
सर्वेश बोरकर
जकनाचारी यांनी म्हैसूर जिल्ह्यातील सोमनाथपुरा येथील श्रीचेन्नाकेशव मंदिरापासून आपल्या कलाकृतीची सुरुवात केली. होयसळ राजा नरसिंह आणि सेनापती सोम यांच्या नेतृत्वाखाली जकनाचारी यांनी ही शिल्पे तयार केली होती.
त्यांच्या अद्भुत कारागिरीने प्रभावित होऊन, त्यांना कर्नाटकातील हसन जिल्हा, चिकमगलूर जिल्हा आणि मांड्या जिल्ह्यात होयसळांच्या अंतर्गत बांधण्यासाठी अनेक मोठेमोठ्या देवळांची कामे दिली गेली, ज्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात आणि त्यांचे कौतुक केले जाते. त्यांच्या उत्कृष्टतेचा सर्वात मोठा नमुना म्हणजे बेलूरमधील भव्य श्रीचेन्नाकेशव मंदिर. या मंदिराच्या बांधकामात त्यांचा सिंहाच वाटा होता.
जकनाचारी यांना कल्याणी चालुक्य आणि होयसळांसाठी अनेक उत्तम मंदिरे बांधण्याचे श्रेय दिले जाते. तसेच अमरशिल्पी या उपाधीने त्यांना ओळखले जाते.
जकनाचारी यांचा जन्म कर्नाटकातील तुमकुरपासून ९ किमी अंतरावर असलेल्या कैडल नावाच्या एका छोट्या गावात झाला. नोंदींनुसार या शहराचे मूळ नाव क्रीडापूर होते. त्यांचे जीवन कलेवरील प्रेम आणि समर्पणाचे होते. कर्नाटकात कैडल हे गाव बंगळूरहून सुमारे ८० किमी बंगळूर -तुमकुर राष्ट्रीय महामार्गाकडून गुब्बीकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर गोलूर तलावाजवळ डावीकडे स्थित आहे.
कैडल येथे गावात श्रीचेन्नकेशव मंदिराच्या स्थापनेवर काम करत असताना अमरशिल्पी जकनाचारी त्याच्या डाव्या हाताने मूर्ती कोरलेली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. असेही मानले जाते की त्याचा चमत्कारिकपणे निकामी झालेला उजवा हात श्रीचेन्नकेशवाची मूर्तीचे काम होताच सारखा झाला.
म्हणूनच सुरुवातीला क्रीडापूर असलेल्या या जागेचे नाव कैडल ठेवण्यात आले. मंदिर त्याच्या काळातील इतर मंदिरांपेक्षा साधे आहे. परंतु मंदिराच्या आत श्रीविष्णूची म्हणजे श्रीचेन्नकेशवची श्वास रोखणारी इतकी कोरलेली मूर्ती आहे जी इतर मंदिरांपेक्षा खूपच प्रभावी आहे. गुंतागुंतीच्या कोरीव कामामुळे श्रीचेन्नकेशवची ही मूर्ती पूर्णपणे आश्चर्यकारक दिसते. तसेच भिंतीवर एक छिद्र आहे ज्यातून सूर्यप्रकाश येतो आणि काही विशिष्ट दिवशी थेट मूर्तीवर पडतो जे आश्चर्यकारक आहे.
या मंदिराच्या शेजारी होयसळ काळातील आणखी एक मंदिर आहे, श्रीगंगाधीशेश्वर मंदिर ज्यात सुंदर कोरीव काम असलेले खांब पाहायला मिळतात. कैडल गावात असलेल्या आख्यायिकेनुसार अमरशिल्पी जकनाचारीच्या स्वप्नात, देवाने त्याला क्रीडापुरात केशव मंदिर बांधण्यास सांगितले.
त्याच्या स्वप्नानुसार, क्रीडापुरात श्रीचेन्नकेशवांना समर्पित एक मंदिर बांधण्यात आले. मंदिर पूर्ण होताच, त्याचा उजवा निष्क्रिय हात पुन्हा होता तसा व्यवस्थित झाला. कन्नडमध्ये काई या शब्दाचा अर्थ ‘हात’ असा होतो. या घटनेच्या स्मरणार्थ, ‘कैडल’ (पुनर्स्थापित हात) या जागेला असे तेव्हापासून म्हटले जाते. कैडल येथे होयसळ काळात बांधलेली दोन मंदिरे आहेत. ती म्हणजे श्रीचेन्नकेशव मंदिर आणि श्रीगंगाधरेश्वर मंदिर.
