जिथे कोणी नाही, तिथे संगीत आहे! हृदयाचे स्पंदन ते पावसाचे टप-टप... विश्वातील प्रत्येक गोष्टीत भरलेला आहे ताल!

Music: संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. जीवनात येणाऱ्या सुखदु:खात कोणी साथ देणारं नसलं तरी ते आपली सोबत करतच राहतं.
music emotional healing
music emotional healingDainik Gomantak
Published on
Updated on

संगीताला समर्पित असलेला ‘इंडियन आयडॉल’ हा कार्यक्रम पाहत असताना त्यातील एका स्पर्धकाने सांगितले की त्याच्या जीवनात एके वेळी काही विपरीत घडलेल्या प्रसंगामुळे असा एक क्षण आला होता की त्याला त्याचे जीवन आता संपले असे वाटू लागले आणि तो नैराश्याच्या खाईत लोटला गेला. अचानक जीवनात आलेल्या या संकटामुळे तो हतबल झाला.

पण त्या स्पर्धकाने हार मानली नाही. जीवनात शिक्षणासोबत त्याने संगीताचाही अभ्यास केला. संगीताच्या लय आणि तालावर आपले लक्ष केंद्रित करत त्याने आपला गेलेला आत्मविश्वास परत मिळवला. नैराश्यावर मात करत यशाचा मार्ग सुकर करणाऱ्या या स्पर्धकाची ही कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी अशीच आहे. संगीत हे आपल्या जीवनावर किती सकारात्मक परिणाम करू शकते, याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.

music emotional healing
Goa ZP Election: 'युती काबार'? काँग्रेसच्या 'फसवणुकी'ला आरजीपीचे प्रत्युत्तर; जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 12 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

संगीतात असलेल्या सा, नि, ध, प, म, ग, रे, सा, या सप्त सुरांवर संपूर्ण संगीत अवलंबून आहे. या प्रत्येक स्वरात विशिष्ट लहरी असतात. आपण जेव्हा संगीत ऐकतो, तेव्हा या लहरी आपल्या कानावाटे आपल्या मेंदूसोबत जोडल्या जातात. त्यामुळे या लहरींचा आपल्या मेंदूवर नकळत परिणाम होत राहतो. एखादे सूर किंवा एखादा आवाज जेव्हा आपल्याला जास्त आल्हाददायक वाटतो तेव्हा त्यातील सूक्ष्म तरंगांनी आपल्या मेंदूसोबत जास्त जवळीक साधलेली असते.

या संगीतातील ताल, लय यांचा ठेका जर परस्परपूरक ठरला, तर त्या संगीतातील गोडी वाढते. त्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम वाढीस लागतो. ताल, लय यांची साथसंगत ही गती निर्माण करणारी आहे. या संगीताला जर अध्यात्माची जोड मिळाली तर मग जीवनाचा आनंद प्रत्यक्ष अनुभवता येतो.

आपण जेव्हा उद्विग्न अवस्थेत असतो, तेव्हा आपल्या कानावर जर संगीताचे सूर पडले तर त्या सुरांचा विलक्षण परिणाम आपल्या मनावर होतो. आपले मन संगीताच्या तालावर ठेका धरते आणि संगीताच्या सुरांवर झुलताना आपल्या मनावर आलेले निराशेचे गडद काळे ढग नाहीसे होतात. आपले मन निराशेच्या गर्तेतून बाहेर पडते. याचाच अर्थ असा की, संगीत हे निव्वळ मनोरंजनाचे साधन नसून ते आपले अस्तित्व जपण्याचा एक भाग आहे.

जन्माला आल्यापासून मरणाच्या दारात जाईपर्यंत संगीत आपल्या सोबतीला असते. मूल जेव्हा जन्मते, तेव्हा त्याच्या रडण्यातही एक प्रकारचे संगीत असते. हृदयाच्या स्पंदनात, नाडीच्या ठोक्यात, श्वासोच्छ्वासात, आरतीच्या टाळ्यांत, घंटानादात, झाडापानांतून तसेच बांबूच्या वनातून वाहणाऱ्या वाऱ्यात, पानगळतीत, झऱ्यांच्या खळखळाटात, पक्ष्यांच्या किलबिलाटात, रातकिड्यांच्या किरकिरण्यात, विजांच्या कडकडाटात, ढगांच्या गडगडाटात , गॅसवर रटरट शिजणाऱ्या हुमणात, गरगर फिरणाऱ्या पंख्यात इतकेच काय तर टपटप पडणाऱ्या पावसातही संगीत भरून राहिलेले असते.

music emotional healing
Goa Accident: दारूच्या नशेत 'रिव्हर्स'; पादचारी ठार, बेभान कार चालवणाऱ्या युवकास पणजी पोलिसांकडून अटक

विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत संगीत व्यापलेले आहे. आपण जर नीट लक्ष देऊन ऐकले तर आपल्याला हे संगीत आपण जेव्हा चालत असतो, त्या चालीत ही एका प्रकारचे संगीत, लय असते. विश्वातील प्रत्येक गोष्टीत संगीत आणि ताल यांचा समन्वय असतो. तो बिघडल्यास सर्व बिघडते.

संगीताचा फक्त मानवी मनावर परिणाम होतो असे नाही, तर प्राणी, पक्षी, झाडे यांच्यावरही खूप मोठा परिणाम होत असतो. महान शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बॉस यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करताना झाडांनाही संवेदना असतात आणि आजूबाजूच्या वातावरणाचा, संगीताचा त्यांच्यावर परिणाम होत असतो, हे उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे. जर वनस्पतींना नियमित मधुर संगीत ऐकवले, तर निश्चितच त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होऊन त्यांच्या वाढीत, तसेच त्यांच्या फळाफुलांच्या येण्यावर भरीव परिणाम होतो हे सिद्ध झाले आहे.

जे मनोरुग्ण आहेत त्यांनाही मंद संगीत नियमित ऐकवले तर त्याचाही चांगला परिणाम होऊ शकतो आणि त्यांची भरकटलेली मन:स्थिती एकाग्र व्हायला खूप मदत होते, असे एका संशोधनातून सिद्ध झालेले आहे. शांत, मंद संगीताच्या सांनिध्यात राहिल्यास त्याचा परिणाम शरीरातील मज्जासंस्थेवर, आपल्या मेंदूवर नकळत होत असतो.

संगीत हे केवळ आपल्यालाच नव्हे, तर आपल्या देवदेवतांनाही प्रिय होते. म्हणूनच श्रीकृष्णाच्या हातातील बासरी जेव्हा श्रीकृष्णाच्या ओठांवर विराजमान होते, तेव्हा त्यातील संगीताच्या सुरांत अवघ्या गोकुळाला वेडे करण्याची ताकद होती. देवी सरस्वतीच्या हाती वीणा आहे, तर भगवान विष्णू यांच्या हाती शंख आहे. श्रीशंकर यांच्या हातात डमरू आहे. नारदमुनी तर हातात वीणा घेऊनच भ्रमण करत असत. पुराण काळात तर मेघमल्हार या शास्त्रीय रागाच्या संगीतात पाऊस पाडण्याची शक्ती असलेला राग मानला गेला आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर, संगीत हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. जीवनात येणाऱ्या सुखदु:खात कोणी साथ देणारं नसलं तरी ते आपली सोबत करतच राहतं.

- कविता आमोणकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com