

सर्वेश बोरकर
हल्लीच तमिळनाडूमधील उदययालूर येथील पाल्कुलथ्थु अम्मान मंदिराच्या प्रवेशद्वारावर सापडलेल्या दगडी खांबावरील शिलालेख आणि अर्धे गाडलेले शिवलिंग याने अनेक विद्वानांना आकर्षित केले आहे. शिलालेख व शिवलिंगाचा शोध आणि त्यासंबंधी विद्वानांचे विचार याने तमिळनाडूमधील पल्याराई, उदययालूर येथील राजराजा चोल - १ (इ.स. ९८५-१०१४)च्या तथाकथित पल्लीपद्दाई मंदिरावर असलेल्या दगडी खांबावरील शिलालेखामुळे काही विद्वानांनी केलेल्या अभ्यासाचा विषय चर्चेत आला.
पालकुलथु अम्मान मंदिर येथील स्तंभ शिलालेख कुलोथुंगा चोल(१०८०-११२०) च्या काळातील असावा असे अनेक विद्वानांचे मत आहे. दिलेल्या माहितीतून या शिलालेखाच्या वाचनाचा अर्थ पूर्वी सापडलेल्या राजराजांच्या शिलालेखात असलेल्या शब्दांसारखाच आहे.
हे तमिळ वाचन पुढीलप्रमाणे : ‘श्रीशिवपाठशेखर मंगलाथ्थु एलुंथारुली निंत्रा - श्री राजराजा थेवर आना श्री शिवपाठशेखर थेवर थिरुमालिकाई.(इसवी सन १०७० -इ.स. १११२ पासून त्यांच्या ४२व्या वर्षाचा शिलालेख).’ शिलालेखाच्या वरील वाचनाचा अधोरेखित शब्दांचा अर्थ असा असू शकतो की राजराजा चोल थिरुमालिकाई येथे स्वतः उपस्थित होते.
आणखी एका सापडलेल्या तिरुवरुर मंदिरातील शिलालेखात एलुंथारुली शब्दाचा समान वापर दिसून येतो, जिथे राजेंद्र चोल - १ आणि राणी अनुक्कियार परवाई नांगाई यांची रथावर उपस्थिती खालील शब्दांप्रमाणे तमिळ वाचन केले गेले आहे.
: ‘श्री राजेंद्र चोला थेवरुम अनुक्कियार परवाई नंगैयारुम थेर मेल एलुंथरुली.’ म्हणून हे स्पष्ट आहे की एलुंथरुली म्हणजे यांचा तमिळ अर्थ एखाद्या ठिकाणी उपस्थिती असणे. वर उल्लेख केल्याप्रमाणे पालकुलथु मान मंदिर - स्तंभ शिलालेख कुलोथुंगा चोल -१ (१०७०-११२०)च्या काळातील आहे.
त्यात ‘एलुंथरुली निन्त्र श्री राजराजा थेवर’ असा उल्लेख असल्याने शिवपथशेखर थेवर थिरुमालिकाई येथे कुलोथुंगा चोल - १ च्या काळात सुमारे ९८- वर्षांनंतर राजराजा चोल - १ तिथं उपस्थित राहणे अशक्य आहे.
म्हणून विद्वानांच्या मताप्रमाणे स्पष्ट होते की ती श्री राजराजा थेवरची मूर्ती होती जी श्री शिवपाथशेखर मंगलम येथे श्री शिवपथशेखर थेवर थिरुमालिकाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजवाड्यात स्थापन केली गेली असवी. मालकाई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चोल राजराजाच्या राजवाड्यात ‘थिरू’ शब्दाचा अर्थ मालकाई राजवाड्यात राजराजा चोलची मूर्ती होती, असा होत असावा असं काही विद्वानांचे मत आहे.
राजराजा चोलाच्या या मूर्तीवर दैनिक पूजा अर्चा होत होती आणि कदाचित असे मानले जात होते की श्री राजराजादेव ऊर्फ शिवपाठशेखरन या मूर्तीमध्ये स्वतःला (देवत्व म्हणून एलुंथरुली) प्रकट करतील आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतील. मिरॉन विन्सलो या विद्वानांच्या तमिळ आणि इंग्रजी शब्दकोशात ‘एलुंथरुला’चा अर्थ असा दिला आहे की अभिषेक करताना मूर्तीमध्ये देवत्व म्हणून उपस्थित होणे किंवा प्रकट होणे जे वरील अनुमानाची पुष्टी करते.
वरील शिलालेखात पुढे असेही दिसून येते की शिवपथसेकरन मालकाईची पुनर्बांधणी पिडावूर गावातील वेलान अरिकेसवनाथ कासीराजन यांच्यावतीने करण्यात आली होती(कदाचित त्यांनी निधी दिला होता). शिवपाठसेकर मंगलम या गावाच्या प्रमुखाद्वारावर याचा उल्लेख सापडतो.
वरील उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला असे लक्षात येते की शिवपाठशेखर मंगलम येथील शिवपाठशेखर तिरुमालिकाईसमोरील जीर्ण झालेल्या मोठ्या मंडपमचे पुनर्बांधणी करणारे पुजारी होते व राजाराजेश्वरम मंदिराच्या शिलालेखांवरून आपल्याला माहिती मिळते की तमिळ शैव मंदिराचे पुजारी होते जे मंदिराची पूजा करत आणि पूजेच्या वेळी तमिळ तिरुमुराईकलचे पठण करत होते.
या तमिळ शैव पुजारींच्या सामूहिक वसाहती होत्या आणि त्यांना ‘मंगलम’ म्हणून ओळखले जात होते, तर संस्कृत वैदिक पुजारींच्या सामूहिक वसाहतींना ‘चतुर्वेदी मंगलम’ म्हणून ओळखले जात होते. म्हणूनच या संदर्भातील शिलालेखावरून असे दिसून येते की ‘शिवपाठशेखर मंगलम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शैव पुजारी गावाचा प्रमुख होता, व ‘साथ्थ मंगलम’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्वीचा पुजारी गावचा रहिवासी होता.
या संदर्भातील शिलालेखावरून असेही दिसून येते की ‘मालिकाई’ म्हणजे (राजाचा) राजवाडा. त्याचा राजवाडा होता जिथे त्याने ‘शिवपाठशेखर मंगलम’ गावात त्याच्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवले होते. म्हणूनच या गावाला त्याच्या नावावरून ‘शिवपाठशेखर मंगलम’ आणि राजवाड्याला ‘शिवपाठशेखरन मालिकाइर्’ असे नाव देण्यात आले असावे.
तसेच राजराजा चोल - १च्या मृत्यूनंतर असे दिसते की ‘शिवपथशेखर मंगलम’ च्या पुजारीने त्यांच्या राजवाड्यात ‘शिवपथशेखरन मालकाई’ येथे राजराज चोल - १(एलेंथरुली निंत्रा)ची मूर्ती प्रतिष्ठित केली असेल आणि त्यांच्या आत्म्याच्या पुण्याईसाठी आणि मूर्तीमध्ये देवत्व म्हणून प्रकट होण्यासाठी पूजेचे आयोजन केले असावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.