Marathi Language: मराठीच्या नावाने गर्दी नको, गुणवत्तेची लाट हवी! भाषा टिकवण्यासाठी पाच धोरणात्मक बदलांची गरज

Marathi Language Movement Revival: भाषा ही केवळ हक्काची गोष्ट नाही, ती जबाबदारी आहे. ती जपायची असेल तर तिला नुसते कुरवाळून चालणार नाही, तर तिचे संगोपन करावे लागेल.
Marathi Language Movement Revival
Marathi LanguageDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भाषा ही केवळ हक्काची गोष्ट नाही, ती जबाबदारी आहे. ती जपायची असेल तर तिला नुसते कुरवाळून चालणार नाही, तर तिचे संगोपन करावे लागेल. आज मराठी आपल्याच घरातून, व्यवहारातून आणि तंत्रज्ञानातून काहीशी विस्थापित होत आहे; अशा वेळी तिचे योग्य पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे.

आजकाल भाषा, संस्कृती किंवा अस्मितेसाठी आवाज उठवायचा झाला की सर्वप्रथम आठवते ती म्हणजे ‘जाहीर सभा’ आणि ‘मोठी गर्दी’. घोषणांचा गजर, झेंडे आणि भावनिक उद्रेक पाहिला की, क्षणभर वाटते की काहीतरी मोठे घडणार आहे. मात्र, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर वास्तव निराळे असते. केवळ संख्येच्या जोरावर रस्त्यावर उतरून एखाद्या भाषेचे भविष्यघडत नसते; कारण गर्दी ही कोणत्याही प्रसंगी, अगदी अंत्ययात्रेतही जमते. त्या गर्दीला आपण ‘यश’ म्हणू शकत नाही. ज्या चळवळींचे रूपांतर केवळ दबावतंत्र, भीती किंवा विस्कळितपणात होते, तिथे संस्कृतीपेक्षा विकृतीच अधिक डोकावते.

Marathi Language Movement Revival
Goa Politics: काँग्रेसच्या 'गोंय राखण' यात्रेचा भाजपच्या 'सेवा ज्योती'समोर निभाव लागणार?

मराठीच्या नावाने केवळ संमेलने भरवणे, देणग्या उकळणे आणि स्वतःला ‘साहित्यिक’ म्हणवून घेण्यासाठी चाललेली चढाओढ ही भाषिक नफेखोरी आहे. आज आपल्याला गरज आहे ती ‘सांस्कृतिक मक्तेदारी’ (Cultural Hegemony) मोडून काढण्याची. दुसऱ्या भाषेचा अनादर करण्यापेक्षा किंवा उर्मट उत्तरे देऊन वैचारिक दिशा भरकटवण्यापेक्षा, आपली ऊर्जा मराठीत जागतिक दर्जाचे ‘सांस्कृतिक भांडवल’ (Cultural Capital) निर्माण करण्यासाठी खर्च व्हायला हवी.

मराठीला केवळ हक्काची भाषा न ठेवता ती जागतिक स्तरावर आकर्षित करणारी ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून विकसित करणे, हाच तिचा खरा सन्मान ठरेल.दुर्दैवाने, आज मराठी संस्थांमध्ये असलेली ‘गटबाजी’ आणि प्रस्थापितांचे राजकारण नवीन पिढीला या चळवळीपासून दूर लोटत आहे. तरुण अभ्यासकांच्या मनात या अन्यायाविरुद्ध धगधगणारे निखारे कोणत्याही क्षणी ज्वालामुखीसारखे फुटू शकतात. म्हणूनच, ज्येष्ठ पिढीने वेळीच सावध होऊन ही धुरा ‘गुणवत्तेच्या’ आधारावर नवीन रक्ताच्या हाती सोपवणे अनिवार्य आहे.

मराठीला खऱ्या अर्थाने आधुनिक आणि प्रगत करण्यासाठी आपल्याला खालील पाच स्तंभांवर धोरणात्मक (Strategic) काम करावे लागेल:

१. भाषिक अर्थकारण आणि तंत्रज्ञान (Linguistic Capitalism): मराठी ही केवळ भावनेची नव्हे, तर ‘नफ्याची’आणि ‘व्यवसायाची’ भाषा व्हायला हवी. जोपर्यंत मराठी ही STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित) आणि संशोधनाची भाषा होत नाही, तोपर्यंत ती रोजगाराच्या स्पर्धेत टिकणार नाही. मराठीसाठी AI Tools, NLP (नॅचरल लॅंग्वेज प्रोसेसिंग) आणि ‘इनोव्हेशन हब’उभे करणे हीच खरी भाषेची तांत्रिक सेवा ठरेल.

