Goa: कोकण रेल्वे सुरू झाल्यावर गोव्यात परप्रांतीयांचे लोंढे वाढले, शांत-सुंदर वातावरण बिघडून गेले

Impact of migration in Goa: एक वेळ अशी येईल की परप्रांतीयांचे प्राबल्य इथे वाढेल आणि इथला स्थानिक परका होऊन जाईल. इथले शांत सुंदर नैसर्गिक वातावरण बिघडून जाईल. इथली पारंपरिक संस्कृती बिघडून जाईल.
Impact of migration in Goa
Impact of migration in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

जयराम अनंत रेडकर

फाळणीनंतर पाकिस्तानातून आणि बंगलादेशच्या निर्मितीनंतर निर्वासितांचे लोंढे भारताकडे लोटले. त्यांचा उदरनिर्वाह आणि अवांछित स्थलांतर याचा अपरमित खर्च या देशाच्या बोकांडी बसला. पाकिस्तानच्या कुरापती अजूनही कमी झालेल्या नाहीत. तिथल्या आतंकवादी संघटना उत्तर पश्चिमी आणि उत्तर पूर्वेच्या दिशेने हल्ले करीत असतात.

या देशातील शांतता बिघडवणे, सैन्य बळाचे नुकसान करणे आणि स्थानिक जनतेला वेठीस धरणे हा त्यांचा उद्देश असतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या देशातील काही उग्रवादी संघटना या आतंकवादी संघटनाना आश्रय देतात, त्यांना सर्व ती मदत करतात. काही राजकीय नेत्यांच्या परिवारातील लोकांचे अपहरण करून सत्तेला वेठीस धरतात आणि आतंकवादी गुन्हेगाराना सोडविण्याची मागणी करण्यात येते.

पाकिस्तानसाठी काम करणारे इथले गद्दार स्लीपर सेलचे काम करीत असतात. हे गद्दार ओळखणे फार कठीण होऊन बसते कारण त्यांचे हात सत्ताधीशांच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात.

पक्ष कार्यकर्ते या गोंडस नावाखाली आणि सरकारच्या मर्जीतील वरिष्ठ अधिकारी म्हणून ते वावरत असतात. यामुळे त्यांचा सुगावा लागणे कठीण होते. २००८साली मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला आणि २०१९मध्ये पुलवामा येथे स्फोट घडवून ४० भारतीय जवानांचे बळी घेतले गेले ही त्याची ज्वलंत उदाहरणे आहेत.

जशी देशावर आक्रमणे होतात तशीच आता देशांतर्गत आक्रमणे एका राज्याची दुसऱ्या राज्यावर होऊ लागली आहेत. राज्यघटनेच्या कलम १९नुसार या देशातील नागरिकाला कुठेही राहता येते, आपला नोकरी व्यवसाय करता येतो. या अधिकाराचा वापर करून परप्रांतीयांचे लोंढे गोवा आणि महाराष्ट्र राज्यातील प्रमुख शहरात लोटलेले दिसतात कारण इथे नोकरी व्यवसायाच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.

याचा परिणाम म्हणून स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळणे अवघड होऊन बसते. बऱ्याच अंशी हे खरे आहे. परप्रांतीय आधी एकटे येतात, नंतर त्यांचे नातेवाईक येतात, गाववाले येतात आणि आपले बस्तान बसवतात. यातूनच ‘लाला की बस्ती’ निर्माण होते आणि वादाची ठिणगी उडते. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांच्या बाबतीत म्हणायचे झाले तर इथे उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, राजस्थान, काश्मीर, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या प्रदेशातून लोक आले.

गोव्यात कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर हे लोंढे अधिक वाढले. यातील काही जणांनी आपला व्यवसाय इमाने इतबारे केला खरा; परंतु यातील काही जणांनी खून, मारामाऱ्या, फसवणूक, बलात्कार असे गंभीर गुन्हे केले आणि इथले शांत वातावरण बिघडवून टाकले.

