Ravi Naik : ‘असुनी नाथ मी अनाथ'! अजूनही फोंडावासीयांना ’पात्रांव’ आमच्यात नाहीत, हे खरेच वाटत नाही..

Ravi Naik: आज तसा आदरयुक्त दरारा असलेला रविंसारखा नेता फोंड्यात सध्या तरी दुसरा दिसत नाही. रविंच्या निधनाला महिना झाला तरी फोंडा चाचपडतच आहे. आणि फोंडा पूर्वपदावर कधी येईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.
Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik’s LegacyDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांच्या आकस्मिक निधनाला आता एक महिना झाला. १४ ऑक्टोबर रोजी रविंचे हृदयविकाराने निधन झाले होते. पण एक महिना होऊनही रविंच्या आठवणी काही पुसल्या जात नाहीत. खास करून फोंड्यात याचा प्रत्यय येत आहे.

रवि व फोंडा यांचे अतूट असे नाते होते. १९८४साली जेव्हा ते फोंड्यातून पहिल्यांदा निवडून आले तेव्हापासून ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे ४१ वर्षे हे नाते अबाधित राहिले. १९८९साली ते मडकईतून निवडून आले होते.

तरीही त्यांचे लक्ष फोंड्यावरच असायचे. १९९४साली त्यांचा मडकई मतदारसंघातून पराभव झाला, तरीही फोंड्याशी जुळलेली नाळ काही तुटू शकली नाही. २०१२साली तर त्यांचा फोंड्यातच पराभव झाला होता. पण तरीही त्यांच्या खडपाबांध येथील कार्यालयाकडे होणारी गर्दी कमी झाली नव्हती.

ते फोंडा मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले होते. आणि त्यामुळेच अजूनही फोंड्याच्या लोकांना ’पात्रांव’ आमच्यात नाहीत, हे खरेच वाटत नाही! रवि म्हणजे फोंड्यातील अनेकांच्या हक्काचे स्थान होते. म्हणूनच गेला महिनाभर फोंडावासीयांची स्थिती, ‘असुनी नाथ मी अनाथ’ अशी झाल्यासारखी वाटते आहे.. त्यांचे अनेक कार्यकर्ते अजूनही गोंधळलेल्या, बावरलेल्या स्थितीत दिसत आहेत.

रविंच्या पाऊलखुणा फोंड्यात अजूनही ठिकठिकाणी प्रतीत होत आहेत. पोकळी निर्माण होणे म्हणजे काय, याची प्रचिती सध्या फोंडावासीय घेत आहेत.

रवि ‘क्राउड पुलर’ म्हणून प्रसिद्ध होते. ते जातील तिथे गर्दी जमायची. त्यामुळे ’पात्रांव’ एखाद्या कार्यक्रमाला येणार म्हणून कळले की लोकांची तिथे हमखास उपस्थिती असायचीच. गेल्या महिन्याभरात सगळेच कसे अगदी सुने सुने वाटत आहे.

नगरपालिका, पंचायत आहे खरी, पण तिथेही उत्साह दिसत नाही. नगरपालिकांच्या बैठकांना आमदार म्हणून रवि हजर असायचे. पण गेल्या महिन्याभरात तिथेही जोष लुप्त झाल्यासारखा झाला आहे.

रविंचा उत्तराधिकारी कोण याचेही उत्तर अजून सापडलेले नाही. भाजप याबाबतीत अजूनही गेम खेळत आहे, तर कॉंग्रेस चाचपडत आहे. मगोचे डॉ. केतन भाटीकर यांनी आपण रिंगणात उतरणार असे जाहीर केले असले तरी मगो भाजपबरोबर राहणार असल्यामुळे त्यांना अपक्ष म्हणून उभे राहावे लागणार अशी चिन्हे दिसायला लागली आहेत.

आता लवकरच झेडपी निवडणूक होणार असल्यामुळे तिथेही ’पात्रांवा’ची अनुपस्थिती जाणवणार आहे. रविंनी या निवडणुकीकरता ठोस अशी रणनीती आखायला सुरुवात केली होती. आता त्यांच्या अनुपस्थितीत फोंड्याचे भाजप नेते कोणती पावले उचलतात ते बघावे लागेल.

Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik Tribute : 'रवी नाईक' गोमंतकीयांसाठी होते जननेते! मडगावचो आवाजतर्फे ‘रिमेंबरिंग पात्रांव’ शोकसभा

ते अध्यक्ष असलेली फर्मागुडी येथील ‘फोंडा एज्युकेशन सोसायटी’ही अजूनही सावरलेली दिसत नाही. १९९२सालापासून ते या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते.

त्यांच्याच कारकिर्दीत या संस्थेच्या एका इमारतीच्या २० इमारती व बीएड महाविद्यालय तसेच फार्मसी महाविद्यालयांसारखी व्यावसायिक महाविद्यालये सुरू झाली होती. आज ही संस्था पाच शैक्षणिक आस्थापने चालवीत आहे. ते या संस्थेच्या कारभारात जातीने लक्ष घालत असत. कितीही कार्यरत असले तरी ते आठवड्यातून तीन-चार वेळा तरी या संस्थेला भेट देत असत.

बहुधा ते फार्मसी कॉलेजच्या आपल्या कार्यालयात बसत असत आणि तिथूनच ते आपला कार्यभार सांभाळत. आता त्यांना जाऊन महिना झाला असला तरी त्यांच्या ‘स्टाफा’ला ते गेले असे वाटतच नाही. ‘सर होते तेव्हा कॉलेजमध्ये एक वेगळेच वातावरण असायचे. काही झाले तरी सर आहेत अशी आमची भावना असायची’, असे या संस्थेतील अनेक शिक्षकांनी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सांगितले.

रविंची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे त्यांच्याप्रति असलेला आदरयुक्त दरारा. आणि हा दरारा कमवायला त्यांना अनेक वर्षे लागली होती हेही तेवढेच खरे. त्यांच्याभोवती असलेले वलयही हा दरारा निर्माण करण्यास कारणीभूत होते.

Roy or Ritesh to Get Fonda Bypoll Ticket?
Ravi Naik: काँग्रेसने 'रवीं'ना खरेच न्याय दिला नाही?

आज तसा आदरयुक्त दरारा असलेला नेता फोंड्यात सध्या तरी दुसरा दिसत नाही. त्यामुळे रविंच्या निधनाला महिना झाला तरी फोंडा चाचपडतच आहे. आणि फोंडा पूर्वपदावर कधी येईल हे सांगणे सध्या तरी कठीण आहे हेही तेवढेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com