गोव्याचे अस्सल 'गोंयकारपण': खाजन शेती, मानशी आणि शिरदोण खाडीच्या काठावरील लोकजीवन

Shirdon creek biodiversity: कदंब पठाराच्या पायथ्याशी उगम पावलेल्या शिरदोणच्या खाडीला उगमाच्या बाजूने ओहोळाचे मुख आणि खाडी यांच्यामध्ये उभी असलेली मानस, गोड्या आणि खाऱ्या पाण्याला मिसळण्याचे काम करते.
Shirdon creek biodiversity
Shirdon creek biodiversityDainik Gomantak
Published on
Updated on

कदंब पठाराच्या पायथ्याशी उगम पावलेल्या शिरदोणच्या खाडीला उगमाच्या बाजूने ओहोळाचे मुख आणि खाडी यांच्यामध्ये उभी असलेली मानस, गोड्या आणि खाऱ्या पाण्याला मिसळण्याचे काम करते. त्याच ठिकाणी सातेरी मंदिर आहे. या खाडीच्या काठावर मिठागरे मोठ्या प्रमाणात होती. या मिठात क्षार भरपूर असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात होती.

सुक्या मातीवर पाण्याचा थेंब पडून त्या थेंबाने तिचे अंग भिजून ओले झाले की, तिच्या पोटातील बियाण्याला संजीवनी मिळून अंकुर बाहेर पडतो. त्या अंकुराचे रक्षण करण्यास पाणी, प्रकाश, वायू, आकाश आणि त्याची आई माती यांच्याकडून जगण्याचे अन्न घेत भूमीच्या शरीरावर वाढू लागतो.

सफेद अंकुरात पिवळेपणा येऊन नंतर तो हिरवा रंग पसंत करून मोठा होत जन्म देणाऱ्या मातेच्या अंगावर आपल्या शरीराची घाण म्हणजे साल, पाने, फांद्यांची सुकी लाकडे खाली टाकून सोबती जीवाश्मांना अन्न पुरवण्याची जबाबदारी घेतो. त्या झाडाच्या अन्नावर किडे, माशा, वाळवी, मुंग्या, कीटक, टोळ, मधमाश्या, गोगलगाय यांना जगणे मिळू लागते. मुंग्या कीटकांचे अन्न सरपटणाऱ्या प्राण्यांना मिळू लागते. झाडाला फुला, फळांचा बहर येऊ लागल्याने झाडाची सफाई करण्यास पक्षी अवतरतात.

मध, फळे, कीटक, मुंग्या, सरपटणारे प्राणी, मासळी बेडूक खाऊन वृक्ष वनराई तयार करतात. पक्षी, कासव, मासळी, घोरपड, मुंगूस, साळिंदर खाण्यास हिंस्र जनावरांचा जन्म झाला. काही जनावरे मांस भक्षण करू लागली ती हिंस्र बनली.

काही जनावरे पाला-पाचोळा खाऊ लागली. अशा साखळीने जैवविविधता पोसण्याचे काम करीत पृथ्वी, हवा, अग्नी, आकाश, प्रकाश आणि द्रवरूपी पाणी जीवाश्मांना पृथ्वीवर खेळवत वाढवू लागले. त्यातील बऱ्यावाईट गोष्टीची शहानिशा करण्यास या साखळीत बुद्धिवान, विचारवंत माणसाला जन्म देऊन जैविक संपदेच्या साखळीचा प्रवास सुरू झाला असला तरी पृथ्वीच्या तत्त्वांनी आणि ऋतूंनी सायकलीच्या चाव्या आपल्या हातातच ठेवल्या आहेत.

Shirdon creek biodiversity
Goa Mankurad Mango: मानकुराद दीड हजार रुपये डझन, बाजारात आवक वाढली; स्थानिक आंब्यांना अधिक मागणी

आपले प्रत्येक तत्त्व पृथ्वीने सांगितलेले काम प्रामाणिकपणे करीत आहे. ती तत्त्वे सर्वांना उपयोगी पडून सजीवपणा देणारे काम फक्त पाणी करते. हे करताना ते आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेत असते. पाणी हे द्रव स्वच्छ ठेवण्याचे काम माणसानेच केले पाहिजे, कारण इतर प्राणी पाण्याला दूषित करीत नाही. पण माणसाने दूषित केलेले पाणी ते पिऊन पचवतात. फक्त माणसालाच शुद्ध पाण्याची गरज आहे, तो दूषित पाणी पिऊन पचवू शकत नाही. हे सारे सत्य डार्विनने आपल्या सिद्धांतात मांडले आहे.

