Goa Opinion: रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर होईल का? गोव्यात बहरतोय ‘कंत्राटी मारेकऱ्यां’चा व्यवसाय

Rama Kankonkar: गोव्याच्या बदलत्या आर्थिक व सामाजिक समीकरणात भाडोत्री मारेकऱ्यांची मागणी वाढत आहे व हा धंदा बहरास येत आहे. या व्यवसायाचा वेळीच नायनाट करण्याइतपत सरकारदरबारी अभ्यास व इच्छा आहे का?
Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar AssaultDainik Gomantak
Published on
Updated on

मधू घोडकिरेकर

आमचे आदिवासी मित्र रामा काणकोणकर यांच्यावर भर दिवसा झालेला मारेकरी हल्ला, हे गोव्यात वाढत्या मागणीनुसार बहरणाऱ्या कंत्राटी मारेकऱ्यांच्या दहशतीचे, त्यांच्या व्यवसायाचे एक उदाहरण आहे. आतापर्यंत या व्यावसायिक मारेकऱ्यांनी आपली जाळे राज्यभरात प्रस्थापित केले आहे.

रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यामागील संशयित म्हणून ज्यांना अटक केली आहे, त्यांची नावे पूर्वेतिहासानुसार एका कुप्रसिद्ध म्होरक्याशी जोडली गेली व त्याला अटकही झाली आहे. त्याला या प्रकरणाचा सूत्रधार म्हणून पाहिले तर मागील किती वर्षांपासून सक्रिय माजिक कार्यकर्त्याच्या फाईल्स’ घेतल्या होत्या याचा हिशोब मिळतो.

गोव्यात ‘सुपारी-खंडणी’ हे वेगळ्या संदर्भात वापरले जात. येथला कूळ आपल्या बागायतीच्या वार्षिक सुपारी उत्पन्नातील ठरावीक भाग आपल्या भाटकाराला द्यायचा, त्याला ‘खंड’ असे म्हणायचे. गोव्यात गुन्हेगारी परिभाषेतील ‘सुपारी’ला ‘फाइल देणे’ अशी कोडभाषा वापरतात.

प्रत्यक्ष हल्ला करणाऱ्या संशयितामागचा सूत्रधार हा कोण तरी म्होरक्या असेल, पण या म्होरक्याकडे रामा काणकोणकरची ‘फाईल’ नेमकी कुणी दिली याचा शोध घेईपर्यंत संशयिताच्या पोलीस-कोठडीचा काळ संपलेला असेल.

‘सुपारी घेणारा’, ‘खंडणी वसूल करणारा’ व ‘मारेकरी’ हे तीन प्रत्यय गुन्हेगारी जगतात परिचित आहे. रामा काणकोणकर हल्ला प्रकरणाची चर्चा करताना रवि नाईक मुख्यमंत्री असताना गुंडगिरीवर कसा वाचक आणला याची चर्चा नव्याने होत आहे. हल्लीच ओटीटी प्लेटफॉर्मवरती ‘कोस्तांव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सोने तस्करीच्या आरोपावरून केनेडी या चर्चिल आलेमावच्या भावाचा कस्टम अधिकाऱ्यांच्या कारवाईत मृत्यू झाला होता, या घटनेशी साम्य असलेला हा चित्रपट आहे. यात कस्टम अधिकाऱ्यावर खुनाचा आरोप ठेवला होता, जो पुढे मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला.

या कुटुंबीयांच्या कारवायांवर रवि नाईक यांच्या मुख्यमंत्री काळात नियंत्रण आले असे मानतात. पुढे याच कुटुंबातील तीन व्यक्ती गोमंकातील सक्रिय राजकरणात नावारूपाला आल्या. दुसरीकडे त्याच दरम्यान मेरशी परिसरात ‘प्रोटेक्टर’ नावाने जी दहशत निर्माण झाली होती, तीही नियंत्रणात आली.

ती आणाण्यात माजी निवृत्त पोलीस अधीक्षक एलन डीसा, पोलीस खात्याचे त्या वेळचे ‘सिंघम’ म्हणून समोर आले. चर्चिल कुटुंबीयांप्रमाणेच ‘प्रोटेक्टर’चे नाव ज्या कुटुंबाशी जोडले होते, त्या कुटुंबातील दोन व्यक्ती पुढील काळात विधानसभेत पोहोचल्या.

