
दिवसातले दोन अडीच तास निष्ठेने वृत्तपत्रांचं वाचन करणारा अस्सल वाचक जर आज पंधरा मिनिटांमध्येच वृत्तपत्र वाचून उठत असेल तर वाचक व वृत्तपत्र ह्या दोन मित्रांमधल्या दुराव्याचं कारण शोधणं आवश्यक ठरतं. ‘फेक न्यूज’ हे ह्यातलं एक कारण झालं. पण पत्रकारितेच्या जगतात ज्याला न्यूजवर्दी किंवा बातमीयोग्य मानलं जातं अशा घटनांचा मागमूस जर लोकप्रिय वृत्तपत्रात नसेल तर हे ‘वृत्तपत्रीय मौन’ वाचक व वृत्तपत्रांमधल्या दुराव्याचं दुसरं कारण आहे.
‘फेक न्यूज’ दोन प्रकारची असते. एक तद्दन खोटी बातमी. दुसरी एखाद्या घटनेचा स्वतःच्या राजकीय विचारधारेनुसार विपर्यास करणारी बातमी. ह्यालाच ‘नॅरेटिव्ह’ म्हणतात. ‘फेक न्यूज’ आणि ‘नॅरेटिव्ह’ हे समानार्थी शब्द आहेत. पण अशीही एक बातमी असते जी लपवली जाते. हिला कुठल्या प्रकारची बातमी म्हणायचं? सोशल मिडियाच्या काळात लाखो मोबाइलधारी व्यक्ती हौशी पत्रकार झाल्या आहेत.
त्यांच्या उत्साहामुळे भोवताली घडणाऱ्या असंख्य घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातल्या महत्त्वाच्या घटनांची बातमी किंवा त्यावर भाष्य वृत्तपत्रांकडून अपेक्षित असतं. कारण सोशल मिडियाचा कितीही गवगवा झाला तरी अभिजात वाचक वृत्तपत्रीय बातमी व विश्लेषणालाच जास्त महत्त्व देतो. ‘प्रिंट मिडियम’ची म्हणजे लिखित शब्दांची हीच जादू आहे.
जे लिहिलंय ते खरंच आहे असं मानण्याकडे मानवी मनाचा कल असल्याने लेखक वाट्टेल ते लिहितात आणि वाचक त्यावर विश्वास ठेवतात. आजही भारतीय इतिहास व संस्कृतीचे तज्ज्ञ म्हणवून घेणारे डझनांशी ब्रिटिश व अमेरिकन इंडोलॉजिस्ट आणि पाश्चात्त्य मानसिकता बाळगणारे शेकडो भारतीय स्कॉलर्स देशी संस्कृतीचं अवमूल्यन करणारे नॅरेटिव्ह मांडत असतात. ते ग्रंथबद्ध असल्याने सामान्य वाचक व स्कॉलर्स ते सत्य मानतात. ह्यावर उपाय काय?
पेपरात आलेली बातमी ही तथ्यावर आधारलेली असतेच असं नाही, तर ती वचित हेतुपूर्वक रचलेली रोचक कथा असते हे मला कळायला २०१६साल उजाडावं लागलं. वृत्तपत्रीय जगताबद्दलची ही निरागसता माझाच दोष होता. हेतूप्रधान पत्रकारिता करणारे पत्रकार आपलं काम चोख बजावत होते. माझाच सत्यासत्य विवेक झोपल्याने ते मला कळलं नाही. ह्या बाबतीत दोन तीन उदाहरणं सांगावीशी वाटतात.
’हिंदू’ हा माझा आवडता इंग्रजी पेपर. राफेल विमानांच्या प्रकरणात घोटाळा झाला हा त्यांचा नॅरेटिव्ह त्यांनी एका अधर्र्वट रिपोर्टच्या आधारे रचला. अर्धवट ह्यासाठी की ह्या बाबतीतल्या कागदपत्रांमधला काही भाग लपवून उरलेल्या रिपोर्टच्या आधारे देशाच्या संरक्षण मंत्र्यांना कचाट्यात पकडण्याची योजना त्यांनी आखली. तिचा खरा उद्देश, अर्थातच देशाच्या पंतप्रधानांचं प्रतिमाहनन करणं हा होता. कालांतराने ‘हिंदू’चा दावा सुुप्रीम कोर्टात खोटा ठरला. पण तोपर्यंत हे वृत्तपत्र माझ्या मनातून पार उतरलं होतं. काटछाट केलेलं, लपवलेलं सत्य हे असत्यच असतं हे ज्ञान मला मिळालं.