या विचाराचे ओझे माझ्या डोक्यात घोळवत मी ओल्ड गोवा पोहोचलो. त्या ठिकाणी पत्रकार पॉल फर्नांडिस मला थांबले होते. त्यांच्या स्कूटरने आम्ही कुडका-सांतान गाठले. चर्चकडे प्रोफेसर रामराव वाघ आमची वाट पाहत थांबले होते. तिथून आम्ही मौळा, भाटी, गावशी भागात कदंब पठाराच्या पायथ्याशी उगम पावलेल्या शिरदोणची खाडी या ठिकाणी पोहोचलो.

खाडीच्या काठाने जाताना खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या कुशीतील शेतात तिथल्या शेतकऱ्यांनी लावलेली मिरची, कांदा, वाल, अळसांदा, मुळा, रताळी, कलिंगडाचे मळे पाहावयास मिळाले. सकाळची वेळ असल्याने शेतकरी बाया पुरुष आपल्या कष्टाच्या रोपांना पाणी देत फळे येणाऱ्या भविष्याची वाट पाहत काम करीत होते. या खाडीला उगमाच्या बाजूने ओहोळाचे मुख आणि खाडी यांच्यामध्ये मानस उभी राहून गोड्या आणि खाऱ्या पाण्याला मिसळण्याचे काम करते. त्याच ठिकाणी सातेरी मंदिर आहे.

खळीत आणि खाडीत सफेद झिंगे, वागी, शेवटा, पालू, खरचाणी,काळुंद्र, धोडयारा, शेतुक मासळी मिळण्याचे ते भांडार आहे. या खाडीच्या काठावर मिठागरे मोठ्या प्रमाणात होती. या मिठात क्षार भरपूर असल्याने त्याला मागणी मोठ्या प्रमाणात होती. त्या खाडीच्या काठावरील खाजन शेती भुसभुशीत रेती आणि मातीची असल्याने मुळा, रताळी, कलिंगड, वांगी मोठ्या प्रमाणात लागवड करतात.

Shirdon creek biodiversity
Goa Drowning Death: मासेमारीचे जाळे सोडवताना तरुणाचा बुडून मृत्यू, शापोरा नदीत दुर्घटना; दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

शेताच्या परिसरात आणि पठाराच्या पायथ्याशी जुने नवीन मळे पाहावयास मिळतात. हिंदू आणि ख्रिश्चन लोक एकत्रितपणे वावरताना पाहावयास मिळते. गावशी गावात प्राचीन काळी सातेरीचे मंदिर होते. पोर्तुगिजांनी बाटाबाटी करून ते मोडले. म्हणून पूर्वजांनी फोंडा तालुक्यातील पारांपई मडकई या ठिकाणी ते स्थापन केले. तरीसुद्धा तिथे राहिलेल्या भाविकांनी त्या देवीचे देऊळ उभारले. तिच्या भक्तीत रमून, भविष्यासाठी काबाड-कष्ट करून खाडीकडे जगत असलेले ते आजही दृष्टीस पडतात.

अशा या कदंबाच्या पायथ्याशी गवाळी गावात सौंदेकर राजघराण्याचा जुना राजवाडा आहे. त्या वरच्या परिसरात मानीशेणो मुख्य ओहोळाचा उगम होऊन तो वाहत शिरदोण खाडीत सामावून जातो. पठारावरून वाहत येणारे गोड्या पाण्याचे मानीशेणो, वेर्णेकरवाडा, सांतान, कुडका, पाळे, शिरदोण भागातील विहिरीत साठल्याने पिण्यास उपयोगात आणीत होते.

ओहोळांचे गोड पाणी खाडीने पात्रात घेऊन ते जुवारी नदीतून समुद्रमुखापर्यंत नेऊन तिथली वनश्री कांदळवन, बागायती, कृषी आणि तिच्यातील मत्स्य, जैविक धनाचे रक्षण केले आहे. शिरदोण खाडीच्या काठावर उड्डागाची मानस, सांतान मानस आणि भाटीची मानस या तीन मानशी तिथल्या शेतीच्या रक्षणकर्त्या ठरल्या.

कुंभाचे कुंभ भाताच्या राशी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळत होत्या. शेतातील भात, भाजी, खळीतील रुचकर मासळी आणि पावसाळ्यात पठाराच्या उतरणीवर पिकणारी काकडी, दोडकी, कारली, भेंडी, टरबूज, या अन्नावर तिथला शेतकरी जगून भविष्य घडवले. त्या खाडीच्या काठावर नारळ, आंबा, फणस पिकवून त्या रसाळ, मधुर गोड फळांचा त्यांनी आस्वाद घेतला.

