Rajiv Gandhi: खासदार शांताराम नाईक यांनी प्रश्न उपस्थित केला, राजीवजींनी संमती दिली आणि गोवा घटक राज्य झाले

Rajiv Gandhi Death Anniversery: राजीव गांधींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पहिले काम कोणते केले असेल, तर त्यांनी आपल्या देशात आणलेली संगणक क्रांती.
RaJiv Gandhi Death Anniversery
RaJiv GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. देशभर ती ‘दहशतवाद विरोधी दिन’ म्हणून पाळली जाते. देशाच्या अंतर्गत फोफावलेला दहशतवाद नष्ट करण्यासाठी आणि पाकिस्तान व चीन या आमच्या शेजारील राष्ट्रांकडून माजविला जाणारा दहशतवाद निपटून काढण्यासाठी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत ज्यांनी अहर्निश प्रयत्न केले त्या दहशतवादाचे आणि अतिरेक्यांचेच ते बळी ठरले.

आज त्यांच्या पुण्यतिथी दिनीही नुकतेच भारत-पाकिस्तान युद्ध भडकले; त्या पार्श्वभूमीवर आज दहशतवाद मुळापासून उपटून काढण्यासाठी प्रयत्नशील राहणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे. नाही तरी ‘ऑपरेशन सिंदूर’चा मास्टरस्ट्रोक देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पुढे चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याची व दहशतवादाचे भूत कायमचे गाडून टाकण्यासाठी पाकिस्तानशी चर्चा करण्याचा जो मनसुबा प्रकट केला आहे, ते खूप काही सांगून जातो.

राजीव गांधींनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पहिले काम कोणते केले असेल, तर त्यांनी आपल्या देशात आणलेली संगणक क्रांती. गेली दहा वर्षे या संगणक क्रांतीच्या मार्गदर्शनाने जी भारताने प्रगती केलेली आहे, ती फारच महत्त्वाची आहे, हे मान्य करतानाच राजीव गांधीच्या या धोरणाला भाजपने तेव्हा कडाडून विरोध केला होता, हे सत्यही नाकारता येणार नाही.

आतापर्यंत आपल्या देशाला लाभलेल्या पंतप्रधानांपैकी राजीवजी हे सर्वांत तरुण पंतप्रधान होते आणि त्यामुळे त्यांची राज्यांच्या, देशाच्या प्रगतीस युवाशक्ती फार महत्त्वाची ठरली होती. या शक्तीला मतदानाचा हक्क प्रदान करताना त्यांनी म्हटले होते, आपल्या देशाची सभ्यता, परंपरा आणि संस्कृती युवा पिढीने समजून घेणे आवश्यक आहे.

ज्यांनी आपल्या स्वातंत्र्याची चळवळ पाहिली नाही, त्यानंतर आपल्या देशाने केलेली आणि करत असलेली चौफेर प्रगती पाहिली नाही, त्यांना ती समजावून सांगितली पाहिजे. ही युवाशक्तीच मग आपल्या देशाने खरे आधारस्तंभ होतील, आणि शिकवण त्यांना दिली पाहिजे.

युवा पिढीने आपल्या देशाचा इतिहास, भूगोल समजून घेताना इतर देशांचाही अभ्यास केला पाहिजे. अशा या पिढीला त्यांच्या आवडीचे शिक्षण विनासायास मिळाले पाहिजे. म्हणजे ते आपल्या देशाचा, विदेशांचा अभ्यास करून आमच्या एकतेत विविधता आणि विविधतेत एकता यांचे पालन करून राष्ट्रैक्यासाठी व राष्ट्रीय एकत्मतेसाठी आपले योगदान देऊ शकतील.

राजीवजींनी युवाशक्तीबरोबरच स्त्रीशक्ती बलवान बनेल हे पाहिले. त्यांनी सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करून ‘हम भी कुछ कम नही’ याचा दाखला इतर महिलावर्गाला घालून दिला पाहिजे असे सांगून महिलांसाठी खास योजना राबविल्या.

गरिबांतल्या गरीब बेघराला स्वत:चे घर असले पाहिजे म्हणून इंदिरा गांधी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत वीस कलमी कार्यक्रमांचे नियोजन केले होते, राजीवजींनी ‘नवीन वीस कलमी कार्यक्रम’ असे त्याला स्वरूप देऊन देशातील प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय कशी होईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरविले होते.

राजीवजींना वाटत होते की, एकविसाव्या शतकात पदार्पण करणारा आपला भारत देश हा असा धर्मनिरपेक्ष देश जो की सर्वधर्मसमभावाची कल्पना मूर्त स्वरूपात आणू शकणारा असला पाहिजे.