गोव्यातील पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव या प्रमुख बाजारापेठावर नजर टाकली तर कोणते चित्र दिसते पाहा. भाजी बाजार, फळ बाजार, मासळी बाजार, सुक्या मेव्याची दुकाने , मिठाईची दुकाने, सुपर मार्केटची दुकाने, केश कर्तनालये यावर हिंदी आणि गुजराती भाषिक लोकांचे आक्रमण झालेले दिसेल. शेतमजुरी, घरकामासाठी बायका, रंगारी, सुतार काम करणारे कारागीर, बांधकाम ही सर्व क्षेत्रे आता परप्रांतीयांनी काबीज केली आहेत आणि ते लोक सांगतील ती मजुरी मान्य करावी लागते.

’सुशेगाद गोंयकार’ ही बिरुदावली मिरवण्यात धन्यता मानणारे स्थानिक व्यावसायिक हातावर हात धरून बसले आहेत. काही स्थानिक व्यावसायिकांनी आपली पारंपारिक व्यवसायाची दुकाने या परप्रांतीयांच्या स्वाधीन केली असून त्यांनी दिलेल्या भाड्यावर समाधान मानीत आहेत. विनाश्रम, विना धडपड पैसा मिळतो यावर ते आपली गुजराण करतात आणि ‘पात्रांव’ म्हणून शेखी मिरवतात. पुढच्या पिढीच्या दृष्टीने हे धोकादायक ठरणार आहे याची जाणीव त्यांना नसावी.

Impact of migration in Goa
Goa Tourist In Jammu Kashmir: काश्मीरमध्ये अडकलेत गोव्याचे 50 पर्यटक; पहलगाम हल्ल्यानंतर घरवापसीसाठी प्रयत्न सुरू

अन्य प्रांतांतून आलेले धनदांडगे इथल्या जमिनी मिळेल त्या भावाने विकत घेतात, आपले बंगले बांधतात, मोठमोठी हॉटेल्स बांधतात, मॉल्स उभी करतात आणि इथले राजे बनतात. स्थानिक त्यांच्यापुढे मान तुकवतात. जमिनीचे अपेक्षेपेक्षा अधिक मिळणारे मोल लोकांना आज खूप मोठे वाटते. आज जमिनीचे भाव गगनाला भिडण्याचे हे प्रमुख कारण आहे? या धनदांडग्या लोकांचे लागेबांधे थेट वरिष्ठ राजकीय नेत्यांशी जोडलेले असतात.

त्यांच्याशी त्याचे साटेलोटे असते. यास्तव खरेदी विक्रीचे सारे सोपस्कार बिनबोभाट आणि जलदगतीने पार पाडले जातात. कुंपणच जर शेत खात असेल तर शेतकऱ्याने तरी काय करावे? अशी सगळी परिस्थिती आहे. संबंधित सरकारी बाबूदेखील यात आपला हात धुवून घेतात. म्हणजे.हलवायाच्या घरावर तुळशीपत्र!

Impact of migration in Goa
Pahalgam Terrorist Attack: दोषींना सोडणार नाही...,पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी PM मोदींची तंबी; 'या' संघटनेनी स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी

आज इथले डोंगर सपाट करून भूखंड तयार केले जात आहेत, उद्या नद्यादेखील गिळंकृत केल्या जातील आणि आपण फक्त बघत बसू! माणूस शांत बसत असला तरी निसर्ग शांत बसत नाही. जेव्हा अतिक्रमण असह्य होते तेव्हा निसर्ग आपले रौद्ररूप प्रकट करतो! एक वेळ अशी येईल की परप्रांतीयांचे प्राबल्य इथे वाढेल आणि इथला स्थानिक परका होऊन जाईल. इथले शांत सुंदर नैसर्गिक वातावरण बिघडून जाईल. इथली पारंपरिक संस्कृती बिघडून जाईल. किंबहुना त्याची सुरुवात झाली आहे. तेव्हा आता तरी सावध व्हा, सावध व्हा आणि ऐका पुढच्या हाका!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com