
डॉ. संगीता साेनक
हल्लीच एकदा राजेंद्र केरकर यांची मिरामार येथे भेट झाली. बोलता बोलता त्यांनी मला सहज विचारले की मी देवरायांविषयी का लिहीत नाही. खरे तर हा माझा विषय नाही. वन खात्यातील कर्मचाऱ्यांशी हल्ली संपर्क आल्यामुळे गोव्यातील काही देवराया मी पाहिल्या.
केरकरांनीही काही देवराया दाखवल्या. त्यांचा या विषयावरचा अभ्यास खूप गाढा आहे. या विषयावरचे त्यांचे ज्ञान फार आहे. पण त्यांच्या आग्रहाखातर माझ्या नजरेतून हा लेख लिहावा असे वाटले. तसे केरकर माझे गावबंधू आहेत. ते केरीचे आणि मी साखळीची, माझे वडील अनेक वर्षे केरीजवळच्या मोर्ले गावात स्थायिक झालेले. अठरा वर्षे पर्येचे सरपंच म्हणून त्यांनी काम केले. म्हणून गोव्याच्या या भागाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आले.
‘आजोबाची राय’ ही केरीची देवराई. आमच्या घरापासून फार लांब नाही. एका टेकडीवर सातेरी-केळबाईच्या मंदिराजवळ असलेल्या या देवराईचे गावकऱ्यांनी अनेक वर्षे संरक्षण केले आहे.
अतिशय नयनरम्य असलेल्या या देवराईतील प्रमुख वृक्ष म्हणजे करमल, खास्त, किवन, कोसंब, आमो, घोस्टिंग, मरत, नानो, सात्विन, पानस, शिदम, भिल्लो-माड, पाव, घोळ आणि खरवत. झाडे-झुडपेही येथे विपुल आहेत. झाडांप्रमाणेच हा परिसर कीटकांपासून ते सस्तन प्राण्यांपर्यंत अनेक प्राण्यांना आदर्श अधिवास आणि संरक्षण देतो.
‘आजोबा’ हे एक अदृश्य पवित्र आत्मा वा जंगलाचे प्रमुख देवता मानले जातात आणि सर्व गावकरी त्यांचा मनापासून आदर करतात. या जंगलाला ‘आजोबा’चे निवासस्थान मानले जाते. कुणीही या जंगलाला कोणतेही नुकसान करण्याचे धाडस करत नाही.
या पवित्र जंगलात लघवी करणे, थुंकणे, धूम्रपान करणे आणि वाईट शब्द (अश्लील भाषा) वापरणे यासारख्या क्रियाकलापांना सक्त मनाई आहे. कधीकधी पशुधन चरणे आणि इंधनासाठी कोरड्या फांद्या गोळा करणे यांना परवानगी असते. विशेष प्रकरणांमध्ये जेव्हा सामुदायिक कारणांसाठी लाकूड गोळा करण्याची आवश्यकता असते, तेव्हा ‘आजोबां’कडून परवानगी घेतली जाते.
जे लोक या देवराईशी संबंधित निषिद्ध असलेल्या बंधनांचे पालन करत नाहीत त्यांना आजार किंवा दुर्दैवाचा सामना करावा लागतो, असे मानले जाते. म्हणून, कोणीही या निषिद्धांचे उल्लंघन करण्याचे धाडस करत नाही. या देवराईप्रमाणेच केरी येथे सह्याद्रीच्या वाघेरी आणि मोर्लेगड या टेकड्यांमध्ये अजून काही देवराया आहेत; बलद्याची राय, कोमाची राय, बिरमन्याची राय, पनवेलीची राय, होर्न्याची राय, ओरलाची राय, पिश्याची राय, अबदुर्ग्याची राय आणि माउलीची राय.
हुलान डोंगराच्या सावलीत असलेल्या सत्तरीच्या करंझोल गावात करालची राय, गवळाची राय, हुनुलयाची राय आणि होलेयची राय अशा चार देवराया आहेत. या चारांपैकी, होलेयची राय ही सर्वात मोठी आहे. वाळपई येथे ब्रह्मकरमळी गावात ब्रह्मदेवांचे एक देऊळ आहे. या देवळाजवळ एक देवराई आहे. ही देवराई ‘आजोबाची तळी’ म्हणून ओळखली जाते.