माझे मित्र रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्यासंबंधांत मारेकऱ्यांना संचालित करणाऱ्या म्होरक्याची दहशत व वरील दोन उल्लेख केलेल्या कुटुंबांनी त्यावेळी आपापल्या परिसरात निर्माण केलेला धाक, यात फरक आहे. या दोन्ही कुटुंबांकडे त्या परिसरातील लोक ‘रॉबिनहूड’च्या स्वरूपात पाहायचे, म्हणून त्या कुटुंबांना तेथील जनता त्यांना सक्रिय राजकरणात पसंती देतात.

त्यांच्या दादागिरीविषयी चर्चा आता होत नाही. आताचे मारेकरी, हस्तक जरी यांच्याच परिसरातील असले तरी त्यांचे म्होरके म्हणून या कुटुंबाकडे पहिले जात नाही. ‘कोस्तांव’ चित्रपटानंतर आणखी एका चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे तो म्हणजे ‘इन्स्पेक्टर झेंडे’.

हा चित्रपट कुप्रसिद्ध सिरियल किलर चार्ल शोभराज याला मुंबई पोलिस अधीक्षक मधुकर झेंडे यांनी गोव्यात कशी अटक केली यावर आधारीत आहे. ही घटना ऐंशीच्या दशकातील असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुन्हेगार गोव्यात कसे आरामात फिरू शकतात, याचे ते उदाहरण आहे. त्या काळात, यावरून गोवा पोलिसांच्या क्षमतेवर मोठी टीका झाली होती.

गोव्याच्या वर्तमान पोलीस महानिरीक्षकांनी गोव्यात गुंडांचे टोळीयुद्ध होत नसल्याचे म्हटले आहे. पण यापूर्वी होऊन गेलेल्या पोलीस महानिरीक्षकांनी, दुसरीकडील गुंड टोळीचे म्होरके आरामात गोव्यात राहून, दुसरीकडील राज्यात टोळीयुद्ध चालवीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला होता.

कारण इतर राज्यांतील पोलिसांनी येथे येऊन अशा गुंडांना आपल्या ताब्यात घेऊन त्यांच्याबरोबर नेले आहे. आजच्या घडीला गोव्यात सक्रिय भाडोत्री मारेकरी नेटवर्क इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे. गोव्याबाहेरून आलेले आयपीयस अधिकारी, आपल्या आधीच्या अनुभवावरून काही निष्कर्ष काढून वक्तव्य करतात, पण ते निष्कर्ष गोव्यासाठी सरसकट लागू होत नाहीत, हे त्यांना मागच्या काही उदाहरणांवरून कळते.

‘उटा आंदोलनाच्यावेळी आमच्या पोलिसांनी चांगला संयम दाखविला. मी असतो तर आंदोलकांवर गोळीबार केला असता’, असे वक्तव्य त्यावेळी नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस महानिरीक्षकांनी केले होते. ज्यासाठी त्यांना जाहीर माफी मागावी लागली. माफी मागण्याअगोदर त्यांनी या वक्तव्याचा दोष पत्रकारांवर ढकलण्यासाठी, ‘गोव्यातील पत्रकार काहीही लिहितात’ असे वक्तव्य केले.

त्या वेळचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांना पत्रकारांचीही माफी मागण्यास सांगितले. अशी किती तरी उदाहरणे आहेत, जेथे आयपीयस अधिकारी येथल्या वास्तवाशी अपरिचित असतात.

विद्यमान पोलीस महानिरीक्षक म्हणतात, की येथील गुंड टोळींचा आपापल्या वर्चस्वाचा परीघ ठरलेला नसल्याने येथे टोळी युद्धे होतात असे म्हणता येत नाही. येथे अशा टोळ्या आपल्या वर्चस्वाचा परीघ ठरवू शकत नाहीत, कारण येथे पंचायत ते संसद यात निवडून आलेल्या सर्व राजकारण्यांनी स्वत:च्या वर्चस्वाचा परीघ ठरवलेला आहे.

त्यांचे समर्थक, विरोधक व निष्पक्ष यात येथील समाज विभागाला गेला आहे. येथील छोट्या छोट्या हालचालींवर सर्वांचे लक्ष असते. म्हणूनच मागच्या वर्षी पूजा शर्मा यांनी बाउन्सरकडून घर खाली केल्यावर व आता रामा काणकोणकरवर हल्ला होताच गोमंतकीय समाज एकत्र येऊन आवाज उठवतो!

