Konkani Drama: कोकणी नाटक हे 'कोकणी' वाटलं पाहिजे! नाट्यस्पर्धेचं अर्धशतक

Konkani Drama Competition: नाटक ही रंगीबेरंगी व्यामिश्र शक्यतांची अशी कला आहे की विविध स्तरांवर विविध घटकांचं चिंतन लेखकानं, दिग्दर्शकानं, नटांनी व तंत्रज्ञांनी करावं लागतं.
Konkani Drama
Konkani Drama Competition Goa, Lava Bhuta Play ReviewDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

भाषण पाठ करून संवाद फेकणं इतकंच नाटक नसतं. नाटककाराचा आशय लोकांपर्यंत पोहोचवावा लागतो. भावना, तरल संवेदना, तीव्र वेदना, शोक, आनंद, हर्ष यांचं वहन लोकांच्या मनात उतरवावं लागतं. बहुरंगी, बहुढंगी, संमिश्र असा हा परिणाम असतो.

नाटक ही रंगीबेरंगी व्यामिश्र शक्यतांची अशी कला आहे की विविध स्तरांवर विविध घटकांचं चिंतन लेखकानं, दिग्दर्शकानं, नटांनी व तंत्रज्ञांनी करावं लागतं. एकत्रित सुसूत्र योजन करून ते कलात्मक समीकरण प्रभावीपणे मांडायला हवं. प्रायोगिक नाटक असलं तरी, ते सुलभपणे समजलं पाहिजे. संहितेत साहित्यमूल्य व प्रयोगमूल्य यांचा नीट समतोल हवा. अन्यथा, ते भरकटण्याची व फसण्याची शक्यता असते.

नाट्य कला फार विकसित झाली आहे. खास करून पाश्चात्त्य देशांत. मला नाट्यलेखन हा सर्वांत आव्हानात्मक व कठीण साहित्य प्रकार वाटतो. तितकाच तो आनंददायीही आहे. आव्हान आणि आनंद दोन्ही घ्यायला आवडणं ही एक पर्वणी.

यंदाच्या कला अकादमीच्या कोकणी नाट्यस्पर्धेची सुरुवात २७ ऑक्टोबर रोजी, माझ्या ‘जाळें’ या खास स्पर्धेसाठी लिहिलेल्या मौलीक, स्वतंत्र नाटकाने होणार. हे नाटक श्रीनागेश महालक्ष्मी नाट्य समाज बांदिवडे ही संस्था सादर करेल. स्पर्धेत १८ संस्था आहेत. कोकणी नाट्य स्पर्धेची ५० वर्षांची यात्रा आम्ही साक्षीभावाने पाहिली आहे. रसिकतेने नाटके अनुभवून, नाट्यलेखन करून, स्पर्धेचा परीक्षक या नात्यानेही. विविध टप्प्यांवर विविध नियतकालिकात लेखमाला लिहून.

या स्पर्धेने कोकणी नाटकाला विनोदी नॅरेटिव्हमध्ये रुतलेल्या साच्यातून वर उचलले. ‘बाप्पा’, ‘व्हनीबाय’ या तत्कालीन विनोदी पात्रांच्या आकृतिबंधातून उचलून गंभीर अशा प्रतीकात्मक, काव्यात्म आशयाकडे नेले. कोकणी प्रायोगिक रंगभूमी रुजली, फुलली या कला अकादमीच्या स्पर्धेमुळे. मौलिक नाटकांसहित दर्जेदार विदेशी व भारतीय नाटकांचे अनुवाद स्पर्धेत मंचित झाले.

नाट्यलेखनाचा माझा अनुभव सांगतो; संवाद तंत्राची व कलेच्या खोलीची नाटककाराला जितकी जाण असते तितक्या तीव्रतेनं व घनतेनं नाटककार संहितेचा शाब्दिक सांगाडा प्रमाणबद्ध डिझाइन करू शकतो.

नाटकाचा रूपबंध असतो त्यात गणित असते. प्रवेश लांबले तर नाटक वाहवून जातं. अभिनय व शब्दांचे संवाद, कथानक पुढं नेत असतात. ही लय सहजसुंदरपणे खेळवत ठेवावी लागते. लोकांना खिळवून बसवायचं असल्यास नाटक एक मिनिटसुद्धा रेंगाळता कामा नये. शाब्दिक बुडबुडे, आलंकारिक मेक-अप केलेले संवाद परिणाम न साधता, बाधक ठरतात. ‘इफेक्ट’ न होता तो ‘डिफेक्ट’ ठरतो.

नाटकाविषयी पॅशन, प्रेम जितकं अधिक, तितका अधिक न्याय नाटककार संहितेला देऊ शकतो. सूचक प्रवाहांचं सघन संविधानक तो मांडतो.

यामुळे उथळपणा टळतो. नाटककाराने सातत्याने इतर भाषेत होत असलेली नाटके व त्यावरची परीक्षणं, लेख वाचले पाहिजेत. नवे कल, नवे प्रवाह, नवे तंत्र-बदल यांचं त्याला अद्ययावत आकलन, भान हवं. माझं स्पर्धेतील हे तिसरं मौलीक नाटक. अनुवाद अनेक केले.

