

बालपणी चित्रात बघितलेला, तंत्रशरण युगात डिजिटल गॅझेटमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात दिसणारा अवाढव्य हत्ती प्रत्यक्षात पाहिल्यानंतर कुणीही हरखून जाईल. महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरील दोडामार्ग-तिळारीच्या जंगलातून कळपापासून वेगळा झालेला ‘ओंकार’ नामक दहा ते बारा वर्षांचा हत्ती सप्टेंबर महिन्यात पेडण्यात दाखल झाला.
हत्ती काही पाळीव प्राणी नव्हे. दु:ख, आनंद, प्रेम अशा भावना मानवाप्रमाणे हत्तींमध्येही तीव्रतेने आढळतात. हिरव्याकंच झाडीत दिमाखात फिरणाऱ्या आनंदी हत्तीला राग आल्यास थेट जिवाशीवाशीच गाठ.
एप्रिल महिन्यात दोडामार्गमधील एक शेतकरी हत्तीच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्याचा विषण्ण अनुभव वानगीदाखल पुरेसा आहे. शेतातून जाताना कणसे अंगावर उडवणारा हत्ती पाहणाऱ्यास विलक्षण अनुभूती देणारा; परंतु निसर्गवल्लीतून त्याचा तो मनसोक्त विहार शेतकऱ्यांच्या मुळावर आला. नव्याची नवलाई काही काळापुरतीच.
वन खात्याने फटाके वाजवून हत्तीला पांगवण्याची चालवलेली केविलवाणी धडपड बघ्यांच्या गराड्याने अधिक धोकादायक बनली. आता फटाक्यांची जागा मशालीने घेतलीय. वनमंत्र्यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांसोबत प्रशिक्षित हत्तींच्या मदतीने ‘ओंकार’चे वनअधिवासात स्थलांतर करण्याचे योजले, तोवर सिंधुदुर्गाच्या सीमेवरील वनअधिकाऱ्यांना वाकुल्या दाखवून ‘ओंकार’ सावंतवाडी तालुक्यात डेरेदाखल झाला.
गोव्याचे प्रयत्न थांबले. सिंधुदुर्गात पेडण्यातील पुनरावृत्ती झाली, मंत्री नितेश राणे यांनी ‘ओंकार’ला गुजरातमधील ‘वनतारा’मध्ये सोडण्याचा चंग बांधला. काही प्राणीप्रेमींनी ‘ओंकार’ला पश्चिम घाट वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात धाव घेतली.
‘ओंकार’ला ‘वनतारा’ या खासगी सुविधेकडे हस्तांतरित न करता त्याला तत्काळ महाराष्ट्र वनविभागाने आपल्या अखत्यारीत नैसर्गिक अधिवासात सोडावे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने दिला आहे.
परंतु दोन महिने सिंधुदुर्गात मुक्काम केल्यानंतर दोन दिवसांपूर्वीच ओंकार गोव्याच्या हद्दीत आला. परिणामी न्यायालयीन आदेश पुढे नेण्यात ‘खो’ मिळू शकतो. हत्ती सीमा ओळखत नाही. त्या माणसांना, सरकारांना लागतात. सीमाचक्रात ‘ओंकार’चा झालेला फुटबॉल कुणाच्या तरी जिवावर बेतू शकतो, हा खरा मोठा धोका आहे. त्यासाठी गोव्याच्या वनमंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारशी संवाद साधून ‘ओंकार’चा बंदोबस्त करणे अगत्याचे आहे.
दोन्ही राज्यांत भाजपचे सरकार आहे. यापूर्वी कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी हत्तीच्या बंदोबस्तासाठी मदतीचे आश्वासन देताना आवळा देऊन कोहळा काढण्याजोगा केलेला प्रयत्न अयोग्य होता. त्यांनी कळीचा मुद्दा ‘म्हादई’साठी सकारात्मकता दाखवण्याची मागणी केली होती.
हत्ती लोकवस्तीत का येतात, ह्या मुद्यावर आम्ही याच स्तंभातून भाष्य केले आहे. आज गरज आहे ‘ओंकार’चे नैसर्गिक अधिवासात पुनर्वसन करण्याची. तोरसे येथे फिरणाऱ्या ‘ओंकार’नजीक बागडणाऱ्यांमुळे हत्ती बिथरण्याची प्रचिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘ओंकार’ संकट वाटते; हत्तींवर मानवी संकट याआधीच ओढवून गेले आहे, त्याचाही समग्र विचार होणे गरजेचे आहे. माणूस आणि वन्यप्राणी एकत्र कसे व कुठवर राहू शकतील याचा विचार माणसांनीच करायला हवा. त्या मर्यादा आखून त्यापलीकडे जाणे - काहीही झाले तरी - टाळलेच पाहिजे.
वन्यप्राणी माणसांचे व मानव वन्यजीवांचे शत्रू नाहीत; उलट ते एकाच निसर्गसाखळीचे घटक आहेत. सीमित बुद्धिमत्ता असलेले प्राणी ही निसर्गसाखळी सांभाळतात; आम्ही माणूस ते जाणण्याची क्षमता असूनही समजून घेतो का? समस्या ‘ओंकार’ नाही; समस्या माणूसच आहे. त्याचा विचार व या समस्येचे सकारात्मक निराकरण सरकार, वनविभाग यांना करावेच लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.