
डॉ. मधू घोडकिरेकर
टॉवर उभारणे शक्य नाही, हे टॉवर कंपनीनेही मान्य केले आहे. तरी यानिमित्ताने, भूसंरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा शिष्टाचाराच्या चौकटीत राहून थेट प्रश्न विचारणारा जागरूक ग्रामस्थ गोव्याच्या एका तरी खेड्यात उपलब्ध आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
नियतीने काही गोष्टी आधीच आखून ठेवलेल्या असतात, याची प्रचिती या शनिवारी आमच्या गावात आली. योगायोगाने तो रवि नाईक यांच्या निधनाचा चौथा दिवस होता. प्रथेप्रमाणे मृतक कुटुंबीयांच्या सांत्वनाचा दिवस. या दिवशी येथले स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी, येथील क्रीडांगणावर होऊ घातलेल्या बहुचर्चित खाजगी मोबाइल टॉवर या विषयावर येथील ग्रामस्थांशी चर्चा करण्यासाठी या बैठकीची वेळ रवि नाईक यांच्या निधनाआधीच ठरवली होती.
या बैठकीत रवि नाईक यांच्यावर भाषणे झाली नाही पण एक मिनिट शांतता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मीही या विषयावर बोललो नाही, कारण रवि नाईकच्या मुंडकार कूळ चळवळीत आमच्या गावच्या योगदानाविषयीचा सविस्तर लेख आदल्या दिवशीच प्रसिद्ध झाला होता. या लेखात माझ्याकडून एक उल्लेख राहून गेला होता.
हा उल्लेख असा की रवि नाईक यांच्या राजकारणात राजकारण प्रवेशात आमच्या गावच्या लोकांचे काय योगदान होते! १९८०च्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळावी म्हणून येथील चक्क दोन भाडेवाहू टेम्पो भरून लोक शशिकलाताईंच्या बंगल्यावर गेले होते.
भाऊसाहेबांनी रचलेल्या बहुजन उद्धाराच्या पायावर रविस्वरूपी कळस रचण्याची जी प्रक्रिया नियतीने सुरू केली होती तेव्हा त्या कार्यात खारीचे योगदान देण्याचे काम कुंकळ्ये ग्रामस्थांकडून शांतादुर्गा देवीने तेव्हाच करून घेतले असावे, म्हणून कदाचित तसेच तिने या श्रद्धांजलीचे नियोजन आधीपासून करून ठेवले असावे. रवि नाईक यांनी ४० वर्षांपूर्वी येथे लावलेली भूस्वाभिमानाची ज्योत आजही आमच्या गावातील ग्रामस्थांमध्ये तेवढ्याच तेजाने तेवत आहे!
आपल्या कष्टाने जपलेल्या जमिनीवर भूखंड निर्मितीचे अतिक्रमण होत आहे, हे लक्षात येतात येथील ग्रामस्थ एकत्र आले व आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आंदोलनाने संपूर्ण गोव्याचे लक्ष वेधून घेतले. ही इथल्या ग्रामस्थांच्या एकतेची पहिली चमक होती. आताच्या येथील क्रीडा मैदानावर खाजगी मोबाइल कंपनीचा टॉवर गुपचूप उभारण्याचा प्रयत्न झाला तसे येथील ग्रामस्थ परत एकदा एकत्र आले व याही विषयाकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष त्यांनी वेधले.
येथले एकतेची ही दुसरी झलक ठरली. परिणामी माजी क्रीडामंत्री असलेल्या आमदारांना ग्रामस्थांसमोर येऊन त्यांनी विचारलेल्या अभ्यासपूर्ण प्रश्नांचा सामना करावा लागला. ‘तुम्हांला नको असेल तर मी मंजुरी रद्द करून घेतो’, असे त्यांना जाहीर करावे लागले. येथे वरवरच्या आश्वासनाने ग्रामस्थांचे समाधान होत नाही, येथील व्यासपीठावर यायचे असेल तर विषयाचा व्यासंगी अभ्यास हवा, याचा अनुभव स्व. डॉ. काशिनाथ जल्मी व ऍड. विश्वास सतरकर या माजी आमदारांनी घेतला होता.
आजच्या व त्याच्या मागच्या आमदारांना असे अनुभव नवीन वाटत असावे, कारण ‘गाऊ राजकारण्यांच्या आरती’ अशी प्रियोळची व्यासपीठे तयार झाल्यास आता दोन दशके पूर्ण झाली आहेत. निवडणूक काळात उमेदवाराचे कार्यकर्ते म्हणून वेगळे असलो तरी गावच्या प्रश्नावर ग्रामस्थ म्हणून एकत्र येऊन सत्तेत असलेल्यांना प्रश्न विचारण्याची या गावाची जुनी प्रथा अजूनही आमच्या गावात जिवंत आहे, हे परत एकदा सिद्ध झाले व तीच येथल्या ग्रामस्थांची मोठी फलश्रुती ठरली आहे.
