Goan Culture: मेषांच्या मृतात्म्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी

Goa-Konkan Shigmotsav traditions सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गोवा आणि कोकणातील बऱ्याच गावांत शिगमोत्सवाच्या कालखंडात विविध विधींद्वारे कधीकाळी जीवे मारण्यात आलेल्या मेषांच्या मृतात्म्यांचे स्मरण केले जाते.
Goan Culture: मेषांच्या मृतातम्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी
Goan CultureDainik Gomantak
Published on
Updated on

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गोवा आणि कोकणातील बऱ्याच गावांत शिगमोत्सवाच्या कालखंडात विविध विधींद्वारे कधीकाळी जीवे मारण्यात आलेल्या मेषांच्या मृतात्म्यांचे स्मरण केले जाते. यंदाही हे विधी गावकऱ्यांनी शिगमोत्सवात श्रद्धेने पाळले. गोवा कदंब राजा शिवचित्त पेरमाडीदेव यांनी ११४७ ते १९८१ या कालखंडात गोवापुरीहून राज्यकारभार सांभाळला. त्यावेळी त्याने ‘मालवहारी’ हे बिरुद धारण केले.

इतिहासकार डॉ. जी. एम. मोराईश यांनी ‘कदंबकुल’मध्ये मालव या सह्याद्रीतल्या आदिवासी जमातीचे समूळ उच्चाटन करून शिवचित्ताने ‘मालवहारी’ हे बिरुद धारण केले असल्याचे स्पष्ट केलेले आहे. सांगेतील दिघीघाटाच्या पायथ्याशी वसलेल्या उगेत हेमाडदेवाची पूजा सिद्धेश्वर मंदिर संकुलात पूर्वापार केली जाते. हा माडदेव म्हणजे शिवचित्त पेरमाडीदेव मानला जातो. त्या परिसरात जंगल निवासी असलेल्या वेळीप आणि अन्य जमातीत हेमाडदेवाविषयी आदराची भावना रूढ आहे. या परिसरातल्या जंगलात हेम्माड जमातीचे वास्तव्य होते. या हेम्माडांचे समूळ उच्चाटन केल्यामुळे शिवचित्त इथल्या परिसरात हेमाडदेव म्हणून ओळखला गेला. उगे ते तांबडीसुर्लापर्यंतचा परिसर कदंब राजवटीच्या पूर्वी हे हेम्माडाच्या वास्तव्यामुळेच ‘हेमाड बार्से’ नावाने परिचित होता. सत्तरीतून कृष्णापूरमार्गे केळंघाट ओलांडल्यावर हेम्माडगा गाव खानापूरजवळ आहे. इथेही हेम्माडांची वस्ती असली पाहिजे.

Goan Culture: मेषांच्या मृतातम्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी
Goa Opinion: पैसे मागणाऱ्यांवर बोलले तर धार्मिक भावना का दुखाव्यात? मोहनदास लोलयेकर

हेम्माड नावाने ओळखली जाणारी जंगलनिवासी जमात आजच्या सांगे-धारबांदोड्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या गावात एकेकाळी होती. आज नेत्रावळी अभयारण्यातील वेर्ले गावात ‘भूयपान्न’ नावाची देवराई असून, इथे सात शिवलिंगे आहेत; त्यांचा संबंध हेम्माडाशी असला पाहिजे. आज वेर्ले आणि परिसरात वेळीप या शिवोपासक जमातीचे वास्तव्य असून, खाचकोण, दुर्ग येथे ही त्यांची प्रचिती येते.

दख्खनच्या पठारावरून जेव्हा गोव्यात घोड्यावर आरूढ होऊन तलवारबाज मराठ्यांचे आगमन झाले तेव्हा त्यांनी कधी प्रत्यक्ष लढाईद्वारे तर कधी गनिमी काव्याच्या युद्धतंत्राद्वारे सह्याद्रीच्या जंगलात असणाऱ्या हेम्माड, हेबार, मेशे आदी नावांनी परिचित असलेल्या आदिम जमातीचे शिरकाण केले. मटण, मांस, मद्य यांचे सेवन करण्यात तर कधी षड्यंत्राद्वारे फसवून या आदिम जमातीचे उच्चाटन घोड्यावर आरूढ होऊन आणि हाती तलवार धारण करून आलेल्यांनी केले.

आपल्या स्वार्थासाठी अत्यंत क्रूरपणे हेम्माड, हेबर, मेमेशे नावांनी ओळखल्या जाणाऱ्या जंगलनिवासींची आपण जी हत्या केली ते पापकृत्य असल्याने, त्याचे क्षालन व्हावे, त्यांच्या मृतात्म्यांची वक्रदृष्टी आपल्यावर होऊ नये म्हणून फाल्गुन या चैत्र कालगणनेतील शेवटच्या महिन्यात संपन्न होणाऱ्या शिगमोत्सवात त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विभिन्न लोकविधी पार पाडले जातात.

Goan Culture: मेषांच्या मृतातम्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी
Goa Opinion Poll Day 2025: रुपेरी पडद्यावर उलगडणार ‘16 जानेर’चा संघर्ष; ‘ओपिनियन पोल’वर ‘डॉक्यु-फिक्शन’

गोवा- महाराष्ट्र सीमेवरती दोडामार्ग तालुक्यातील विर्डीत कट्टीका नाल्यात जी प्रस्तर रेखाचित्रे आढळली होती ती इथे वास्तव्यास असलेल्या मेशांची होती. आपल्या पूर्वजांनी त्यांची हत्या निर्घृणपणे कशी आणि कोठे केली हे कथन करणारी मंडळी विर्डीत हयात आहे. इथल्या शिगम्यात दुसऱ्या दिवशी केला जाणारा विधी मेश्यांची स्मृती जागवतो. शास्त्रीय संगीत क्षेत्रातले बुजुर्ग रामकृष्णबुवा वझे यांच्या वझरे गावात शिगम्याच्या दुसऱ्या दिवशी मेश्यांच्या मृतात्म्यांना शांत करण्यासाठी विशिष्ट विधी केला जातो. एका लाकडाच्या गाडीला हिरव्यागार पल्लवांनी सजवून खोत, शिरोडकर, शिंगाडी आणि घाडी हे मानी तिच्यावरती आरूढ होतात. ही गाडी गावातली तरुण मंडळी मिरवणुकीत टेंबापर्यंत ओढून नेतात आणि तेथे वेगवेगळे विधी करतात.