२. संस्थात्मक पुनर्रचना (इन्स्टीट्युशनल इन्फ्रास्ट्रक्चर): आपल्या संस्था ‘इव्हेंट ड्रिव्हन’; (कार्यक्रमाधिष्ठित) असण्यापेक्षा ‘रिसर्च ड्रिव्हन’(संशोधनाधिष्ठित) असायला हव्यात. तरुण संशोधकांना निर्णयप्रक्रियेत स्थान देऊन भाषेचे आधुनिक प्रमाणीकरण आणि जागतिक ज्ञानकोश निर्मितीवर भर द्यावा लागेल.

३. डिजिटल लोकशाही आणि आशय समृद्धी: आजच्या युगात ‘कन्टेंट इज कल्चर’ हे ओळखून दर्जेदार वेब सिरीज, पॉडकास्ट आणि डॉक्युमेंटरीज्‌ची निर्मिती व्हायला हवी. इंटरनेटच्या अल्गोरिदममध्ये मराठीचा डेटा जोपर्यंत ‘मशीन लर्नेबल’ होत नाही, तोपर्यंत डिजिटल विश्वात आपले अस्तित्व शून्य राहील.

४. न्यूनगंड आणि अहंकाराचा त्याग : इंग्रजीचा अवाजवी द्वेष किंवा मराठीचा संकोच, हे दोन्ही प्रगतीचे अडथळे आहेत. आपल्याला कोणावर ‘विजय’ मिळवायचा नसून, स्वतःचा ‘आत्मविकास’ (Self-development) करायचा आहे. भाषेला संकुचित अस्मितेतून बाहेर काढून तिला ‘जागतिक ज्ञानभाषा’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवावे लागेल.

Marathi Language Movement Revival
Goa Politics: गोव्यात विरोधी ऐक्याचा फज्जा! आघाड्यांची खिचडी, पक्षफुटीची भीती अन् नेत्यांची विश्वासार्हता पणाला

५. सृजनाचा ध्यास : जगाला हेवा वाटेल असे काहीतरी मराठीत घडवणे, हाच भाषेचा खरा सन्मान आहे. उत्कृष्ट कलाकृतीला भाषेच्या सीमा नसतात; ती स्वतःची ओळख स्वतः निर्माण करते. भाषा ही केवळ हक्काची गोष्ट नाही, ती जबाबदारी आहे. ती जपायची असेल तर तिला नुसते कुरवाळून चालणार नाही, तर तिचे संगोपन करावे लागेल. आज मराठी आपल्याच घरातून, व्यवहारातून आणि तंत्रज्ञानातून काहीशी विस्थापित होत आहे; अशा वेळी तिचे योग्य पुनर्वसन करणे ही काळाची गरज आहे. हे पुनर्वसन केवळ भावनिक नसेल, तर ते आर्थिक, तांत्रिक आणि वैचारिक स्तरावर असायला हवे. तिला जगवायचे असेल, तर तिला

काळाच्या पावलांनुसार नव्याने घडवावे लागेल. मराठीची चळवळ ही केवळ शब्दांची जपणूक नाही, तर ती एका जिवंत संस्कृतीचा श्वास आहे. हा श्वास कोंडू नये, यासाठी तिला ‘गटबाजीच्या’ बंदिस्त खोल्यांमधून बाहेर काढून ‘विज्ञानाच्या’आणि ‘विवेकवादाच्या’ मोकळ्या मैदानात आणावे लागेल. म्हणूनच आजचा मंत्र हाच असायला हवा: ‘गर्दी नव्हे, दिशा हवी; घोषणा नव्हे, कृती हवी; गटबाजी नव्हे, पिढीबदल हवा; आणि केवळ ओरड नव्हे, तर मराठीचे शास्त्रशुद्ध संगोपन आणि पुनर्वसन हवे’; तेव्हाच मराठीचे अस्तित्व खऱ्या अर्थाने जागतिक पटलावर उजळून निघेल. प्रस्थापितांच्या साखळदंडात अडकलेली भाषा कधीच मुक्त संवाद साधू शकत नाही. घोषणांच्या गजरात भाषेचा गळा आवळण्यापेक्षा, कृतीच्या मौनातून तिचे साम्राज्य उभे करा. आता गर्दीची साथ नको, तर बदलाची ‘लाट’ हवी; घोषणांची दाटी नको, तर प्रगतीच्या धोरणांची वाट हवी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com