Raigad Fort Inscription: या पृथ्वीच्या अंतापर्यंत शिवछत्रपतींची कीर्ती, रायगडाची खुशाली नांदो; राज्याभिषेकाचा संस्कृत शिलालेख

Chhatrapati Shivaji Maharaj Coronation: शिलालेखाच्या पहिल्या ओळीतच श्रीगणपतये नमः असे लिहिले गेले आहे. एक मतप्रवाह असाही आहे की, श्रीगणपती हे दैवत पेशव्यांच्या काळापासून रूढ झाले असावे.
Chhatrapati Shivaji Maharaj Coronation
Raigad Fort History InscriptionDainik Gomantak
Published on
Updated on

सर्वेश बोरकर

दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावर जगदीश्वराचे म्हणजे व्याडेश्वर महादेवाचे मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या परिसरात दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीत संस्कृत भाषेतील एक सुंदर शिलालेख आहे.

इतिहासाच्या दृष्टिकोनातून हा शिलालेख फार महत्त्वाचा आहे. या ऐतिहासिक शिलालेखातून आपल्याला काही संदर्भ मिळतात काही अंदाज बांधता येतात, तसेच शिवराज्याभिषेकाची तिथी या शिलालेखामुळे स्पष्ट होते. शिवकालीन रायगड कसा असेल याचे चित्र या शिलालेखातून डोळ्यांसमोर उभे राहते. रायगडावर गेलेल्या बऱ्याच लोकांनी हा शिवकालीन शिलालेख पाहिला असेल, पण तो संस्कृत भाषेत असल्यामुळे वाचायचा राहूनही गेला असेल.

जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर उजव्या बाजूस दरवाजाच्या भिंतीवर असलेला हा सुंदर शिलालेख पुढीलप्रमाणे :

॥श्रीगणपतये नमः| प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासनेतिष्ठतः|शाकेषण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ|

वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते|श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावधन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते॥

या शिलालेखाचा थोडक्यात अर्थ, ‘सर्व जगाला आनंददायी असा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६मध्ये आनंद नाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे यांची उभारणी केली आहे, ती चंद्र सूर्य असे तोवर खुशाल नांदो.’

शिलालेखाच्या पहिल्या ओळीतच श्रीगणपतये नमः असे लिहिले गेले आहे. एक मतप्रवाह असाही आहे की, श्रीगणपती हे दैवत पेशव्यांच्या काळापासून रूढ झाले असावे. पण या मतप्रवाहाच्या विपरीत हा शिलालेख शिवकालीन म्हणजे पेशव्यांच्या आधीच्या काळातला असूनसुद्धा या शिलालेखामुळे आपल्याला कळते की शिवकाळात सुद्धा श्रीगणपती हे दैवत किती महत्त्वाचे होते.

डेक्कन कॉलेज पुणे येथील केमिकल असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या पुरातत्त्वशास्त्र विभागातील डॉ. सचिन विद्याधर जोशी यांनी मांडलेल्या नवीन संशोधनानुसार या शिलालेखाचा अर्थ शिलालेखात दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत दिल्याप्रमाणे ‘प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः’ आहे असं डॉ. सचिन जोशी यांच्या म्हणण्यानुसार प्रासाद म्हणजे एक मोठा महाल आणि ‘प्रासादो जगदीश्वरस्य’ म्हणजे जगदीश्वराचा हा प्रासाद जो संबंध राजेश्वर रायगडच.

यात सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना जगदीश्वर असे म्हटले गेले आहे. जगदीश्वर म्हणजे जगाचा स्वामी. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले व सह्याद्रीच्या शिखरावर नूतन सृष्टी उभी केली आणि त्या सृष्टीचे स्वामी म्हणजेच जगदीश्वर ज्यांचा हा प्रासाद ज्याला राजराजेश्वर रायगड म्हणतात तो किल्ला.

जो तिथे येऊन बघितल्यावर आनंद देतो आणि हा रायगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे बांधला गेला आहे’, असे या दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत लिहिले गेल्याची आपल्याला माहिती मिळते.