कधी काळी या गावात म्हणे मेशांची वस्ती होती. त्याच्या घरात काम करण्यासाठी असलेल्या बाईच्या मदतीने सध्या असलेल्या गावकऱ्यांच्या पूर्वजांनी षड्यंत्र रचले आणि त्यांची शस्त्राशस्त्रे पूर्णपणे निकामी करून टाकली. मेशे गाफील आहेत हे पाहून त्यांची कत्तल वझरेतील मेश्या धड्यार या जागेवरती केली. मारण्यात आलेल्या मेशांच्या स्मृतीप्रीत्यर्थ इथले गावकरी विधीद्वारे गाड्याला ओढून हा उत्सव साजरा करतात.

गोव्यात कदंब राजवटीत शिवचित्त पेरमाडी देवाने इथल्या मराठ्यांच्या मदतीने जंगलनिवासी जमातीचे उच्चाटन केले. सत्तरीतील करंझोळ येथे ‘हेबराचे घट्टाण’ नावाची जागा आहे. तेथे इथल्या गावकऱ्यांच्या पूवर्जांनी हेबरांची हत्या केल्याची लोककथा सांगितली जाते. कुडशे येथील पाषाणी मूर्ती मेशांच्या असल्याचे सांगून त्यांची पूजा स्थानिक करत नाहीत. शिगम्यात केले जाणारे इथले वेगवेगळे विधी मेशे, हेबर; हेम्माड यांची कटू स्मृती जागृत करतात.

Goan Culture: मेषांच्या मृतातम्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी
Goa Opinion: सरकार जिंकून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपते का? गोव्यासाठी नागरिकांनी 'काय' घ्यावी भूमिका?

गोव्याच्या सांगे येथील जंगलसमृद्ध अशा नेत्रावळी या अभयारण्य क्षेत्रात वेर्ले म्हणून जो गाव आहे तेथील ‘भुंयपान्न’ या देवराईत ज्या पाषाणी मूर्ती आहेत, त्यांचा संबंध हेम्माड या रानटी जमातीशी असल्याचे मानले जाते. गोवा कदंबनृपती शिवचित्त पेरमाडी देवाने हेम्माड जमातीचे उच्चाटन करून आपली सत्ता प्रस्थापित करण्याचे ठरवले आणि त्यानुसार लढवय्या शूरवीरांच्या मदतीने षड्यंत्र रचून हेम्माडांचे शिरकाण केले. आणि त्यानंतर आपणास हेम्माडदेव हे बिरुद लावले. आज उगे येथे सिद्धेश्वर मंदिराच्या संकुलात असलेले हेम्माड देवाची पाषाण मूर्ती आम्हांला इतिहासाच्या उदरात लोप पावलेल्या हेम्माड जमातीविषयीची स्मृती जागृत करते.

सत्तरी, धारबांदोडा आणि सांगे या तालुक्यांशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र- कर्नाटकातल्या बऱ्याच गावांत हेम्माड, हेबर, मेशे यांच्या शिरकाणाविषयीच्या लोककथा प्रचलित असून वर्षात शिगमोत्सवाप्रसंगी अथवा अन्य लोकोत्सवानिमित्त त्यांच्या स्मरणार्थ लोकविधी केले जातात तेव्हा इतिहासाचे वेगवेगळे पैलू प्रकाशात येतात.

आज तांबडी सुर्ल गावातल्या महादेव मंदिराकडे जाताना वाटेत बाराभूमिका देवी मंदिराविषयीचा फलक दृष्टीस पडतो. बोरयाळे, म्हातकण, धारगे, बोडट्टर तयडे अशा बाराभूमीत वास्तव्यास असणाऱ्या लोकमानसाची अधिष्ठात्री म्हणून बाराभूमिकादेवीचे पूजन श्रद्धेने केले जाते. गोव्याचे सांस्कृतिक इतिहासकार अनंत रा. शे. धुमे यांनी दख्खनच्या पठारावरून गोव्यात आलेल्या मराठ्यांनी बाराभूमी जिंकून घेताना तेथील जंगल प्रदेशात वास्तव्य करून असणाऱ्या वन्यजमातींचे शिरकाण करून आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे नमूद केलेले आहे.

Goan Culture: मेषांच्या मृतातम्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी
Goa Opinion: सिद्दीकी प्रकरणानेही सरकारवर लांच्छनाचे गालबोट; वाचा विशेष लेख

शेकडो वर्षांपूर्वी गोवा-कोकण भूमीत इथल्या निसर्ग आणि पर्यावरणात देवत्व अनुभवत जीवन जगणाऱ्या या वन्यजमाती आज राज्यात अनुसूचित जमातींचा दर्जा मिळवलेल्या गावडा, वेळीप आणि कुणबी यांचे पूर्वज होते का? हे निश्चित सांगता येण्यासाठी अजून ठोस पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. या कोड्याची जेव्हा उकल होईल तेव्हाच त्याविषयी ठोस भाष्य करणे शक्य होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com