जातीय सलोखा व सामाजिक भान, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचा गाव. आदिवासी व भंडारी समाज असे बहुजन रहिवासी व सोबत शेणवी कुंकळ्येकर यांची सारस्वत कुटुंबे या सर्वांनी एकत्र गुण्यागोविंदाने नांदण्याचा येथला हजारो वर्षांचा इतिहास वारसा. गोवा मुक्तीच्या सशस्त्र लढ्यासाठी प्रसिद्ध ‘गोमंतक आझाद दला’ची स्थापना याच गावात झाली. यात स्व. पांडुरंग शेणवी कुंकळ्येकर हे मोठे स्वातंत्र्यसैनिक तर त्यांच्यासोबत भंडारी समाजातील स्व. राजा गोवेकर व स्व. दत्ता लू. नाईक व आदिवासी समाजातील स्व. गणेश कुंकळ्येकर ही तुरुंगवास भोगलेली मंडळी. मुक्तीनंतरची या गावातील ग्रामस्थांचे ग्रामाभिमानी समाजमन तयार झाले ते त्यांच्याच स्फूर्तीमुळे. मी येथील क्लबच्या सोबत आलो तेव्हापासून व क्लबासोबत असेपर्यंत या स्वाभिमान परंपरेची परत परत आठवण करून देत होतो.
शाळेला स्वत:ची जमीन असावी, येथे क्रीडामैदान व्हावे यासाठी स्व. दत्ता लू. नाईक यांनी पुढाकार घेतला होता तर तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कर्मचारी स्व. गोपाळ शेणवी कुंकळ्येकर यांनी आपल्या जबाबदारीवर जेसीबी टाकून मैदानासाठी जमीन सपाटीकरणाचे काम केले होते. पोलीस तक्रार झाल्यावर त्यांची नोकरी जाईल म्हणून त्याची जबाबदारी माझे मावसभाऊ स्व. शामसुंदर शिरोडकर व स्वातंत्र्यसैनिक स्व. दत्ता लु. नाईक यांनी आपल्या अंगावर घेतली. आजच्या आमदारांना या खेळमैदानावर टॉवर उभारणे हा ‘दोन मिनिटात संपवता येणारा विषय’ वाटला, पण त्याला व त्यांच्याबरोबर असलेल्या आजच्या पिढीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना हा मागील इतिहास माहीत नाही हे सत्य आहे.
कामे करून घ्यायची असतील तर क्लब सदस्यांनी व ग्रामस्थांनी आमदाराच्या मागे असायला हवे ही आजची मानसिकता आहे. पण स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा असलेल्या या गावात १९७४ ते २००७ दरम्यान कुंकळ्ये स्पोर्ट्स क्लबच्या रूपात असा दरारा तयार करण्यात होता आला की वर्षातून एकदा होणाऱ्या वर्धापनदिनात न चुकता स्थानिक आमदाराला बोलावले जायचे व ग्रामसमस्यांवर त्यांना थेट प्रश्न विचारले जायचे. तेव्हा आतासारखे ‘रील’ तयार होत नसायचे, असते तर स्व. काशिनाथ जल्मी व व ऍड. विश्वास सतरकर यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण स्पष्टीकरणाची कितीतरी रील्स व्हायरल झाली असती.
आधी कार्यक्रमाचे सूत्रसंचालक म्हणून, तर पुढे क्लब अध्यक्ष म्हणून ग्रामस्थांच्यावतीने त्यांना थेट प्रश्न विचारण्याचे काम मी केले. त्यांच्या विरोधी विचाराच्या मंत्री आमदारांना त्यांच्यासमोर या व्यासपीठावर एकमेकांसोबत बसविले. आता चॅनलवर चर्चा घडतात त्या दर्जाच्या चर्चा मी त्यावेळी त्यांना व्यासपीठावरून एकत्र बसवून घडवून आणल्या. अशाच तर्हेने, स्व. डॉ. काशिनाथ जल्मी व खासदार चर्चिल आलेमाव यांच्यात जुळवून आणलेल्या जुगलबंदीत, ग्रामस्थांची उपस्थिती पाहून चर्चिल आलेमाव भारावून गेले व ‘ये रे येरे पावसा’ ही कविता म्हणून गेले.