श्रीगंगाधरेश्वर मंदिर ११५०मध्ये राजा नरसिंहांच्या कारकिर्दीत होयसळ प्रमुखांनी बांधले होते. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा महाद्वारावर भगवान श्रीचेन्नकेशव यांच्यासह विविध शिल्पे आहेत आणि त्याविरुद्ध, स्तंभावर, हात जोडून उभी असलेली एक सुंदर आकृती आहे. हत्ती, घोडे, माकडे आणि मासे यांसारख्या प्राण्यांच्या कोरीव कामाचे शिल्प दिसते. उंटाचे पण कोरीव केलेलं शिल्प इथं आपल्याला पाहायला मिळते.
श्रीगंगाधरेश्वर मंदिरात आत दोन मोठे दगडी शिलालेख ठेवलेले आढळतात. अमरशिल्पी जकनाचारी यांच्याबद्दल अशी आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की कैडल नावाच्या एका छोट्या गावात जन्मलेल्या जकानाचारीने आपले जीवन कलेसाठी समर्पित केले होते.
यांच्या लग्नानंतर लगेचच जकानाचारी त्याच्या कामासाठी घराबाहेर पडला. तो खूप दूरवर प्रवास करत होता आणि कथेनुसार, जकनाचारीने आपले कुटुंब सोडून होयसळांच्या विविध राजांच्या सेवेत प्रवेश केला आणि अशा कलाकृती निर्माण केल्या ज्यांमुळे त्याची कीर्ती आजही कायम आहे. त्याला शिल्पे बांधण्यात खूप रस होता.
दरम्यान, क्रीडापूर येथे लग्नानंतर लगेचच त्याच्या पत्नीने दंकणाचार्य नावाच्या मुलाला जन्म दिला. तो स्वतः मोठा झाल्यावर एक प्रसिद्ध शिल्पकार बनला आणि त्याने त्याच्या वडिलांचा शोध सुरू केला. बेलूर येथे श्रीचेन्नकेशव मंदिर उभारणीच्या प्रक्रियेत होते व बेलूर येथेच दंकणाचार्यना शिल्पकार म्हणून नोकरी मिळाली व काम करत असताना एक दिवस अमरशिल्पी जकनाचारी यांनी कोरलेल्या एका आकृतीत त्याला एक दोष आढळला.
दंकणाचार्यांनी अमरशिल्पी जकनाचारींना सांगितले की ते ज्या आकृती कोरत आहेत तिथे आत एक बेडूक राहत होता जो शिल्पकारांना दोष मानला जात असे. यामुळे संतापलेल्या अमरशिल्पी जकनाचारी यांनी तरुण शिल्पकार जर मूल्यांकनात बरोबर असेल तर या टीकेला आव्हान देत त्याने प्रतिमेत काही दोष आढळल्यास त्याचा उजवा हात कापण्याची प्रतिज्ञा केली.
तपासण्यासाठी, त्या मूर्तीला चंदनाचा लेप लावण्यात आला आणि सर्वांना आश्चर्य वाटले की जेव्हा लेप नाभी वगळता सर्वत्र सुकलेला. पुढील तपासणीत, एक पोकळी आढळली ज्यामध्ये बेडूक, वाळू आणि पाणी होते. दंकणाचार्य यांनी दोष असलेल्या जागेचे छाटणी केली आणि त्या जागेतून थोडेसे पाणी वाहत असताना एक बेडकाने बाहेर उडी मारली .
दोष खरोखरच उघड झाला आणि अमरशिल्पी जकनाचारी यांनी आपले वचन पाळले आणि त्यांचा उजवा हात कापायला गेला. दंकणाचार्यांनी तसे न करण्याचा आग्रह धरला. म्हणूनच ती मूर्ती ’कप्पे चन्नीगारय’ (कप्पे म्हणजे कन्नडमध्ये बेडूक) म्हणून प्रसिद्ध झाली. पुढे मुलाबद्दल अधिक चौकशी केल्यावर, त्यांना कळाले की तो त्यांचाच मुलगा आहे. त्यानंतर, जकनाचारीना त्यांच्या जन्मगावी क्रीडापुरात श्रीचेन्नकेशव मंदिर बांधण्याचे दर्शन मिळाले. हे पूर्ण झाल्यानंतर, देवाने त्यांचा उजवा हात परत मिळवला अशी प्रसिद्ध आख्यायिका आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.