

शैलेंद्र मेहता
जेफ्री आर्चर यांची ‘केन अँड आबेल’ (१९७९). ही जगाच्या दोन टोकांवर एकाच दिवशी जन्मलेल्या दोन पुरुषांची गाथा आहे, त्यातील एक बोस्टनच्या बँकरचा मुलगा व दुसरा पोलंडमधील अनाथ. त्यांचे आयुष्य त्यांच्यातील संघर्ष अनेक दशके व अटलांटिक महासागराच्या पलीकडील प्रदेशांपर्यंत विस्तारलेला आहे. ही त्यांची सिग्नेचर कलाकृती असून, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिचा उल्लेख केला जातो.
प्रसिद्ध ब्रिटिश लेखक जेफ्री आर्चरचे ५ ऑक्टोबरला निधन झाले. जेफ्री आर्चर हे नाव मी सर्वात पहिल्यांदा ऐकले ते ज्ञानेश मोघेंचे वडील श्रीकृष्ण मोघे यांच्याकडून. ते स्वतः एक अत्यंत चोखंदळ वाचक होते. १९८४- ८५ च्या सुमारास एक दिवस मी ज्ञानेशबरोबर वास्को येथील त्यांच्या घरी गेलो होतो. ज्ञानेशचे वडील जेफ्री आर्चरचे एक पुस्तक वाचत बसले होते. त्यांच्याशी अवांतर गप्पा मारता मारता मी त्यांना त्या पुस्तकाविषयी व लेखकाविषयी विचारले तेव्हा त्यांनी लगेच उठून माझ्या हातात जेफ्री आर्चरचे ‘केन अँड आबेल’हे पुस्तक ठेवले व म्हणाले, ‘वाचून बघ, कदाचित तुला आवडेल.’ आणि मग कालांतराने मी हळूहळू जेफ्री आर्चरची हाताला मिळतील ती पुस्तके वाचून काढली.
१९४० मध्ये लंडनमध्ये जन्मलेले व सॉमरसेटमध्ये वाढलेले जेफ्री आर्चर हे राजकारणी, दिवाळखोर, सर्वाधिक खप असलेल्या कादंबऱ्यांचे लेखक, गुन्ह्यासाठी शिक्षा झालेले कैदी व ‘लाइफ पीअर’ (ब्रिटिश पार्लमेंटचे आजीव मानद सदस्य) अशा विविध भूमिकांतून गेले आहेत. जगभरात त्यांच्या पुस्तकांच्या कोट्यवधी प्रती विकल्या गेल्या आहेत. गेल्या अर्धशतकातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या कथाकारांपैकी ते एक आहेत.
आर्चर १९६९ मध्ये त्या काळातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून संसदेत दाखल झाले. मात्र, काही वर्षांतच एका अयशस्वी गुंतवणुकीमुळे त्यांना दिवाळखोरीचा सामना करावा लागला व त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. नंतर त्यांनी लेखनाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांची पहिली कादंबरी ‘नॉट अ पेनी मोअर, नॉट अ पेनी लेस’ (१९७६) ही त्यांच्या आर्थिक पडझडीवर आधारित होती; यात एका फसवणुकीत गमावलेले पैसे परत मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार माणसांची कथा मांडली होती. ही कादंबरी प्रचंड यशस्वी ठरली व आर्चर यांना त्यांची दुसरी कारकीर्द सापडली.
आर्चर यांचे सार्वजनिक जीवन मात्र वादळी राहिले. १९८० च्या दशकात ते ‘कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी’चे उपाध्यक्ष बनले, परंतु एका वादामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. पुढे २००१ मध्ये, खोट्या साक्षीमुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले व तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी या अनुभवाचा उपयोग करून घेत ‘प्रिझन डायरीज’ (तुरुंगातील रोजनिशी) हे पुस्तक लिहिले. या सर्व काळात त्यांचे लेखन सुरूच राहिले व १९९२ मध्ये त्यांना ‘लाइफ पीअर’ म्हणून सन्मानित करण्यात आले. ‘लाइफ पीअर’ (आजीव उमरावपद) धारकाला ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये बसण्याचा व मतदान करण्याचा अधिकार मिळतो.
त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे ‘केन अँड आबेल’ (१९७९). ही जगाच्या दोन टोकांवर एकाच दिवशी जन्मलेल्या दोन पुरुषांची गाथा आहे, त्यातील एक बोस्टनच्या बँकरचा मुलगा व दुसरा पोलंडमधील अनाथ. त्यांचे आयुष्य त्यांच्यातील संघर्ष अनेक दशके व अटलांटिक महासागराच्या पलीकडील प्रदेशांपर्यंत विस्तारलेला आहे. ही त्यांची ओळख बनलेली (सिग्नेचर) कलाकृती असून, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील लोकप्रिय कादंबऱ्यांपैकी एक म्हणून तिचा उल्लेख केला जातो. इतर लोकप्रिय पुस्तकांत ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ (१९८४) चा समावेश होतो, जी पंतप्रधानपदासाठी स्पर्धा करणाऱ्या चार राजकारण्यांवर आधारित आहे. ‘ऑनर अमंग थीव्हज’(१९९३) ही अमेरिकेच्या ‘स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्या’च्या चोरीवर आधारित थरारक कथा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.