
मधू य. ना. गावकर
आपले पूर्वज आपापसात बोलणी करीत ओहोळाच्या काठावरील कुळागर, शेतीत काम करीत होते. त्यामुळे ते आपल्या भावभावनांत गुरफटून जायचे. शेताभाटात काम करण्याची त्यांची रांगडी पद्धत म्हणजे त्यांच्या जगण्यातील संघर्षातून ते निसर्गाशी एकरूप झाले होते. हे सारे ओहोळाच्या काठाने फिरताना जाणवते.
मूठभर श्रीमंत लोकांनी पदव्या घेऊन प्रगती साधण्यापेक्षा बलदंड मनगटाचा शेतकरी दांभिकतेचा स्पर्श नसलेले मोकळे जगणे जगत होते. इथल्या लहरी आणि उद्दाम निसर्गाचा भाग बनून खडतर जीवन जगत होते. त्यांचे जगणे चैतन्याने भारलेले होते. पूर्वकाळी आपल्या एखाद्या सहकाऱ्याच्या शेतपिकावर संकट कोसळले तर त्याला बी बियाणे देऊन सहकार्य करीत होते. हे त्यांचे विचार निसर्गाच्या आपत्तीशी झुंज देणे आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ते एकत्र येऊन त्या संकटाला सामोरे जाण्यासाठी एकमेकांना साहाय्य करायचे. सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वरावर विश्वास ठेवून सदसद्विवेक जागृत ठेवून वागायचे. शेती, बागायतीत काम करणाऱ्या शेतकऱ्याचे जीवन मोकळेढाकळे, अकृत्रिम असते.
‘दुःख हे सुखासारखे नसते, एका झाडाच्या बुंध्यावर कुर्हाडीचे अनेक घाव घातल्याने ते झाड थरथरत करकर आवाज देत जमिनीवर कोसळते, तेव्हा आपल्या मनात खून केल्याची जाणीव होते. मृत्यू हा निसर्गक्रमाचा एक भाग आहे’. आयुष्यभर कष्ट करीत जगलेल्या थिओडोरने मृत्यू स्वीकारताना हे उद्गार काढले आहेत. मात्र आज माणसाच्या शरीरावरील जखमांपेक्षा त्याच्या आत्म्याची चिरफाड अधिक होत आहे. हे आजच्या भविष्याने थांबवले पाहिजे, आपले पूर्वज संतांनी सांगितलेल्या सत्य, शिव आणि सुंदर या एकात्मकतेने ईश्वराच्या नावे काम करीत सुखी जीवन जगले होते.
समुद्राला पहाटेचा स्पर्श होताना उंच उडणाऱ्या लाटांच्या मर्मध्वनीमुळे शांततेचा भंग होतो. सुखाची झोप घेताना लाभलेली शांतता, ‘कष्ट करायचे आहेत’, या विचाराने भंग होत असे. पण, हे सारे कष्ट ते निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी करायचे. निसर्गातून जेवढे हवे तेवढेच घेण्यासाठी ते काबाडकष्ट करायचे.
ते करताना येणाऱ्या घामालाही कष्टांचा सुगंध होता आणि त्यानंतर मिळालेल्या निसर्गाचे दान घेताना येणाऱ्या आनंदाच्या अश्रूंना अमृताचे मोल होते. ओहोळाच्या काठाने जंगलातील उगमाकडे जाताना वाऱ्यावर डोलणाऱ्या वनवासी फुलाचा सुगंध आणि त्याचा स्पर्श आपल्या मनाला उल्हसित करतो.
याचा अनुभव घेत आपण पूर्वजांच्या विचारांनी काम केल्यास चैतन्य लाभेल. कारण त्यांनी काम करताना आपले घर, वाडा, गाव यात भेदभाव ठेवला नव्हता. प्रत्येकाच्या सामूहिक सहभागातून त्यांनी निसर्गाचे स्रोत प्राणपणाने जपले. जमीन सुपीक ठेवली. आज त्याच हजारो वर्षे त्यांनी जपलेल्या सुपीक मातीची आम्ही वाट लावत सुटलो आहोत. मिळेल तिथे खनन करून, काळे डांबर, रासायनिक सिमेंट आणि नदीपात्रातील रेतीचा वापर करून पूर्वजांच्या वाटेवर काटे उभे करून मोकळे झालो आहोत.
अशा माझ्या पूर्वजांच्या ज्ञानी विचारांचे ओझे डोक्यावर घेत वाघुर्मे ओहोळाला निरोप देऊन भूतखांब पठाराच्या पायथ्याच्या वळणदार रस्त्यावरून स्कूटरने निघालो.
सावईवेरे कांगवाळ ओहोळाच्या काठाजवळ पोहोचलो. कांगवाळ भागातील कुळागर आणि शेतीला थंडावा देण्याचे काम गेली हजारो वर्षे हा ओहळ करत आहे. कांगवाळ भाग भूतखांब पठाराच्या एकदमच खाली आहे. त्या ओहोळाचा उगम ज्या तळ्यातून होतो, ते तळे भूतखांब पठाराच्या घळीत आहे. या तळ्यावर रात्रीच्या वेळी गवे, बिबटे, मेरू, डुक्कर, ससे, सरपटणारे प्राणी आणि पक्षी पाणी पिण्यासाठी येत.
