

गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांची आज जयंती. पर्रीकर म्हणजे एक वेगळेच रसायन होते. म्हणूनच तर त्यांना जाऊन पावणेसात वर्षे झाली तरी त्यांची उणीव भासत आहे. पर्रीकरांची प्रशासनावर जबरदस्त पकड असायची. मोठे मोठे अधिकारी त्यांच्यापुढे नरम होत असत. त्यांचा दराराच तसा असायचा. पण त्यांची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची दूरदृष्टी. १९९४सालीच याचा प्रत्यय आला होता. तेव्हा भाजप गोव्यात कुठेच नव्हता. पण पर्रीकरांनी तेव्हा प्रकाशात असलेल्या मगो पक्षाची शिडी वापरल्यामुळे भाजपचा विधानसभेत प्रवेश होऊ शकला.
त्यावेळी भाजपचे फक्त चारच आमदार निवडून आले असले तरी त्यांनी तेव्हापासून आपले अस्तित्व दाखवायला सुरुवात केली. विशेष करून पर्रीकरांनी विरोधी पक्षात असूनसुद्धा त्या पाच वर्षांत विधानसभा अक्षरशः गाजवून सोडली. भाजपचे बस्तान बसले आहे हे पाहताच १९९९साली पर्रीकरांनी मगोची साथ सोडून स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. त्या निवडणुकीत भाजपचे दहा आमदार निवडून आल्यामुळे या अस्तित्वावर शिक्कामोर्तबही झाले. तर मगोला चार आमदारांवरच समाधान मानावे लागल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला.
२००० साली त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असलेल्या रवि नाईकांना हाताशी धरून पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री बनले. पण २००२साली ऐन निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री असलेले रवि परत कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे पर्रीकरांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले. पण तरीही जिवाचे रान करून त्यांनी १७ जागा जिंकल्या आणि मगो व युनायटेड गोअन्स डेमोक्रॅटिक पार्टी (युगोडेपा)च्या साहाय्याने सरकारही स्थापन करून दाखविले. २००४साली केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मात्र गोव्याच्या भाजप सरकारची पर्यायाने पर्रीकरांची दोलायमान स्थिती झाली.
पण असे असूनसुद्धा २००४साली पर्रीकरांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी) आणलाच. विशेष म्हणजे या महोत्सवाला लागणाऱ्या साधनसुविधा गोव्यात उपलब्ध नसूनसुद्धा पर्रीकरांनी हे शिवधनुष्य पेलून दाखविले. या साधनसुविधा उभ्या करण्याकरता त्यांनी जे त्यावेळी अपरंपार कष्ट घेतले त्याला खरोखरच तोड नाही. रात्री अपरात्री कामाची देखरेख करण्याकरता रिक्षातून येणारा मुख्यमंत्री या निमित्ताने गोमंतकीयांना पाहायला मिळाला!
त्यामुळे, २००४साली झालेला गोव्यातला पहिला इफ्फी तर ’न भूतो न भविष्याति’ असाच होता. हल्लीच्या इफ्फीचे झालेले अवमूल्यन पाहून अनेक जण आजसुद्धा गोव्यातील त्या पहिल्या इफ्फीची आठवण काढताना दिसतात. पण एवढे होऊनही काही आमदारांनी केलेल्या गद्दारीमुळे जानेवारी २००५मध्ये पर्रीकर सरकार कोसळले. त्यानंतर २००७सालीही भाजप विशेष यश मिळवू शकला नाही. पण तरीही पर्रीकरांनी जिद्द सोडली नाही.
विरोधी पक्षनेता म्हणून पर्रीकरांनी विधानसभा गाजवून सोडली. त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे विधानसभेबरोबरच लोकांवरही प्रभाव टाकून गेली. एकीकडे दिगंबर कामतीच्या नेतृत्वाखाली असलेले मिळमिळीत कॉंग्रेस सरकार तर दुसरीकडे पर्रीकरांचा विरोधी पक्षनेत्याच्या रूपात विधानसभेत खणखणणारा बुलंद आवाज यातला विरोधाभास लोकांना जाणवायला लागला. त्याचा प्रत्यय २०१२साली आला.
या निवडणुकीत पर्रीकरांमुळे भाजपला प्रथमच गोव्यात स्पष्ट बहुमत मिळू शकले. पर्रीकर मुख्यमंत्री व्हावे म्हणून त्यावेळी अल्पसंख्याकांनीही भाजपला मतदान केल्याचे दिसून आले होते. पर्रीकर परत मुख्यमंत्री झाले खरे पण अडीच वर्षातच त्यांना देशाचे संरक्षण मंत्रिपद मिळाल्यामुळे दिल्लीत जावे लागले.
पर्रीकरांमुळे गोव्यासारख्या छोट्या राज्याला देशाचे तिसरे मानाचे पद मिळण्याचा सन्मान प्राप्त होऊ शकला हे विसरता येणे केवळ अशक्य. २०१७साली १३ आमदार असूनसुद्धा भाजप गोव्यात सरकार स्थापन करू शकला, ते केवळ पर्रीकरांमुळेच. विजय सरदेसाई, सुदिन ढवळीकरांसारख्या दोन दिशांना तोंडे असणाऱ्या नेत्यांना एका माळेत गुंतून पर्रीकरांनी सरकार यशस्वीपणे चालविले. त्याकरता त्यांनी संरक्षण मंत्रिपदासारख्या अत्युच्च पदावर पाणी सोडले. पर्रीकरांची मानसिक शक्ती एवढी दांडगी होती, की मृत्यूशय्येवर असतानासुद्धा त्यांनी सरकारवरची आपली पकड ढिली होऊ दिली नाही.
नाकात नळ्या घालून अटल सेतूच्या उद्घाटनाकरता आलेले मनोहरभाई आजसुद्धा त्या पुलावरून जाताना आठवतात. तशी अनेक घटनांच्या वेळी त्यांची आज आठवण येते. पूजा नाईक प्रकरणाचेच उदाहरण घ्या. पर्रीकर असते तर या प्रकरणाच्या नावाखाली जे ‘नाटक’ पार पाडले गेले तसे घडले असते काय, असा प्रश्न अनेक जण विचारतात. हडफडे येथील क्लबला लागलेली आग, कला अकादमीचे प्रकरण, राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारी, प्रशासनावर ढिली होत चाललेली पकड पाहून अनेकांच्या डोळ्यांसमोर आज पर्रीकरांचा चेहरा येतो.
गोव्याचा भाजप म्हणजे पर्रीकर असे जे समीकरण त्यावेळी रुजू झाले होते त्याची आठवण आजही अनेक जण काढतात. त्यामुळे ते जे काही निर्णय घ्यायचे तेच अंतिम असायचे. त्यांच्या निर्णयात पंतप्रधानसुद्धा हस्तक्षेप करत नसत. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या कार्यकर्त्यांचे वाढत चाललेले वर्चस्व पाहून भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते, ‘भाई असते तर आमची अशी हालत झाली नसती’, असे व्याकूळ स्वरात बोलताना आढळतात.
भाईंच्या आठवणी आज अनेकांची ‘मर्मबंधातील ठेव’ बनली आहे यात शंकाच नाही. म्हणूनच केवळ गोव्याच्याच नव्हे तर देशाच्या या महान नेत्याच्या स्मृतींना त्याच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना अनेकांच्या मनाची व्यथा अधोरेखित करणारे हे गाणे याद यायला लागते.
तेरे बिना भी क्या जीना
फुलो मे कलियो मे, सपनो की गलियो मे
तेरे बिना कुछ कही ना...
- मिलिंद म्हाडगुत
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.