सूत्रधाराला फाईल देणारा पडद्यामागचा सूत्रधार सत्ताधाऱ्यांना जवळ असला तरी जनरेट्यामुळे सरकारलाही पीडित व्यक्तीच्या बाजूने उभे राहणे भाग पडते. गोव्यात मारेकऱ्यांचे जे जाळे तयार झाले आहे, ते आज कुणा एका राजकारण्याच्या ताब्यात राहिलेले नाही.

भुरटी चोरी ते खून या सर्व स्तरावरील गुन्हे करून, कधी पोलीस कोठडीत तर कधी न्यायालयीन कोठडीत रहिवास करून कायद्याच्या खाचखळगे व त्यांच्या मर्यादा, यांच्या अभ्यासाने, स्वानुभवाने ते परिपूर्ण होतात. गोव्यातील कोणता क्रिमिनल वकील आपणास यातून सहीसलामत बाहेर काढू शकतो, यांची यादी त्यांच्याकडे असते.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar: ‘पुरावा नाही’, ‘साक्षीदार फिरले’ हेच पुन्हा ऐकावे लागणार का? 'जेनिटो' यावेळीही सुटणार का?

ते भाडोत्री हल्ल्यासाठी अशी काही फी आकारतात की त्यातून त्यांना वकील व कुटुंब यांचा खर्च सहज भागविता येतो. कोर्टात आरोपपत्र दाखल झाल्यावर त्यांची केस ’फाइल’ मोठ्या फीसह कुणातरी नामवंत वकिलाकडे देतात, तर हा गुन्हा करण्यासाठी घेतलेल्या ‘फाइल’ची फी वकिलाच्या फीपेक्षा किती तरी पटीने जास्त असते.

गोव्याबाहेरील टोळ्या तर आपल्या गुन्हा आखणीत चक्क वकिलांनाच सहभागी करून घेतात, जेणेकरून ते न्यायालयात सहज सुटू शकतील. गोव्यात असे होत नाही पण मध्यंतरी गोव्यातील एक टोळी बेळगाव येथील अशाच एका वकिलाची अशी मदत घेत होती. हे लक्षात येताच, गोव्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने त्या वकिलाला सहआरोपी करण्याचा दम दिला व त्या वकिलाने गोव्यात लुडबुड करणे बंद केले.

Rama Kankonkar Assault
Rama Kankonkar: '..तर गोमेकॉबाहेर खाट घालून उपचार करु'! काणकोणकरांच्या डिस्‍चार्जबाबत कार्यकर्ते अस्‍वस्‍थ; निर्णयावरुन संशय

या जगतातील सर्व मारेकरी हस्तकांचे गुन्हेगारी प्रकारातील प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षण तुरुंगातच झालेले असते व त्यांचे मुख्यालयही तुरुंगातच असते. जर काणकोणकर हल्ल्यातील संशयितांना रासुका लावून एक दोन वर्षे न्यायालयीन कोठडीत राहावे लागले तरी त्या आरोपींना काही फरक पडणार नाही. याचे कारण म्हणजे तुरुंग, कोठडी ही त्यांची पंढरी आहे. तेथून त्यांच्या सहकाऱ्यांची ये-जा वारी दरवर्षी होत असते. त्यामुळे पोलीस कदाचित सूत्रधाराचे नाव जाहीरही करतील, पण सूत्रधाराला रामाची ‘फाइल’ कुणी व कशासाठी दिली हे जाहीर करतील असे वाटत नाही. असे केल्यास माहिती हक्क सामाजिक कार्यकर्त्यांचा नेमका संघर्ष कोणाविरुद्ध व कोणत्या प्रकारचा चालू आहे, याचे सत्य गोमंतकीय जनतेसमोर येईल.

गोव्याच्या बदलत्या आर्थिक व सामाजिक समीकरणात भाडोत्री मारेकऱ्यांची मागणी वाढत आहे व हा धंदा बहरास येत आहे. या व्यवसायाचा वेळीच नायनाट करण्याइतपत सरकारदरबारी अभ्यास व इच्छा आहे का? हा खरा चर्चेचा विषय असायला हवा!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com