शिलालेखाच्या चौथ्या व पाचव्या ओळीत दिल्याप्रमाणे सिंहासनाधीश्वर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची तिथी सांगितली गेली आहे जी पुढीलप्रमाणे ‘शके षण्णवबाणभूमिगणना दानन्द संवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ’ याचा त्यांच्याप्रमाणे अर्थ श्रीमद्छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९६मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहूर्तावर म्हणजेच ६ जून १६७४ या दिवशी राज्याभिषेक जाहला जो अतिशय चांगला मुहूर्त होता असे लिहिले गेले आहे. तसेच हा शिलालेख राज्याभिषेकाच्या आधी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच्या दोन दिवसांआधी एकादशीला स्थापिला आहे.

काय काय बांधकामे केली गेली आहे याची माहिती पुढीलप्रमाणे शिलालेखात दिली आहे, ‘ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते|

श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो’ म्हणजे या रायगडावर हिरोजी इंदुलकर नावाच्या शिल्पकाराने उभ्या केलेल्या विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राणीगृहे आणि नरेंद्र सदन म्हणजे राजाचा महाल अशांची उभारणी केली गेली. त्यानंतर शेवटच्या ओळीत लिहिले आहे की ‘यावच्चंद्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते’ याचा अर्थ जोवर आकाशात चंद्र सूर्य आहेत या पृथ्वीच्या अंतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती आणि रायगडाची खुशाली नांदो म्हणजे अबाधित राहो.

डॉ. सचिन जोशी यांच्या म्हणण्यानुसार जगदीश्वर महादेवाचे मंदिर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा परिसर हे रायगडाच्या नागरी भागाचे शेवटचे टोक असावे. तसेच शिवसमाधीपासून भवानी टोकापर्यंतचा भाग हा लष्करी भाग होता, म्हणजे त्याकाळी नागरी भागाची सीमा होती.

Chhatrapati Shivaji Maharaj Coronation
Kavi Kalash History: छत्रपतींशी गद्दारी कदापि नाही! स्वराज्याच्या मिठासाठी, शंभूराजांच्या मैत्रीसाठी जागलेले 'कवी कलश'

मग या आड जागेत जिथे सहजपणे दिसणार नाही अशा जागी शिलालेख लावण्यात आल्याची शक्यता कमी आहे. तसेच त्यांचे असेही म्हणणे आहे की हा शिलालेख भिंतीत तिरका बसविला गेला आहे व ज्या भिंतीवर हा शिलालेख बसवला गेला आहे ती भिंत व बाजूला असलेली कमान त्यावरचे दगड वेग वेगळे आहेत त्यामुळे ही भिंत व आजूबाजूचे बांधकाम भिन्न काळात बांधले गेले असावे.

ज्यामुळे डॉ. सचिन जोशींना या शिलालेखाची जाग राजदरबाराच्या इकडे असणे जास्त इष्ट वाटते, ज्याने तो सर्वांच्या नजरेत येईल व सर्व नागरिकांना वाचता येईल. त्यांच्या मते नंतरच्या काळात डागडुजी करताना हा शिलालेख त्याच्या मूळ स्थानापासून आज ज्या स्थानी आहे तिकडे लावला गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Chhatrapati Shivaji Maharaj Coronation
Sambhaji Maharaj: गोष्ट संभाजी महाराजांच्या गोव्यातील पराक्रमाची! पोर्तुगीजांची उडवली होती दाणादाण

शिलालेखामुळे आपल्याला राज्याभिषेकाचे अचूक वर्णन सापडते, ज्यामुळे ते अनेक बखरीत असलेल्या वर्णनाशी तंतोतंत जुळते. राज्याभिषेकाचा सोहळा शुक्रवार पाच जून रोजी सुरू झाला होता. त्याची वेळ शुक्रवार २२ घटिका व उप वेळ द्वादशी मुख्य विधी पहाटे होता. राज्याभिषेकासाठी शिवाजी महाराजांनी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले होते. सभासद बखर म्हणते महाराजांनी ३२ मण सोन्याचे हे सिंहासन तयार करून कोषातील मौल्यवान रत्ने त्यामध्ये जडवली होती.

अष्टप्रधान मंडळ, पंडित व इतर अधिकारी या शुभवेळी सभागृहात सगळ्यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज सिंहासनास वंदन करून हातात राजदंड घेऊन सिंहासनावर आरूढ झाले. राजदर्शनासाठी जगदीश्वर मंदिरापर्यंत हत्तीवरून मिरवणूक काढली गेली. राजपथावर ‘क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय’, अशा घोषणा दिल्या गेल्या. महाराजांनी जगदीश्वराचे म्हणजे व्याडेश्वर महादेव मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर हा सोहळा पूर्ण झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com