज्यांच्या लागवडीने घरासभोवतालचा परिसर हिरवागार दिसायचा. कुडणे गावाला गोड्या आणि खाऱ्या पाण्याचे वरदान लाभले आहे. पावसाळ्यात नदीतून शेतात चढवणीची मासळी मिळायची.
खाऱ्या पाण्यात काळुंद्र, शेवटा, चोणकूल खेकडे, तामसा, झिंगे आणि गोड्या पाण्यात थिगुर, वाळेर, करणकाटका, देखळा, कोडयाळ्या खरवा, पिठ्ठोळ, शेतात कोंगे ही मत्स्यसंपदा होती. भातधान्य पिकावर जगत जगत त्यांनी गावची कृषी संस्कृती वाढवून भविष्य घडवले. जत्रा, कालोत्सव, दसरा, धालोत्सव साजरे करून लोकसंस्कृतीचा एकोपा राखला अशा कुडणे गावच्या देवालयाच्या परिसरात माझ्या बालपणी भलामोठा मुंजा पिंपळ आणि सावित्रीचा वटवृक्ष होता. पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर त्या दोन्ही वृक्षांच्या परिसरात लुकलुकणाऱ्या काजव्यांची जत्रा भरून महादेव मंदिराचा परिसर प्रकाशमग व्हायचा.
आज कुडणे गाव पाहताना दिसतो तो खाणीच्या धंद्याने कालवा, नद्या आणि भात शेतात लाल पाणी भरून कृषी संस्कृतीची नासाडी झालेला भकास गाव. ऋषींच्या कौंडिण्य या नावाचा अपभ्रंश होऊन तो कुडणे झाला, तशीच येथील ऋषी संस्कृती व कृषी संस्कृती लोप पावून झालेला अपभ्रंश पाहवत नाही. संस्कृतीचा त्याग करून स्वीकारलेली कुठलीच गोष्ट माणसाची प्रगती घडवीत नाही; मग ते शिक्षण असो वा विकास. सगळे भकास होत जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.