दिग्दर्शकाने संहितेत बदल करणे कधीकधी अपरिहार्य असतं. काही परिच्छेद किंवा एक दोन पाने कापली जातात तेव्हा लेखकाला वेदना होतात. फार प्रयासाने त्या रचलेल्या असतात. पण टीम प्रयत्नात नाटकाची परिपूर्णता व उत्कृष्टता हा उद्देश असतो!

कोकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी, प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत, ऐतिहासिक, पौराणिक सर्व नाटके मी बघतो. कधीकधी त्यातील काही गोष्टी, संवादांचं वहन, उच्चार खटकतात. काही भाग संदिग्ध, दुर्बोध वाटतात. असा पंधरा मिनिटांचा तुकडा आला तर डोकं ठणकायला लागतं. म्हणून माझ्या संहितेत असे रटाळ भाग येता कामा नये, याची दक्षता मी घेतो.

हल्लीच निवर्तलेले अष्टपैलू ज्येष्ठ दिग्दर्शक दिगंबर सिंगबाळ यांनी माझी तीन नाटके बसवली. छानच. एक शब्दसुद्धा त्यांनी बदलला तर ते मला नम्रपणे कारणासहित सांगत. ‘दोरेमिफा’ नाटकात मी एक प्रवेश नवकल्पनाधारित रचला होता.

तो ढेपाळू शकतो याची संभावना सिंगबाळांनी मला नम्रपणे बोलून दाखवली. तुझे नाव आहे, तुझे आमंत्रित मित्र रसिक हे चाणाक्ष, गुणग्राहक आहेत म्हणून विचार कर, असं त्यांनी विनवलं. मी दीर्घ श्वास घेऊन चिंतन करून असू दे, एवढंच म्हटलं. ज्या शालीनतेनं त्यांनी सांगितलं ती विनयशीलता मी कधीच विसरू शकणार नाही. गंमत म्हणजे तो प्रवेश उठावदार झाला.

नव्या मौलिक, स्वतंत्र संहिता येण्यासाठी होतकरू लेखकांना मार्गदर्शन करणारे शिबिर हवे. अनुवाद असो वा मौलिक, स्वतंत्र नाटक; कोकणी नाटक हे कोकणी वाटलं पाहिजे.

Konkani Drama
Konkani Drama: गोमंतकीयांसाठी मेजवानी! गणेश चतुर्थीनिमित्य नवीन नाटके; शेकडो प्रयोग होणार सादर

त्याला भाषेतील शब्द, वाक्प्रचार, म्हणी, बोलण्याची लय, हेल, ढंग यांचा सुगंध हवा. मात्र सर्वच पात्रे शुद्ध कोकणी बोलली तर ते हसं होईल. मुलगी तरुण वकील आहे तर ती शुद्ध कोकणी बोलणार नाही. अधूनमधून तरुणाईच्या इंग्रजी वाक्यांचा शब्दांचा शिडकावा करेल. हा समतोल सांभाळावा लागतो.

पात्राचं वय लक्षात घेऊन त्याच्या तोंडातील वाक्यात कितपत फिलॉजॉफी येऊ शकेल याचं तारतम्य बाळगावं लागेल. नाटक संदेश वगैरे देईल ही अपेक्षाच नको, हे सुप्रसिद्ध नाटककारांनी सांगितलं आहे. नाटक ही एक कलाकृती. फक्त त्यात सूत्रबद्धता, सलगता पाहिजे. तुटकपणा, गोंधळ नको. चुका, उणिवा नको. कथानकाच्या स्पायनल कॉर्डपासून नाटक भटकू नये.

Konkani Drama
Konkani Song Viral: ''मणगणे खातो मणगणे'' कनमाणी गाण्याचं कोकणी व्हर्जन व्हायरल; पहा Video

५० वर्षे हा कोकणी नाट्यस्पर्धेचा एक महत्त्वाचा टप्पा. कोकणी नाटकांचं विकसन, पाकळ्या फुलाव्यात तसं स्पर्धेमुळे हळूहळू होत गेलं. स्पर्धेमुळे शिस्त राहते. स्पर्धेचा प्रवास खडतर होता. आरंभीच्या काळी स्पर्धेसाठी आवश्यक किमान पाच नाटकं यायची मारामार होती. पण धुरंधर म्हालगड्यांचे विविध स्तरावरील प्रयत्न बुन्याद मजबूत करण्यास कारणीभूत ठरले.

संहिता, अभिनेत्री सगळ्यांचाच दुष्काळ असे. एकदा एका नाटकामुळे प्रकरण कोर्टातही गेले. स्पर्धा स्थगित झाली. परत सुरू झाली. इतर राज्यांत सेन्सॉर बोर्ड असतात. गोव्यात नाही. हे भूषण की कमीपणा ते सुज्ञांनी ठरवावे! कोकणी नाट्यस्पर्धा उतार-चढावातून गेली आहे. नाट्यशाळा सुरू झाल्यावर शिस्त आली. दर्जा वाढला आम्ही उत्क्रांतीचे हे सर्व रंग न्याहाळले आहेत. ‘गोल्डन ज्युबली’ला ते आनंदी क्षण सोनेरी होऊन चमकत आहेत असं वाटलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com