
देवदर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भक्तांना आपल्याकडे आकृष्ट करण्याची फुलकारांमध्ये चढाओढ लागते. तशी कला अकादमीत सादरीकरणासाठी येणाऱ्या नाटकांच्या आयोजकांना वेढण्याची चाललेली अहमहमिका लाजिरवाणी आहे. ‘पुरुष’, ‘श्रीमंत दामोदर पंत’च्या सादरीकरणावेळी प्रकाशयोजना, वातानुकूलन यंत्रणेत झालेला बिघाड व त्या संदर्भात उमटलेल्या प्रतिक्रिया कला व संस्कृती खात्याला अपमानास्पद वाटल्या.
प्रत्युत्तरादाखल भाड्याची यंत्रणा वापरून सादरीकरण कसे उत्तम झाले हे भासवण्याची वापरण्यात आलेली ‘चाणक्य’नीती उघडी पडलीच; पण मूळ प्रश्न काही सुटलेले नाहीत, याची सल कलाप्रेमींना अणकुचीदार काट्यासारखी सलत आहे, ज्यावर नाडी परीक्षेत निष्णात डॉक्टर प्रमोद सावंत यांनी उतारा काढावा, अशी आमची मागणी आहे.
प्रश्न मांडणे हे ज्यांना राजकारण वाटते ते त्यांनाच लखलाभ होवो. राजकारण करणारे करत राहोत. मुख्यमंत्र्यांनी कला अकादमीचे हित जपावे. जितका लपवायचा प्रयत्न होतो, तितके उघडे पडत आहे. कला अकादमी ही काही थिएटरपुरती मर्यादित वास्तू नाही. तेथे संगीत, नाट्य विषयक शिक्षण दिले जाते. म्हणूनच कला अकादमी गोव्याची शान आहे, तिचे मार्दव जपणे कलाकार, सरकार यांचे कर्तव्य आहे. दुर्दैवाने दांभिकता, अहंकाराच्या ग्रहणाने अकादमीचा जीव गुदमरला. तेथे प्राण फुंकायचे कुणी?
२०२२ला अकादमी नूतनीकरणाचा घाट घातला गेला. पुढे घाईगडबडीत नोव्हेंबर २०२३मध्ये उद्घाटनाचा फार्स केला गेला. तद्नंतर अनेक समस्या समोर आल्या. मांडवीखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पुढील महिन्याभरात पावसाळा सुरू होईल, तेव्हा आणखी त्रुटी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
समस्यांच्या निराकरणार्थ बरोबर सात महिन्यांपूर्वी राज्य सरकारतर्फे १३ सदस्यीय कृतिदल नेमण्यात आले. त्यांच्याकडून अंतिम अहवाल अद्याप का आलेला नाही? कृतिदलाने प्राथमिक अहवाल दिल्यानंतर काय बदल घडले? सरकारी अधिकारी आणि कृती दल यांच्यात समन्वय आहे का? याचा खुलासा व्हायला हवा. कलाकार आणि रसिकांना कला अकादमी सुस्थितीत हवी आहे.
१६ जुलै २०२३च्या मध्यरात्री कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छप्पर कोसळले. तो नूतनीकरणाचा भाग आहे की नाही यावर बराच खल झाला; परंतु अद्याप तो भाग पूर्ववत झालेला नाही. अलीकडे ‘पुरुष’ नाटकानंतर बांधकाम खात्याच्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारण्याविषयी सरकारकडून सुतोवाच केले गेले. मात्र, प्रकाश योजनेत बदलांसाठी सव्वादोन कोटींचा खर्च अपेक्षित आहे, तो करणार कोण? कृती दलाने अखेरचा अहवाल दिल्यानंतर जे बदल करावे लागतील त्यासाठी सरकारने नियोजन केले आहे का?
तो अधिकचा आर्थिक भार कुणावर? गत पावसाळ्यात बऱ्याच भागांत झिरपणारे पाणी दिसून आले. त्यात बदल घडेल का? ध्वनी, प्रकाश योजना सदोष आहे. ब्लॅक बॉक्स छोट्या नाट्यगृहासाठी वापरणार असल्यास तशा तरतुदी केलेल्या नाहीत. प्रकाशयोजनेसाठी तेथे ‘ग्रीड’ नाहीत.
आंधळेपणाने पूर्वीची रचना आहे तशी स्वीकारली गेली. मुद्दा आहे इथून पुढे जाण्याचा. आधीच ५० कोटी रुपये खर्च झाले आहेत. तूर्त आहेत त्या संसाधनांमध्ये कमीत कमी बदल करून समस्या दूर करण्यावर भर राहिल्यास ते संयुक्तिक ठरेल. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कृती समितीकडून लवकरात लवकर अहवाल घ्यावा. त्यातील शिफारशी, उपायांच्या पूर्ततेसाठी पूरक
सहकार्य द्यावे. प्रश्न विचारणे, समस्या मांडणे हे राजकारण आहे, असे केवळ राजकारण्यांनाच वाटते असे नव्हे; त्याची बाधा कलाकार, चित्रकार, समीक्षक, विचारवंत आणि खंत व्यक्त करणाऱ्या प्रत्येकास वाटते. आपण सक्रिय असताना कला अकादमी कशी बहरली, ते दिवस सोनेरी कसे होते याचे गुणवर्णन करणारे तत्कालीन सक्रिय कलाकार, कला अकादमी उभारण्यासाठी कष्ट सोसलेले सगळे जण आणि आताही कला अकादमीविषयी ममत्व असणारे अनेक लोक याविषयावर जाहीर व्यक्त होणे टाळतात.
का? कसली भीती? ज्यांनी दुरवस्था केली ते वेगळेच आहेत, तरीही साधे व्यक्त व्हायलाही इतके का घाबरायचे? बरे, खाजगीत सगळे दात ओठ खाऊन बोलतात; पण व्यक्त व्हा म्हटले की, ‘कोण त्या चिखलात उतरणार?’ हा प्रश्न विचारला जातो. कला अकादमी ही केवळ गोमंतकीयांसाठीच अभिमानाची गोष्ट नव्हती, तर ती देशभरातील जाणकारांसाठी ते मान उंचावणारे स्थान होते. तिच्या दुरवस्थेचे दु:ख प्रत्येकाला आहे, त्याबद्दल दुमत नाही, शंकाही नाही. पण, केवळ दु:ख बाळगून ते नाहीसे होईल का?
द्रौपदीच्या वस्त्रहरणास दु:शासनापेक्षाही मान खाली घालून बसलेले सज्जनच जास्त जबाबदार होते. जे चूक आहे, त्याला ठामपणे चूक म्हटल्यानेच बरोबर काय आहे, याचा विचार सुरू होतो. अनेक जागरूक कलाकारांनी, ‘जागल्यां’नी पहिली, दुसरी घंटा दिली आहे. आता तिसरी घंटा देण्याचे काम कुणी करायचे? गतवैभव प्राप्त करून देणारा हा कलेचा मंच पडदा उघडून पुन्हा उजळून टाकायचा की सरकारने, प्रशासनाने चालवलेली नाटकेच पाहत बसायचे याचा निर्णय प्रत्येक मायबाप ‘गोंयकाराला’च घ्यायचा आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.