२०१६साली दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात डाव्या विद्यार्थी संघटनांनी एका सभेत भारत विरोधी खूप घोषणा दिल्या. त्या साऱ्या देशाने टेलिव्हिजनवर ऐकल्या. पण प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रांनी व वृत्तवाहिन्यांनी ह्या घोषणांना अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य म्हणून गौरवलं. तेव्हा देशाची अखंडता ही दुय्यम बाब असून डाव्या विचारधारेच्या विद्यार्थ्यांचं देशविरोधी घोषणा देण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मौलिक असतं हे नवं ज्ञान मला झालं. मग मला एक कळलं आपला हा देश सशक्त व अखंड राहावा असं जे माझ्या सारख्या सामान्य भारतीयांना वाटतं, तसं काही उच्चभ्रू संपादक, पुरोगामी पत्रकार व डाव्या विचारवंतांना वाटत नाही. असं कसं? मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो.
२०१६ पर्यंत मला वाटायचं की काश्मीर हा भारताचा भाग नाही, मुंबई बाँबस्फोटातला गुन्हेगार अफजल गुरु निर्दोष आहे, देशात हिंसाचार घडवून आणणारा पाकिस्तान भारताचा सच्चा मित्र आहे असा विचार करणारे भारतीय सख्येने मूठभरच असतील. पण बघतो तर त्यांची संख्या डोळ्यात भरणारी होती. आश्चर्य म्हणजे त्यांना देशातल्या बोलघेवड्या समाजाचा म्हणजेच ‘सिविक सोसायटी’चा बिनशर्त पाठिंबा होता. ह्या समाजाने दहशतवाद्यांच्या मानवी अधिकाराची चर्चा इतया मोठ्या आवाजात सुरू केली की त्यात दहशतीचे बळी ठरलेल्या बिचाऱ्या भारतीयांनाही मानवी अधिकार असतात हे सारे विसरले.
दुर्दैवाने त्या काळात कुठल्याही राष्ट्रीय वृत्तपत्राने अथवा ‘अधिकृत’ विचारवंताने इस्लामिक दहशतवादाचा निःसंदिग्धपणे निषेध केला नाही तर त्याबद्दल संदिग्ध भूमिका घेऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्याला देशहिताहून श्रेष्ठ मानलं. माझ्या भोवताली ‘आझादी’, ‘अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य’ इत्यादी नॅरेटिव्हचं इंद्रजाल पसरत होतं. हळूहळू मी माझ्या ‘सेयुलर’, ‘लिबरल’ व ‘प्रोग्रे्रसिव्ह’ झोपेतून जागा झालो. मला वाटलं ह्या तिन्ही रंजक नॅरेटिव्हच्या तुलनेत कॉमन सेन्सला उचलून धरणारा आणि कॉमन मॅनच्या आकांक्षांना व्यक्त करणारा राष्ट्रप्रेमाचा नॅरेटिव्ह अधिक विश्वासार्ह आहे. त्यामुळे माझ्या देशाची एकता आणि अखंडता टिकून राहतेच पण मुख्य म्हणजे भारतीय संविधानाने सुद्धा ह्या दोन मूल्यांना शिरोधार्य मानलं आहे.
वृत्तपत्रांना मित्र समजून मी त्यांच्याशी जो दोस्तीचा व्यवहार सुरू ठेवला होता त्याला निर्णायक ठेच २०१९नंतर लागली. असं झालं की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थानापन्न झालं. ते कसं? हे साऱ्यांना माहीतच आहे. पण ह्या काळात विरोधकांची मुस्कटदाबी सुरू झाली, त्यांना मारहाण करा, त्यांना तुरुंगात पाठवा, त्यांचं चरित्रहनन करा, त्यांची घरं पाडा आणि जमेल तर त्यांना ठार मारा इथपर्यंत मजल गेली. हे अत्याचार एकोणिसाव्या शतकात पुण्यात घाशीराम कोतवालने केलेल्या अत्याचारांना लाजवणारे होते. ह्या घटना वृत्तपत्रीय जगतात अत्यंत न्यूजवर्दी म्हणजे बातमीयोग्य होत्या. पण मुख्य धारेतल्या वृत्तपत्रांनी त्या खुबीने लपवल्या.
