पिसुर्लेजवळ वाघुरेत व्याघेश्वराचे मंदिर असून पूर्वी मंदिराच्या देवराईत वाघाचा संचार असायचा; वन्यजीवांच्या रक्षणाची परंपरा

Wildlife Conservation: या साऱ्या चित्रांवरून हजारो वर्षांपासून आदिमानव आपले जीवन जंगली श्वापदांच्या आधारे कधी त्यांचे रक्त, मांस भक्षण करून तर कधी लोकर, कातडी यांचा वापर करून जगत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
International Tiger Day
World Tiger DayDainik Gomantak
Published on
Updated on

आदिम काळापासून दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या आदिमानवाचे प्राथमिक अवस्थेतले जीवन हे निसर्ग आणि पर्यावरणावर अवलंबून होते. जंगलातली विविध प्रकारची फळे, फुले, पाने, कंदमुळे त्याचप्रमाणे जंगली श्वापदांची शिकार करून मांसभक्षणाद्वारे गुजराण करणारा आदिमानव प्रारंभी भटका होता. कालांतराने त्याने नैसर्गिक गुंफा, शिलाश्रयांचा आधार घेतला.

परंतु जेव्हा शेतीचा शोध लागला आणि अन्न धान्याची पैदास करण्याचे तंत्र त्याला अवगत झाले, तेव्हा त्याच्या जीवनात स्थैर्य आले. अन्नाचा सातत्याने शोध घेणाऱ्या मानवी जीवनातली चिंता काही प्रमाणात दूर झाली.

नवपाषाणयुगाने सातत्याने चिंताग्रस्त असणाऱ्या मानवी समाजाला मोकळा श्वास घेण्याची फुरसत दिली आणि त्यामुळे पुराश्म, मध्याश्मयुगात आपण राहत असलेल्या नैसर्गिक गुंफात, शिलाश्रयात आपल्या सभोवताली वावरणाऱ्या आणि मांस, कातडी आणि शिंगांसाठी जंगली श्वापदांची शिकार करणाऱ्या आदिमानवाने प्रस्तर चित्रे रेखाटण्याची, त्याचप्रमाणे नैसर्गिक रंगांद्वारे या जनावरांची चित्रे रंगवायची कला अवगत केली.

मध्यप्रदेशातल्या भोपाळपासून काही अंतरावर रातापानी जंगलात भीमबेटका त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आदिमानवांनी जी चित्रे रंगवलेली आहेत, त्यात जंगली श्वापदांच्या चित्रांची संख्या लक्षणीय आहे.

मध्याश्मयुगाशी नाते सांगणारी जांभ्या दगडावरची शेकडो प्रस्तर चित्रे सांगे तालुक्यातल्या रिवण शेजारी असलेल्या धांदोळेच्या पणसायमळ येथे बारमाही वाहणाऱ्या कुशावती नदीच्या उजव्या तीरावर पाहायला मिळतात.

त्यात प्रामुख्याने हरण, गवा, हत्ती, रानटी बैल अशा जंगली श्वापदांची प्रस्तर चित्रे आहेत. केपे तालुक्याच्या काजुर गावातल्या दुधाफातर या पाईक देवस्थानाच्या शेजारी असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात हरणांची प्रस्तर चित्रे आहेत. सत्तरीतील म्हाऊस गावातल्या रवळनाथ मंदिराच्या डाव्या बाजूला झरमेनदीच्या पात्रातल्या दगडांवर रानटी बैलांची चित्रे कोरलेली आहेत.

या साऱ्या चित्रांवरून हजारो वर्षांपासून आदिमानव आपले जीवन जंगली श्वापदांच्या आधारे कधी त्यांचे रक्त, मांस भक्षण करून तर कधी लोकर, कातडी यांचा वापर करून जगत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.

जंगली श्वापदांत कधी काळी वावरणाऱ्या रानटी झेबु, महिषाला त्याने पाळीव केला आणि त्यांना नांगर ओढायला लावून शेतीच्या उत्पादनात वाढ केली. श्रमाची कामे करण्यात रानटी झेबुने पाळीव झाल्यावर मानवाला विशेष मदत केली. कालांतराने हत्तींनी रानात तोडलेले ओंडके ओढून आणण्यात त्याला मदत केली.