त्याने स्व. डॉ. काशिनाथ जल्मींना प्रतिआव्हान दिले की ‘तू जमीन संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करून घे की मी लगेच खासदार निधीतून फुटबॉल मैदान बांधून देतो.’ या वेळी बिचाऱ्याला माहीत नव्हते की खासदार निधी योजनेत मैदान उभारणीला स्थान नाही. दिलेल्या शब्दाला जागणाऱ्या या चर्चिलने ही मागणी आपल्या पक्षाकडे लावून धरली व पुढे राष्ट्रीय स्तरावर योजनेत बदल झाला तेव्हा मैदान उभारणीला स्थान मिळाले. पुढील खासदारकीच्या कारकिर्दीत ही प्रक्रिया पूर्ण झाली व फ्रान्सिस सार्दिनच्या खासदारकी असताना या मैदानासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले व लगेच मैदान तयार झाले. गोव्यात अशी चार पाच मैदाने आहेत ज्यांचा ताबा ग्रामपंचायतीकडे आहे व त्यातील आमचे एकमेव मैदान आहे जे पंचायतीने क्लबकडे देखरेखीसाठी सोपविले.
येथे अतिक्रमणाचा प्रश्न आला नसता तर ग्रामस्थांनी कुणाकडेही हात न पसरता ‘शाळा तेथे मैदान’ अंतर्गत गोव्यातील पहिले ग्रामस्तरीय खेळ व शिक्षण संकुल येथे साकारले असते. यासाठी तयार केलेल्या आराखड्यावरून सांताक्रूझ येथील चार खांब्याकडे असे क्रीडासंकुल तयार झाले होते. आता हा इतिहास माहीत नसल्याने आजच्या आमच्या आमदारांना गावातील मैदानावरील टॉवर विषय हा ‘दोन मिनिटां’चा विषय वाटला. ग्रामस्थांनी आपला विचार मागच्या बैठकीतच स्पष्ट केला होता, की मैदानावर टॉवर नको, दुसरीकडे मोकळ्या जागेत उभारणीस विरोध नाही पण लोकवस्तीपासून योग्य अंतर असावे.
या विषयीचा विस्तृत लेख मी या सदरात प्रसिद्ध केला होता. कुंकळ्ये स्पोर्टस् क्लबच्या बॅनरखाली अशा तर्हेच्या चर्चेचा दर्जाचा वारसा पाहता, चर्चेचे स्वरूप वेगळ्या स्तरावर नेता आले असते. टॉवर उभारणीला मंजुरी देणे व ती मागून रद्द करणे यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेविषयी चर्चा करता आली असती. असे करण्यासाठी सूत्रसंचालकाला स्वतः व्यासपीठावरील राजकारण्याचा वकील बनण्याचा मोह आवरावा लागतो. भूकंप होतो तेव्हा हे टॉवर धोकादायक बनतात, त्यासाठी या टॉवरचे रहिवासी प्रकल्पापासून अंतर ठेवायचे असते, पण आपले आमदार साहेब, हे टॉवर कोसळू शकत नाही असे पटवून देण्याचा प्रयत्न करतात.
गावात दादा मोटारसायकल पायलट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, सगुण नाईक यांनी उभे राहून, ’तर मग मांडवी पूल एका वर्षात कसा कोसळला?’ असा प्रतिप्रश्न करून, शिक्षणाने अभियंता असलेल्या आमदाराला कात्रीत पकडले.
थोडक्यात, आमचे आमदार क्रीडामंत्री असताना गोव्यातील क्रीडाखाते अंतर्गत येणाऱ्या आठ नऊ खेळमैदानांवर टॉवर उभारण्यास मंजुरी मिळाली होती, याविषयी त्यांना काहीच माहिती नाही असा त्यांचा दावा आहे. आमच्या क्लबच्यावतीने आक्षेप दाखल झाल्यावर या सर्व मंजुरींविषयी पुनर्विचार व्हावा यासाठी क्रीडाखात्याने माहिती तंत्रज्ञान खात्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे. देवी शांतादुर्गेची कृपा अशी, की आमच्या मैदानाच्या बाबतीत जागा निश्चिती गुगल कोडीनेटमध्ये असा काही घोळ झाला आहे की सदर ऑर्डरमध्ये दुरुस्ती केल्याशिवाय कंपनीला येथे काम सुरू करणे शक्य नाही.
मैदान वापराशिवाय थोडी अतिक्रमणाची मोकळी जागा आहे ती कोर्टकचेरीत आहे. अशावेळी येथे टॉवर उभारणे शक्य नाही हे टॉवर कंपनीनेही मान्य केले आहे. तरी यानिमित्ताने, भूसंरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा आपल्या लोकप्रतिनिधींनासुद्धा शिष्टाचाराच्या चौकटीत राहून थेट प्रश्न विचारणारा जागरूक ग्रामस्थ गोव्याच्या एका तरी खेड्यात उपलब्ध आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले! या निमित्ताने कुंकळ्ये ग्रामस्थांना आपली एकतेची चमक दाखविण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली. देवी शांतादुर्गे, आमच्या गावावर अशीच कृपा ठेव!, असे मी याविषयाची सांगता करताना मी म्हणेन.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.