अत्याचारांना वाचा फोडणं हे अभिजात पत्रकारितेचं ध्येय असतं हे घोकत मी वयात आलो होतो त्यामुळे तिथल्या प्रमुख वृत्तपत्रांकडे मी आशेने बघत होतो. महाराष्ट्रात सगळेच स्वतःला पुरोगामी समजतात. विचारवंत पुरोगामी, नेते पुरोगामी, संपादक पुरोगामी, पत्रकार पुरोगामी, कवी पुरोगामी, कादंबरीकार पुरोगामी, कलाकार, चित्रकार, अभिनेते सगळेच पुरोगामी...ही यादी लांब असून त्यांच्यातला मुख्य दुवा पुरोगामीपणा होता. पुरोगामी असणं सुंदर असतं, ते सामाजिक प्रतिष्ठेसाठीसुद्धा आवश्यक असतं.
मला वाटलं महाराष्ट्रात सुरू झालेला हा अनाचार बघून प्रत्येक पुरोगामी पेटून उठेल, ‘आता उठवू सारे रान’ हे समाजवादी चळवळीचं क्रांतिगीत गात तिथला प्रत्येक क्षेत्रातला पुरोगामी माणूस तत्कालीन शासनाला सळो की पळो करून सोडेल. ह्या अन्यायाविरुद्ध जागोजागी सभा होतील, संपादकीय लिहिली जातील, विचारवंत, कार्यकर्ते, साहित्यिक, एन.जी.ओ. सगळे ह्या अन्यायाविरुद्ध आकाश पाताळ एक करतील. मग माझ्यातलं पुरोगामीपण भरून पावेल.
पण तसं काहीच झालं नाही. ह्या उलट पुरोगामी महाराष्ट्र त्या अत्याचारांवर एक तर मौन बाळगून बसला किंवा ते अत्याचार, अत्याचार नसून केंद्रातल्या ‘हुकूमशाही’ विरुद्ध राज्यसरकार दंड ठोकून ठाम उभं आहे असा नॅरेटिव्ह प्रमुख वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केला. हे कमी होतं की काय म्हणून राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देशातले सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री असल्याचा निर्वाळाही एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने दिला.
त्याला सगळ्या पुरोगामी संपादक व पत्रकारांनी माना डोलावून मान्यता दिली. तेव्हा मला प्रश्न पडला, तो म्हणजे पुरोगामित्व अत्याचाराच्या बाजूने असतं की त्याविरुद्ध? आजही ह्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालेलं नाही. मग जाणवलं की त्या राज्यात २०२०साली जे सुरू होतं तो पुरोगामित्वाचा आविष्कार नसून पुरोगामित्वाचा नॅरेटिव्ह होता. नॅरेटिव्ह इज फेक न्यूज.
सामाजिक सत्याचं स्वच्छ दर्शन व्हावं, सामाजिक विश्वात सत्याची प्रतिष्ठापना व्हावी, देशविरोधी शक्तींचं निर्दालन व्हावं अशा सर्वसामान्य अपेक्षा बाळगणारा माझ्यातला मुरलेला वाचक वृत्तपत्रांबद्दल उदासीन होऊ लागला कारण मुख्य धारेतल्या वृत्तसंस्था व वृत्तवाहिन्या न्यूजवर्दी बातम्या लपवू लागल्या होत्या. किंवा घटनांना स्वतःच्या झापडबंद विचारधारेच्या चौकटीत बसवून त्यांचं कथानक विणून त्यांचा नॅरेटिव्ह रचू लागल्या होत्या. नॅरेटिव्ह इज फेक न्यूज.
पण मग ज्यांना निखळ सत्य जाणून घ्यायचंय त्यांनी आज कुठे जावं? नॅरेटिव्हच्या बाजारावर विश्वास टाकला तर भ्रमाचं भरघोस पीक हाती येतं, त्यावर बहिष्कार टाकला तर जे निसटतं सत्य हाती लागू शकतं तेसुद्धा चुकतं असा हा पेच आहे. वरील तिन्ही उदाहरणं केवळ व्यक्तिगत मतं नसून त्यांना घसघशीत सामाजिक तथ्यांचा आधार आहे. माझी एकेकाळची आवडती वृत्तपत्रं ही निरीक्षणं नाकारू शकतील?
- विश्राम गुप्ते
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.