आज पाळीव म्हणून असणारे कुत्रे, मांजर, मेंढी, बकरी हे सारे प्राणी पूर्वी रानटीच होते. त्यांच्या पालनाने मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडले. परंतु असे असले तरी वाघ, सिंह, लांडगे आदी जंगली श्वापदांच्या हल्ल्यात तो जखमी किंवा मृत होत असल्याने त्यांना हिंस्र प्राणी अशी संज्ञा प्रदान केली.

नवाश्मयुगात शेतीच्या शोधाने जशी मानवी जीवनात क्रांती केली त्याचप्रमाणे आगीच्या शोधाने कच्चे मांस खाऊन गुजराण करणाऱ्या माणसाला भाजलेल्या, शिजवलेल्या अन्नाचा आस्वाद दिला.

अश्मयुगात वावरणाऱ्या मानव समाजाने जेव्हा आपली संस्कृती विकसित केली, गाव, शहरांची लोकवस्तीसाठी निर्मिती केली, तेव्हा माणूस आणि जंगल त्याचप्रमाणे त्यातली जंगली श्वापदे यांच्यात हळूहळू करून दुरावा निर्माण होऊ लागला. परंतु असे असले तरी आदिवासी आणि जंगल निवासी विविध जाती जमातींत लोकधर्माद्वारे सामूहिकरीत्या रानडुक्कर, हरण अशा जंगली श्वापदांची शिकार करण्यास प्रारंभ केला.

त्यांचे जीवन आणि स्नेहबंध त्यांच्याशी निर्माण झाले. भारतातल्या सिंधुसंस्कृतीत नंदीबैलाचे असलेले शिक्क्यावरचे चित्रांकन किंवा ग्रीक मेसोपोटोमियासारख्या प्राचीन संस्कृतीतही वन्यजिवांशी असलेल्या ऋणानुबंधाच्या धाग्याचे दर्शन आपणाला घडत असते.

भारतात जेव्हा लोकजीवन ग्रामीण आणि शहरी भागात स्थायिक झाले तेव्हा त्यांचा संपर्क वन्यजिवांशी कायम होता. मौर्य साम्राज्याच्या कालखंडात आर्य चाणक्यांनी जो अर्थशास्त्र ग्रंथ लिहिला त्यात वन्यजीव संरक्षण आणि संवधर्नाचा विचार करण्यात आला होता.

हत्तीसारख्या प्राण्याची नैसर्गिक अधिवासाअभावी जी फरफट होत होती त्याची जाणीव आर्य चाणक्यांना होती आणि त्यामुळे त्यांनी हत्तीच्या संरक्षणासाठी खास राखीव जंगलक्षेत्राची निर्मिती करण्याचा विचार मांडला होता.

मौर्य साम्राज्यातला एक आदर्श प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून नावारूपास आलेल्या सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत केवळ माणसासाठीच नव्हे तर जनावरांसाठी इस्पितळे सुरू केली होती. जंगली श्वापदांच्या शिकारीवर त्यांनी बऱ्याच प्रमाणात निर्बंध घातले होते.

रानटी जनावरांविषयी सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत भूतदयेची भावना तीव्र होती आणि त्यासाठी त्या काळातल्या शिल्पकलेत वाघ, सिंह, हत्ती यांच्याबरोबर पक्ष्यांना लाभलेल्या स्थानाची प्रचिती येते. जैन धर्माने आपल्या तत्त्वज्ञानात अहिंसेला महत्त्वाचे स्थान दिल्याकारणाने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य मानला. पशुबळीच्या प्रथेचा धिक्कार केला.

जैन धर्माशी निगडीत जे सत्याचा मार्ग दाखवणारे चोवीस तीर्थंकर आहेत. त्यांच्याशी निगडीत वन्यजीव आहे आणि त्यामुळे जैनधर्मीय राज्यकर्त्यांनी जंगली श्वापदांच्या मृगयेचे समर्थन केले नाही. त्यांनी मूक प्राण्यांना अभय देऊन त्यांचे संरक्षण करण्याला प्राधान्य दिले.

राजस्थानातल्या विष्णोई समाजाने वृक्षवेलींचे रक्षण केले नाही तर मृगकुळातल्या ‘ब्लॅक बक’ला पूर्ण आश्रय दिलेला आहे. आपल्या देशात विविध जाती जमातींना आजही पौष्टिक आहार मिळणे कठीण असल्याने ते रानटी जनावरांची शिकार करून त्यांचे मांस तितक्याच आवडीने खातात.

