
नवाश्म युगात स्त्रियांनी शेतीचा आकस्मिकरीत्या शोध लावल्यावर मानवी समाजाला एखाद्या विशिष्ट वनस्पतीचे किंवा वृक्षाच्या रोपाचे रोपण केल्यावर अन्नधान्याची, फळाफुलांची पैदास करून प्राप्ती होऊ शकते, याचे ज्ञान गवसल्यानंतर संस्कृतीचा उदय झाला.
गोव्यातल्या सह्याद्रीत एकेकाळी प्रचलित असलेल्या डोंगर उतारावरच्या कुमेरी आणि वाहत्या नदीच्या पात्रात प्रचलित असलेल्या पुरण शेतीद्वारे तत्कालीन मानवी समाजाने विविध प्रकारच्या फळभाज्या, धान्याच्या बियांची पेरणी करून त्यांनी पैदास करण्याचे तंत्र विकसित केले.
पोटातल्या भुकेमुळे उसळणार्या आगडोंबाला थोपवण्यास प्रारंभीच्या काळात भटका आदिमानव वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या फळांचे, बियांतल्या गरांचे, कंदमुळांचे सेवन करायचा. दगडी हत्यारे वापरून तो जंगली श्वापदांची शिकार करून त्यांचे कच्चे मास भक्षण करण्यात धन्यता मानत होता.
परंतु स्त्रियांनी लावलेल्या शेतीच्या शोधामुळे त्याला अतिरिक्त धान्य भविष्यासाठी साठवून ठेवण्याचे ज्ञान गवसले. शेतीमुळे उपलब्ध झालेल्या अन्नधान्यामुळे कंदमुळे, फळेफुले गोळा करण्यासाठी आणि जंगली मांसाच्या प्राप्तीसाठी भटकंती करणार्या मानवी समाजाच्या जीवनाला स्थैर्य लाभले आणि कालांतराने संस्कृतीचा जन्म झाला.
गोव्यात डोंगर उतारावर, सह्याद्रीच्या प्रदेशात प्रामुख्याने केल्या जाणार्या कुमेरी शेतीमुळे त्या काळचा मानवी समाज राळो, कांगो, पाखंड, कुळीथ, नाचणी, उडीद यांची पैदास करायचा, काकड्या, चिबूड, दोडकी, भोपळे यांची लागवड करायचा.
सामूहिकरीत्या केल्या जाणार्या अशा शेतीला ‘सावड’ म्हटले जायचे. गवळात वास्तव्य करणार्या माणसाला कुमेरी शेती अन्नधान्याचा पुरवठा करायची. नदी पात्रात दगडाचे बांध काही ठरावीक अंतरावर घालून वाहत्या पाण्याला नियंत्रित करून किनार्यावरच्या गाळाद्वारे पुरणीची निर्मिती केली जायची आणि त्यात पारंपरिक भाताच्या बियांच्या तरारलेल्या रोपांची लागवड केली जायची.
कालांतराने जेव्हा वायंगणी शेती करण्याकडे कल वाढला तेव्हा डोंगर उतारावर शेती करण्याऐवजी वायंगणी शेती अधिक सोयीची आणि फायद्याची असल्याची त्याची धारणा झाली. नदीकिनारी घरे बांधून राहू लागल्याने त्यातून कुटुंब, समाज, गाव यांचा उगम झाला.
शेतीमुळे मानवी समाजाच्या जीवनात विलक्षण बदले घडत गेले. भटकेपणाला नियंत्रण लाभले. आपल्या घराशेजारी फळांच्या फुलांच्या, भाज्याच्या वनस्पतीची लागवड करण्यास त्याने प्रारंभ केला. परसबागेत त्यांनी लावलेल्या परंपरागत भाज्यांमुळे लोह, चोथा यांच्याबरोबर औषधी गुणधर्मासह पोषक तत्त्वांची प्राप्ती होऊ लागली.
गोव्यातल्या शेतीशी संबंधित विविध समाजांनी शेकडो वर्षांपासून शेतीसाठी निवडलेल्या विविध भाताच्या प्रजाती, त्याची विभिन्न तर्हेच्या पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता, या जातीचे जंगली भाईबंद आणि स्थानिक जाती यांचा घडवून आणलेला संकर आणि कित्येक वर्षांपासून प्रचलित उत्क्रांतीची प्रक्रिया यामुळे गोव्यातल्या पिकांमधल्या विविधतेला प्राधान्य लाभले.
गोव्यातल्या लोकसंस्कृतीत स्थानिक प्रजातीच्या वृक्ष आणि वनस्पतींना महत्त्वाचे स्थान असल्याकारणाने इथल्या समाजाने त्याच्या लागवडीला प्राधान्य दिले असावे. आंबा, औदुंबर, कलमसारखी झाडे काही समाजाची कुलचिन्हे असल्याने त्यांना संरक्षण देण्याची मानसिकता निर्माण झाली.
देवरायांच्या माध्यमातून माडत, किंदळसारख्या असंख्य वृक्षवेलींना संरक्षणाचे कवच समाजाने प्रदान केले. लोकधर्माने वडात शिवशंभो, पिंपळात श्रीविष्णू, कदंबात श्रीकृष्ण तर आंबा, पायरी कोकम, घोटींगसारख्या महाकाय वृक्षात राष्ट्रोळी, दाड, नास, देवचाराचा अधिवास पाहिल्याने त्यांचे संरक्षण करण्याची भावना वृद्धिंगत झाली.
गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता येताच याठिकाणी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सांस्कृतिक विध्वंसाचे सत्र राबवले असले तरी त्यांच्याबरोबर आलेल्या काही धर्मोपदेशकांनी येथील आंब्यांच्या झाडांचा संकर करून मानकुराद, बेमकुदार, मालगेस, पायरी, झेवियर, कुलासो, हापूस, चिमुद, बिशप, कोर्ता, मोन्सेरात आदी संकरित जाती विकसित करून गोव्यातल्या लोकमानसाला आम्रवृक्षांची व्यापक प्रमाणात लागवड करण्याची जणू काही दीक्षाच दिली.
पाचशे वर्षांपूर्वीच्या आपल्या देशात बटाटे, भुईमूग, टोमॅटो, मिरची अस्तित्वात नव्हती. आपल्या पश्चिम किनारपट्टीवरच्या सुरत, मुंबई, दाभोळ, होन्नावर, मंगलोर, गोवा, कोचीन सारख्या बंदरांनी महत्त्वाच्या आणि उपयुक्त परकीय वनस्पतीची आयात आणि त्यांचे वितरण करण्यात विशेष योगदान केलेले आहे.
वास्को द गामाच्या १४९८सालच्या भारताकडे येण्याच्या मार्गाच्या शोधामुळे आणि मोगल बादशहांनी दिलेल्या व्यापारी सवलतीमुळे अनेक परकीय वनस्पतींच्या प्रजाती भारतात म्हणजे गोव्यासारख्या सागरीभूमीत आल्या आणि त्यामुळे स्थानिक वनस्पतींच्या जनुक साठ्यामध्ये फेरबदल घडून आले.
पोर्तुगिजांनी भारत आणि आग्नेय आशियातील मसाल्याचे पदार्थ लागवडीसाठी ब्राझीलमध्ये नेले, तर ब्रिटिश आणि डचांनी ब्राझीलमधून रबराची झाडे मलाया आणि इंडोनेशियामध्ये लावली.
ब्राझीलहून आपल्याकडे अननस, काजू, चिकू, निवडुंग, तंबाखू, शेंगदाणा, ऑस्ट्रेलियातून निलगिरी, सुबाभूळ, वेस्ट इंडिजहून मामफळ, पाढरीआबई, पपई, रामफळ, मादागास्करहून गोरखचिंच, गुलमोहर, मेक्सिकोहन कोको, आफ्रियन झेंडू, पेरू, सीताफळ, इथिओपियाहून कॉफी, मलास्काहून बदाम, रंगून वेल, जगम, करमल (फळ), जाम, लवंग,
हैतीहून मिरची, चीनहून जास्वंद, मैदी, जाई, मोसंबी, चहा, लिची, संत्रे, इराणहून डाळिंब, भूमध्यसामुद्रिक युरोपहून मसूर, कोथिंबीर, कोबी, इंडोनेशियाहून जायफळ, पर्शियाहून कांदा, उष्णकटिबंधीय आफ्रिकेतून टॉपिओका, तांबडी अंबाडी, पश्चिम अमेरिकेहून सूर्यफूल आदी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त वनस्पतींच्या प्रजातींचे आगमन इथे झाले आणि आज या पिकांच्या बाबतीत यातल्या बर्याच प्रजातीत भारत जगातील सर्वाधिक उत्पादन घेणार्या देशांपैकी एक आहे.
बटाटे, वाटाणे, टोमॅटो आदी पिकामुळे इथल्या अन्न संस्कृतीत वैविध्य आले. पोर्तुगिजांनी मानकुरादसारख्या आंब्याच्या प्रजातीचे जे संकरित कलम लोकप्रिय केले, त्यामुळे मये, चोडणसारख्या गावात या आंब्याच्या आमराई पाहायला मिळतात.
गोव्यातल्या आदिवासी गावड्यांनी माड, पोफळी, नीरफणस, अननस, मसाल्याची पिके यांनी कुळागरांना वैभवशाली केले. चित्पावन, कर्हाडेसारख्या ब्राह्मणांनी सत्तरी, डिचोली, फोंडासारख्या परिसरात बर्याच कुळागरांचे आत्मीयतेने संगोपन केले. त्यामुळे आंबा, फणस, मसाल्याची पिके, माड-पोफळीची लागवड करण्याचा कल गोमंतकीय लोकमानसात प्रचलित आहे.
ब्राझिलहून आलेल्या काजूच्या लागवडीमुळे जमिनीची धूप रोखण्याचे कार्य केले, गोव्यातल्या लोकमानसाने त्याच्या बोंडूच्या रसावर प्रक्रिया करून हुर्राक आणि फेणीसारख्या मादक पेयांची निर्मिती केली आणि काजुगरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून दिली. पोर्तुगीज अमदानीत संकरित आंब्याच्या त्याचप्रमाणे काजूची लागवड वाढली.
गोव्यातल्या जनतेत उपजतच वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपनाची परंपरा असल्याकारणाने आज भौगोलिक आकाराने छोटी असलेली ही भूमी आपल्या हिरव्या वैभवाने सुंदर दिसत आहे. वृक्षारोपण आणि वृक्षसंगोपन यांची ही परंपरा आजच्या बदलल्या काळात इथल्या लोकमानसाने दिवसेंदिवस वृद्धिंगत केली तर कर्बवायूच्या उत्सर्जनाच्या भयाण संकटात ही झाडे आम्हांला दिलासादायक ठरतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.