

कौस्तुभ नाईक
इ.स. १७००मध्ये फोंडा हा ‘तळकोकण-ए-आदिलशाही’ या मोगल सुभ्याचा भाग होता आणि येथे बसालत खान हा फौजदार म्हणून नियुक्त होता. मात्र,स्थानिक सत्ता अजूनही देसाई आणि देशमुखांच्या हातात होती. ‘पेठ अंत्रोज’चे देसाई, नाकू नायक, हे या भागातील महसूल गोळा करणारे प्रमुख होते. त्यांनी एका जहागिरीचा महसूल गोळा करण्याचा ईजारा घेतला होता, पण मोगल प्रशासनाच्या हिशोबाप्रमाणे त्यांच्याकडे १०,००० ते १२,००० रुपयांची थकबाकी निघाली.
मोगल अधिकाऱ्यांनी नाकू नायकला अटक केली, पण काही काळाने सुटका होताच नाकू नायकाने मोगलांविरुद्ध उघड बंड पुकारले. नाकू नायक आणि त्याचा सहकारी दत्ता नायक यांनी मोगल प्रशासनाला जेरीस आणण्यासाठी गनिमी कावा वापरला. त्यांनी फोंडा आणि आसपासच्या गावांमधील मोगलांना मदत करणाऱ्या गावकारांना ठार मारण्यास सुरुवात केली आणि शेतकऱ्यांनी शेतीच करू नये अशी दहशत निर्माण केली. या बंडामुळे मोगल तिजोरीचे खरिफ हंगामात प्रचंड नुकसान झाले आणि भीतीपोटी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पेरणीच केली नाही.
जेव्हा मोगल सैन्य त्यांच्या मागावर असे, तेव्हा हे देसाई आपल्या सैन्यासह आणि नातेवाइकांसह पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या गोव्यात पळून जात.
पोर्तुगीज हद्दीत मोगल सैन्य प्रवेश करू शकत नसल्याने गोवा हे या बंडखोरांसाठी आश्रयस्थान बनले होते. फोंड्याचा हा स्थानिक संघर्ष आता मोगल आणि पोर्तुगीज ह्या सत्तांमधील राजकीय वादाचा विषय बनला होता.
फोंड्याच्या सीमावर्ती भागात नाकू नायकाचे बंड फोफावत असताना मोगल फौजदार बसालत खान यांनी तलवारीऐवजी लेखणीचा वापर करण्याचे ठरवले. त्यांचा वकील, मीर बुजुर्ग, याने पोर्तुगीज अधिकाऱ्यांना खरमरीत पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
या पत्रांमधील भाषा अत्यंत मुत्सद्दी होती. मोगलांनी पोर्तुगिजांना स्पष्ट सांगितले, तुम्ही आमच्या शत्रूंना आश्रय देत आहात, हे ‘दोन्ही राजांमधील’ मैत्रीला शोभत नाही. मोगलांची मागणी साधी होती: एकतर नाकू नायकाला जुन्या दरानुसार तडजोड करण्यास भाग पाडा, किंवा त्याला आणि त्याच्या माणसांना गोव्यातून कायमचे हाकलून द्या. जर पोर्तुगिजांनी असे केले नाही, तर त्याचे परिणाम गंभीर होतील असा अप्रत्यक्ष इशाराही देण्यात आला होता.
एकीकडे युद्धजन्य परिस्थिती असताना दुसरीकडे मोगल प्रशासन फोंड्यातील जनजीवन सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. फोंड्यात अनेक मशिदी, दरगे आणि ‘लंगरखाने’ होते. युद्धाच्या काळात स्थानिक शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे या अन्नछत्रांसाठी धान्याचा पुरवठा थेट कल्याण-भिवंडी येथून केला जात असे.
सय्यद कुतुबुद्दीन या मोगल अधिकाऱ्याला खास दस्तक देण्यात आला होता ज्याद्वारे तो कल्याणवरून फोंड्यापर्यंत विना-जकात धान्य आणू शकत असे. युद्धकाळातही गरिबांसाठी अन्नपुरवठा चालू ठेवण्याचे हे प्रशासकीय कौशल्य आणि कल्याणापासून फोंड्यापर्यंतची रसद व्यवस्था या पत्रांमधून अधोरेखित होते.
अखेरीस, मोगलांच्या दबावामुळे आणि व्यापाराच्या लोभापायी पोर्तुगीज नमले आणि त्यांनी मोगलांशी एक करार केला. या करानुसार पोर्तुगिजांनी नाकू नायकाला मोगलांशी तडजोड करण्यास भाग पाडले आणि जर त्याने ऐकले नाही, तर त्याला गोव्यातून हद्दपार करण्याचे मान्य केले.
पण राजकारणात फुकट काहीच मिळत नाही. या मदतीच्या बदल्यात पोर्तुगिजांनी मोगलांकडे मोठी मागणी केली - ती म्हणजे सुरत बंदरातील व्यापारात सवलती. मोगल बादशहाने सुरतेच्या गव्हर्नरला आणि जंजिऱ्याच्या सिद्दी याकूब खानला आदेश पाठवून पोर्तुगीज जहाजांना संरक्षण आणि दारूगोळा पुरवण्याचे आदेश दिले.
१७००-१७०१मधील फोंड्याचा हा इतिहास आपल्याला सांगतो की, हा लढा केवळ एका स्थानिक देशमुखाचा नव्हता. फोंड्यासारख्या एका लहान शहरासाठी, मोगल साम्राज्याने आपल्या जागतिक व्यापाराचे केंद्र असलेल्या सुरतेचे नियमही बदलले. स्थानिक स्वाभिमान, मोगल सत्ता आणि पोर्तुगीज व्यापारी वृत्ती यांच्या त्रिकोणात फोंड्याचा हा इतिहास घडला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.