परंतु त्यांनीसुद्धा कधी शिकार करावी कधी करू नये, कोणत्या जनावराला इजा पोहोचवू नये, याचे नियम व अटींची चौकट निर्माण केली होती. जेव्हा मानवी जीवनात औद्योगिकीकरण आणि शहरीकरणाचा झंझावात आला तेव्हा त्याने जपून ठेवलेल्या असंख्य सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांचा त्याग त्याला करावा लागला.

त्यामुळे गावोगावी वृक्षवेली, पशुपक्षी, कृमीकिटक यांच्या रक्षणाला प्राधान्य दिलेल्या देवराया इतिहासजमा होऊ लागल्या. पूर्वी सामूहिक शिकारीवेळी एखादा जंगली प्राणी देवराईत शिरला तर त्याला ठार मारण्यास पूर्ण मज्जाव होता. आज देवराईची परंपरा दिवसेंदिवस दुर्बल होत चाललेली आहे.

पश्चिम घाट आणि पूर्वेकडचा हिमालय या भारताच्या दोन महत्त्वपूर्ण जीवनरेषा आहेत. हिमालयाच्या कुशीत राहणाऱ्या बऱ्याच जातीजमातींनी वडिलोपार्जित पर्यावरण मूल्यांच्या माध्यमातून वन्यजीव, वृक्षवेलींचे रक्षण केलेले आहे. दक्षिणेत केरळसारख्या राज्यात जी सर्पकवू आहे ती देवराईचेच रूप असून सापाच्या अधिवासाला सुरक्षित ठेवण्याबरोबर तिथे राहणाऱ्या असंख्य जीवांचे रक्षण केले जायचे.

International Tiger Day
Wildlife Survey: गोव्यात मगरी, बिबटे, पक्ष्‍यांची गणना होणार! वनमंत्री राणेंची घोषणा; ‘वाघेरी’ डोंगर संरक्षित करण्‍याचा मानस

कर्नाटकातल्या देवराकडूनी जैविक संपदेच्या विविध घटकांना आश्रय दिला होता. गोव्यात सत्तरी तालुक्यातल्या खाणग्रस्त पिसुर्ले गावाजवळ असलेल्या वाघुरेत व्याघेश्वराचे मंदिर असून पूर्वी मंदिराच्या भोवताली असलेल्या देवराईत वाघाचा संचार असायचा. या गावात पट्टेरी वाघाला पूर्ण संरक्षण लोकश्रद्धे्द्वारे प्राप्त झालेले आहे.

वाघाची हत्या झाली तर त्याचे दुष्परिणाम शिकार करणाऱ्या व्यक्तीबरोबर कुटुंबालाही भोगावे लागतात, असे मानले जात असल्याने इथे वाघाची शिकार करण्याचे कोणी धाडस करीत नाही. पट्टेरी वाघ ही जंगलाची शान अशी लोकभावना रूढ असल्याने त्याला लोकधर्मातही स्थान प्रदान केलेले आहे. गोव्यात बऱ्याच ठिकाणी वाघाने गुराढोरांची शिकार करू नये, गुराख्यांना इजा पोहोचवू नये म्हणून वाघरो देवाची स्थापना केलेली आहे.

International Tiger Day
Mhadei Wildlife: देवराईचं जंगल, पाण्याचे झरे आणि हजारो वर्षांचा वारसा 'म्हादईची देवराई', निसर्गसंपन्नतेचं देवतांकडून दिलेलं देणं

डिचोली शहरातल्या अवचित वाड्यावरसुद्धा वाघाच्या मूर्तीनेयुक्त वाघरो देवाचे स्थान आहे. झरमेत शिमगोत्सवात केल्या जाणाऱ्या रणमाले लोकनाट्यावेळी वाघाच्या मुखवट्याची पूजा केली जाते तर तांबडी सुर्लजवळ असलेल्या तयडे गावात शिमग्याच्या समारोपावेळी वाघ नृत्याचे सादरीकरण केले जाते. महाराष्ट्रातील बऱ्याच आदिवासी गावात वाघाला देव मानतात आणि त्याची पूजा करतात.

पशुपालक धनगर जमातीत शेळके कुळातले लोक बकरीची चुकूनसुद्धा हत्या करीत नाहीत, तर वरक कुळामार्फत फुरशे सापाचे आत्मीयतेने रक्षण केले जाते. अशा परंपरांचे रक्षण करून वन्यजिवांच्या संवर्धनाबरोबर आमचे जीवन सुंदर करू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com