तसेच या देशातील अठरापगड जातीच्या, सर्वांच्या धर्मांचा सार्थ अभिमान बाळगून प्रत्येक धर्मातील चांगली तत्त्वे अमलात आणून आपल्या देशाची सार्वभौम एकात्मता दृढमूल करू शकेल, अशा पद्धतीने राबवली गेली पाहिजेत.

या देशातील शोषित, पीडित अशा दलित, आदिवासी समाजाकडे आपण विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, यावर त्यांचा भर होता. जोपर्यंत हा दबलेला, पिळला गेलेला अत्याचार, जुलूम जबरदस्ती यांची शिकार बनलेला समाज सम पातळीवर येत नाही, तोपर्यंत आपल्या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती झाली असे म्हणता येणार नाही.

म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीत या रंजल्यागांजल्या समाजाच्या उत्थानासाठी राज्यांपासून केंद्रापर्यंत विविध योजना, संकल्पना राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्यांचा प्रचार आणि प्रसार होईल याकडे लक्ष वेधले होते.

राजीवजींचे स्मरण करताना गोमंतकीयांना त्यांची विशेषत्वाने आठवण होते, याचे कारण म्हणजे त्यांनी आम्हा गोमंतकीयांच्या इच्छेचा मान राखून त्यांनी आम्हांला प्रदान केलेले घटक राज्य. पूर्वी ठरल्याप्रमाणे तत्कालीन खासदार अ‍ॅड. शांताराम नाईक यांनी शून्य प्रहराला हा प्रश्न उपस्थित केला. अर्थात, याबाबत पंतप्रधान राजीवजी आणि गृहमंत्री सरदार बूटासिंग यांच्यात पूर्वीच चर्चा झाली होती. राजीवजींनी या मागणीला संमती दिली होती आणि गोवा राज्याला घटक राज्याचा दर्जा प्रदान केला गेला.

Rajiv Gandhi
Former Prime Minister Rajiv GandhiDainik Gomantak

राजीवजींनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. उलट विरोधकांच्या रास्त मागण्यांनाही त्यांनी कधी नकारघंटा दाखविली नाही. मा. अटलबिहारी वाजपेयींच्या बाबतीतले एक उदाहरण येथे देतो, वाजपेयीजी एका दुर्धर रोगाने पीडित होते आणि त्यासाठीच्या खास औषधोपचारांसाठी अमेरिकेला जाणे आवश्यक होते.

राजीवजींच्या कानावर ही गोष्ट येताच, त्यांनी वाजपेयींशी संपर्क साधला व त्यांना म्हणाले, ‘मी एक संसदीय मंडळाचे शिष्टमंडळ अमेरिकेला पाठवणार आहे. त्यात तुमचा समावेश आहे. तुम्ही तेथे पोचल्यावर प्रथम तुमच्या औषधोपचारांना सुरुवात करा. सर्व काही व्यवस्थित होईल’. ठरल्याप्रमाणे शिष्टमंडळासोबत वाजपेयींजी अमेरिकेला गेले.

RaJiv Gandhi Death Anniversery
Rajiv Gandhi: डिजिटल इंडियाचे शिल्पकार

बरे होऊन ते नवी दिल्लीच्या विमानतळावरून सरळ राजीवजींना भेटायला गेले. म्हणाले, ‘धन्यवाद आपने मुझे नयी जिंदगी दे दी|’ अटलजी हे व्यक्तिमत्त्व म्हणजे कवी, गाढे वाचक व सहृदय आणि प्रामाणिक राजकारणी होते. त्यामुळेच त्यांनी सरळ विमानतळ ते राजीवजींचे निवासस्थान असा प्रवास करणे आपले कर्तव्य मानले.

RaJiv Gandhi Death Anniversery
Rajiv Gandhi: राजीव गांधी यांची जयंती 'सद्भावना दिवस' म्हणून का साजरी केला जातो?

राजीवजी यांचा जन्म २० ऑगस्ट १९४४ रोजी झाला व ते २१ मे १९९१ या दिवशी ते हुतात्मा झाले. व्यवसायाने वैमानिक असलेले राजीवजी ऐन उमेदीच्या काळात हौतात्म्य पत्करून राजकारणातून कायमचे पडद्याआड गेले. नपेक्षा ते भारताच्या राजकीय वाटचालीत देशाची आणखी प्रगती होऊन आपला कृषिप्रधान देश सुजलाम सुफलाम होऊन आणखी प्रगतिपथावर गेला असता. ती त्यांची उणीव डॉ. मनमोहन सिंग, पी. व्ही. नरसिंह राव, नरेंद्र मोदी हे पूर्णत्वास नेत आहेत, ही समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल.

राजीवजींच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र श्रद्धांजली!

शंभू भाऊ बांदेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com