कदंब पठाराच्या दक्षिण दिशेत या खाडीचा प्रवास पूर्वेकडून पश्चिम बाजूने जुवारी नदी मुखास मिळतो. तिच्या पात्रातून येणाऱ्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून सफेद रंगाचे मीठ उत्पादन करणारे शेतकरी, गरम उणे, पाव (ब्रेड) विकणारे पदेर, तिथल्या माडावर चढून ताडी काढणारे रेंदेर आणि भूमिपुत्र कष्टाचे काम करून पोट भरतात.

कोणाकार, उड्डाक, तळेशेत, भाक्रार, मायणे, वाकानी या नावांनी तिथल्या शेतीला ओळखतात. सौंदेकर राजवटीत त्यांच्या वाड्याच्या परिसरात ‘घोडेबाय’ नावाने ओळखली जाणारी ऐतिहासिक विहीर आहे. त्या काळात त्या विहिरीचे पाणी उपसा करून घोड्यांना पिण्यास आणि धुण्यास वापरीत होते, असे प्रोफेसर वाघ म्हणाले. कदंब काळात जुवारीच्या तटावर गोपकपट्टण म्हणजे आजचे गोवा वेल्हा गाव या ठिकाणी व्यापारी बंदर होते. त्या बंदरातून परदेशातील आणि गोव्यातील व्यापारी सामानाची देवाण-घेवाण करून घेत होते. ते सामान बंदराकडून घोड्यावरून कदंब पठारावरील राजमार्गाने जुने गोवे येथे आणून वितरण करीत होते.

शिरदोण खाडीच्या काठावरील उतारावर काजू, जांभूळ, भेसड, कणेर, चुरन, पिटकळ, फातरफळ, हासळ, बोर या रानमेव्याचे भांडार आहे. गोडवाल, पालकाणे, चानीवारू, कांगल, कुंफळ, धावतीवाल, कात्रेवाल, शेखड, गोडशेरा, हरकुली, घोष्ट झिरमूला अशा औषधी वेलींच्या मंडपाने तो पठार सजला आहे.

त्यांचा मंडप उभारण्यास हुरा, पंगारा, सावर, मोय, हुसकी, कुडा, शिरस, बेळ, किंदळ, मारट, हष्ट, खखत, सातीण, एळंब, अर्जुन, बहावा, निवडुंग अशा वनौषधी झाडांनी पठाराच्या खाच-खळग्यांनी आपली मुळे त्या उताराच्या जमिनीत खोलवर रुतवली आहेत. दरवर्षी पडणाऱ्या मौसमी पावसाचे पाणी साठवून ठेवले आहे. आपण जगून इतर प्राण्यांना जगण्यासाठी पाणी आणि प्राणवायू देण्याचे काम ही झाडे करीत आहेत.

पठारावरील डोंगराळ, जंगल भागात रानडुक्कर, रानमांजर, ससा, मुंगूस, घोरपड, सरडा, बेडूक, खेकडे, नागसर्प, धामण, हिरवा साप, घोणस, मांडोळ, रक्तमांडोळ, फुरसे, सोण्ण असे सरपटणारे प्राणी आणि रानटी जनावरांचे वास्तव्यस्थान म्हणून तो परिसर ओळखला जातो. या भागात पावसाळ्यात (तवशाचे) काकडीचे फेस्त साजरे होते. शिरदोण खाडीच्या काठावर जुनी घरे पाहून गोव्याच्या खऱ्या संस्कृतीची आठवण होते.

मडकी, कुंणले, गाडगा, कळसा, माल्ती, कोडफा, कदे ही मातीची भांडी जेवणास वापरीत होते. जाळी, वेणी जाळ, खुटावणी या वस्तू मासळी पकडण्यास उपयोगात आणीत होते. प्रत्येकाच्या दारात अडुळसा, येरंड, अबोली, शेवंती, सुरंग, बकुळी, लिंगड फुलझाडे असायची. गंजन, किरायते, वट्टेलाव, परिपाठ, काळजिरे, बेल, मारवा, पुनर्नवा, घाणेरी अशी औषधी झुडपे दिसायची.

आज गोवा फिरताना आपली संस्कृती आपणच विसरून नैसर्गिक गोव्याला पाश्चात्य संस्कृतीचे वेड लावलेले पाहावयास मिळते. सुंदर पठारे, डोंगर, शेती बागायतींत तोडफोड करून कॉंक्रीट जंगलांनी नटलेल्या गोव्यातील हवामान बदलत आहे. गोव्याचे ‘गोंयकारपण’ हरवत चालले आहे. किमान जे आहे ते तरी टिकवणे आपल्या हाती आहे.

- मधू य. ना. गावकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com