येथे सदाहरित झाडे आहेत, औषधी वनस्पती आहेत. या देवराईच्या आत एक बारमाही झरा आहे. या देवराईचे वेगळेपण म्हणजे ती ‘कॉमन बर्डविंग’, ‘स्ट्राइप्ड टायगर’, ‘कॉमन क्रो’, ‘ब्लू ओक लीफ’, ‘कॉमन ग्रास येलो’, ‘ग्लॉसी टायगर’ यांसारख्या विविध रंगीबेरंगी फुलपाखरांचा अधिवास आहे.
‘मलबार ट्री निंफ’ नावाच्या एका राखाडी-पांढऱ्या रंगाच्या मोठ्या फुलपाखराचा येथे आढळ आहे. किंबहुना हे या देवराईचे मुख्य आकर्षण आहे. भारतीय फुलपाखरांमध्ये बहुतेक हे सर्वात हळू उडणारे आहे. कधीकधी ते एकाच ठिकाणी सहजतेने घिरट्या घालताना दिसते.
एकदा केरकरांबरोबर आम्ही ‘निरंकाराची राय’ या नानोडे येथील एका देवराईत गेलो होतो. या देवराईचे वैशिष्ट्य म्हणजे दलदलीत वाढणारी ‘मिरिस्टिका स्वाम्प’ या प्रजाती असलेली झाडे. आम्ही तिथे गेल्याबरोबर खळखळ वाहणाऱ्या झऱ्याने आमचे लक्ष वेधून घेतले. तिथे अगदी थंडगार वाटत होते.
मागे हिरवीगार शेते, पोफळीची झाडे, नारळ, केळीच्या बागा. निसर्गरम्य परिसर. जवळच असलेले निरंकाराचे देऊळ. त्या दलदलीत मोठीमोठी झाडे दिसत होती. खारफुटींच्या झाडासारखीच यांची मुळे अधूनमधून जमिनीतून वर डोकावत होती, परत जमिनीत जात होती. प्राणवायूसाठी त्यांना जमिनीतून वर डोकावणे भाग पडत होते.
या झाडांना बारमाही पाण्याच्या स्रोताची आवश्यकता असते. ही झाडे आणि ‘मिरिस्टिका स्वाम्प’ दुर्मीळ आहेत, देशज (एण्डेमिक) आहेत, केवळ पश्चिम घाटात यांचा आढळ आहे. भारतात उत्तर कन्नडा, केरळ, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि गोवा अशा चार ठिकाणीच ही सापडतात. हे वृक्ष खूप जुने आहेत, काही कोटी वर्षांपूर्वीचे असावेत असे जीवशास्त्रज्ञांचे मत आहे.
आययूसीएन या निसर्ग संवर्धन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने या झाडांना असुरक्षित घोषित केले आहे. महाराष्ट्रात अशा अधिवासाला ‘जैविक वारसा स्थळ’ घोषित केले गेले आहे. गोव्यातील या निरंकाराच्या राईलाही संरक्षण मिळाले पाहिजे. शासनाकडून, विशेषतः गोवा राज्य जैवविविधता मंडळाकडून या अधिवासाच्या संवर्धंनासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजेत.
गोव्यात सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, फोंडा आणि वाळपई येथे अनेक देवराया आहेत. वाळपई येथील कोपर्डेमधील ‘देवाची राय’ ही देवराई केवड्यासाठी प्रसिद्ध आहे. ही देवराई ब्राह्मणी मायेच्या देवळाजवळ आहे. केवड्याची बने जमिनीतील ओलावा वर्षभर टिकवून ठेवतात. त्यामुळे ही देवराई वर्षभर हिरवीगार राहण्यास मदत होते. केपे येथे पाईकदेव या देवतेचे महत्त्व आहे. येथे वेळीप समाजाने संवर्धन केलेल्या देवराया आहेत.
शतकानुशतके आदिम समाजाने संवर्धन केलेल्या गोव्यातील या देवरायांत अनेक दुर्मीळ वनस्पती प्रजाती सापडतात. पण या देवरायांवर शोधकाम पाहिजे तेवढे झालेले नाही. हल्ली माझे वर्गबंधू डॉ. डेरिक मोन्तेरो यांनी देवरायांवर शोधकाम करून पीएचडीची पदवी मिळवलेली आहे. ह्या देवरायांमुळे भूजल पुनर्भरण करण्यास मदत होते.
या देवराया मातीची झीज कमी करतात आणि सुपीकता वाढवतात, त्या कार्बन संचयनाचे कार्य करतात. या देवराया म्हणजे आदिम समाजाने शतकानुशतके संवर्धन केलेल्या दुर्मीळ जनुकांचा साठा आहे. जैवविविधता संवर्धंनाच्या पारंपरिक संस्था आहेत. हा साठा टिकवून ठेवणे मानवकल्याणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.