हे तळे साधारण पाचशे-सहाशे वर्षांपूर्वी बांधले गेले असावे. त्याच प्रकारचे बांधकाम देवळाय खांडोळा, तामसुली ओहोळाच्या उगमाकडील पालसरे, विजयादुर्गा केरी, चिकणगाळ शिरोडा, आगापूर बेतकी तळे अशा कैक ओहोळाच्या उगमाकडील भागात पाहायला मिळते.
पूर्वजांनी ओहोळांचे पाणी अडवण्याची सोय केली होती. कांगवाळ ओहळ तळ्याची बांधली पार करून या भागातील उंचावरील जंगल आणि काजू बागायतीला पाणी देत मोठ्या खळखळट करत खालच्या भागातील कांगवाळ परिसरातील कुळागरांना सिंचनासाठी पाणी पुरवतो आणि शेताकडील वरच्या बांधलीकडे पोहोचतो.
कांगवाळ परिसरात पूर्वजांनी उतरणी भागात अतिउंचावर वाफे तयार करून मोठ्या कुळागराची लागवड केली. बऱ्याच दूरपर्यंत पाटाने पाणी नेऊन सुपारी आंबा, फणस, मिरी, ओटम, कोकम, नारळ अशा प्रकारच्या झाडांनी हिरवीगार कुळागरे तयार करून आपले जीवन त्या ओहोळाचे पाणी वापरून पिकांचे, फळांचे उत्पादन घेतले.
तिथल्या लोकांच्या पूर्वजांनी ओसाड जमीन लागवडीखाली आणण्यासाठी झर, तळी, ओहोळाचे पाणी बंधाऱ्यात साठवून ते पाणी पाटाने दूरवर नेले. हे पाणी वापरून शेती, कुळागरे निर्माण करताना ते झिजून गेले हे खरे, पण आमच्यासारखे गंजून गेले नव्हते. येणाऱ्या अडथळ्यांना क्षणिक मानीत त्यांनी धैर्याने तोंड दिले होते. म्हणूनच इतकी वर्षे ही जमीन सुपीक उरली. मात्र आज आपण त्यांच्या कृषी विकासाला आणि त्यांनी जगवलेल्या पर्यावरणाला विकासाच्या नावाने बाधा आणत आहोत. पर्यावरण जतनाचा त्यांचा इतिहास व त्यांनी भविष्यासाठी केलेला विचार यांना आपण तिलांजली देत आहोत.
शेताकडील बांधलीकडून ओहोळाचा प्रवाह खालच्या परिसराला पाणी देत शेतातील बानयार ठिकाणी पोहोचतो. तिथून खळीत प्रवेशून खाऱ्या पाण्यात गोड्या पाण्याने मीलन घडवतो.
जलचरांना पोषक वातावरणाची निर्मिती करून खळीतून पुढे जातो. थापणार या ठिकाणी मांडवीस मिळतो. कांगवाळ परिसरात देवशेत, सातेरी-पात, दवणीक, बल्लशेत, अजामत, कोयते माडक, कोलेखाजन, जुयेर, बानवणी नावांनी ओळखणारी सरद-वायंगण भातशेती जगवतो. उगमाकडील शितला तळ्यातील पाण्याच्या आधारावर वाहणाऱ्या ओहोळाचा लांब प्रवाह पठाराच्या घळीतून वाट काढीत भूतखांब पठाराच्या कठड्यावरून कोसळतो.
पांढऱ्या शुभ्र धबधब्याच्या रूपाने आवाज करत खालची जमीन भिजवतो. तिथले जंगल, कुळागर, बागायती आणि शेती फुलवतो. कांगवाळ भागातील स्थानिकांच्या पूर्वजांनी जंगलाच्या खालच्या भागात काजू लागवड करून पठाराच्या कठड्याची होणारी झीज थांबवण्याचे मोठे कार्य केले आहे.
या भागात चुरण, कणेर, भेसड, करवंद, जांभूळ, फातरफळ, बकुळ, रानमेवा पाहावयास मिळतो. बागायतीत आंबा, फणस, सुपारी, नारळ, मिरी, कोकम, ओटम, जाम झाडांनी ओहोळाचे दोन्ही काठ हिरवेगार करून तिथल्या पूर्वजांनी वसुंधरेचे सौंदर्य उभे केलेले पाहावयास मिळते. ओहोळाच्या काठी आपले पूर्वज मातीच्या भिंती उभ्या करून त्या भिंतीवर माडाचे वासे, माडीच्या (पोफळ) कांबीचे आच्छादन करून त्यावर माड, सुपारी, अगर गवताचे छप्पर शिवत होते. या टुमदार थंड घरांत राहून सुखी जीवन जगले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.