

सुशांत कुंकळयेकर
तो संवाद बोलायचा, तेव्हा पडदा हादरायचा... तो हसायचा, तेव्हा सभागृह दुमदुमायचे... आणि तो माणुसकीबद्दल बोलायचा, तेव्हा काळजाला हात घालायचा. अभिनयाचा हा अवलिया आज निघून गेला. नाना पाटेकर यांच्या जाण्याने केवळ एक अभिनेता हरपला नाही, तर आपल्या काळाचा एक अस्सल आवाज कायमचा शांत झाला. त्याच्या आठवणी मात्र प्रत्येक संवादासोबत पुन्हा पुन्हा जिवंत होत राहतील.
१९९३ ची ही गोष्ट. नाना पाटेकर यांचा ‘प्रहार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. त्यामुळे नानांच्या नावाभोवतीचे वलय अधिकच गडद झाले होते. त्याचदरम्यान चित्रपटांशी संबंधित असलेले मडगाव येथील बिल्डर आणि सध्याचे मडगाव रवींद्र भवनचे अध्यक्ष राजेंद्र तालक यांच्या एका गृहप्रकल्पाचे उद्घाटन होते. त्यासाठी तालक यांनी नाना पाटेकर यांना मडगावात बोलावले होते.
राजेंद्र तालक आणि नाना पाटेकर या दोघांमधील त्यावेळचा दुवा म्हणजे कवी आणि गीतकार मंगेश कुलकर्णी. तालक यांच्या काही चित्रपटांसाठी मंगेश यांनी काम केले होते. त्यामुळे तालक यांनी मंगेश यांनाच गळ घालून नानांना आपल्या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी बोलावले होते. या सोहळ्यानंतर साहजिकच रात्री तालक यांच्या घरी डिनर ठेवण्यात आले होते. या डिनरला त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात वावरणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित केले होते. आणि नानांबरोबर डिनर म्हटल्यावर ते सोडणे शक्यच नव्हते. पत्रकार या नात्याने मीसुद्धा त्या डिनरला हजर होतो.
रात्र जसजशी वाढू लागली तसतसा त्या डिनर पार्टीला रंग चढू लागला. गप्पांचा फड जमला होता. नाना अगदी रंगात आले होते. त्यावेळी त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसलेल्या श्रोत्यांना नानांनी एक गोष्ट सांगण्यास सुरुवात केली. गोष्ट होती हरणाच्या चामड्यापासून तयार केलेल्या ढोलाची. एका आदिवासी वाड्यावर दिवसभर काम करून सायंकाळी घरी आलेले कामगार दिवसभराचा श्रमाचा शीण घालवण्यासाठी रात्रीच्या वेळी ढोल वाजवत नाचायचे. आणि हा ढोलाचा आवाज घुमू लागला की एक नर हरीण धावत त्या पाड्याकडे यायचे. अगदी निश्चल होऊन ते वादन ऐकायचे. त्यावेळी त्या नर हरिणाचे डोळे पाणावलेले असायचे.
पुढे ज्या-ज्या वेळी हा ढोल वाजवला जायचा, त्या त्या वेळी ते नर हरीण तिथे हजर व्हायचे. त्याचा तो जणू परिपाठच बनला होता. त्यामुळे ते आदिवासीही चक्रावले होते. ही अघटित घटना वारंवार का घडते, याचा सखोल तपास जेव्हा त्या आदिवासींनी केला, त्यावेळी त्यांना सत्य काय ते उलगडून आले. हे आदिवासी जो ढोल वाजवत होते, तो हरणाच्या चामड्यापासून बनवण्यात आला होता. हे चामडे दुसऱ्या-तिसऱ्या कुणाचे नव्हते, तर ढोलवादन सुरू असताना धावत येणाऱ्या त्या नर हरिणाच्या सहचरिणीचे होते. आणि तिच्या चामड्यापासून तयार केलेल्या ढोलाचे ते रुदन ऐकण्यासाठी ते नर हरीण तेथे यायचे.
ही गोष्ट नानांनी एवढ्या विलक्षण आणि प्रभावी पद्धतीने सांगितली की, ती सांगताना स्वतः नाना व्यथित झाल्याचे जाणवत होते. तोपर्यंत हसत-खिदळत गप्पा करणारा श्रोतावर्ग अगदी स्तब्ध झाला होता. एरव्ही चित्रपटाच्या पडद्यावर राकट दिसणारा नाना प्रत्यक्षात किती हळवा आहे, ते त्या दिवशी तिथे हजर असलेल्या प्रत्येकाने अनुभवले.
नंतर बऱ्याच वर्षांनी गोव्याचे प्रसिद्ध नाट्यकर्मी श्याम विर्जिनकर काही कारणामुळे ‘गोमन्तक’च्या मडगाव कार्यालयात आले होते. गप्पांच्या ओघात नानांनी त्यावेळी सांगितलेल्या या हरणाच्या चामड्याच्या ढोलाच्या गोष्टीची आठवण निघाली. त्या आठवणीने श्याम स्वतः व्यथित झाले. नानांनी ही गोष्ट किती प्रभावीपणे सांगितली होती, त्याचा त्या क्षणीही प्रत्यय आला.
नानांच्या व्यक्तिमत्त्वाची हीच तर खासियत होती. पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका जगणारा हा अभिनेता प्रत्यक्ष आयुष्यातही माणसाच्या भावभावनांना, वेदनांना आणि संवेदनांना भिडणारा होता. म्हणूनच नाना पाटेकर केवळ एक अभिनेता नव्हते; ते आपल्या मनात खोलवर उतरलेले एक हळवे व्यक्तिमत्त्व होते.
भगतसिंग यांची भूमिका साकारण्याचे स्वप्न राहिले अपूर्णच
तालक यांच्या त्याच कार्यक्रमात एका पत्रकाराने नानांना प्रश्न विचारला, ‘तुम्ही अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. आता तुम्हाला कुठली अशी नवीन भूमिका करायला आवडेल?’. त्यावर नानांचे उत्तर होते, ‘शहीद भगतसिंग.’ पण नानांची ही इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या; मात्र ज्यांना ते आपला हिरो मानत होते, त्या भगतसिंगांची भूमिका त्यांना पडद्यावर साकारता आली नाही. नानांच्या अभिनयप्रवासातील ही एक अपूर्ण इच्छा म्हणून कायम स्मरणात राहील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.