
२६ जून हा ‘जागतिक अंमली पदार्थविरोधी दिन’ म्हणून साजरा होतो. सरकारी संकेतस्थळांवरून त्यासंबंधाने उपदेश होतात, पण वास्तव हे आहे की नशेची व्याप्ती आता आपल्या राज्यातील गावागावात आणि घराघरात पोचली आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेले युवक आपल्या वडिलधाऱ्यांना मारहाण करतात, घरातील वस्तूंची तोडफोड करतात हे चित्र आम्हाला जागोजागी दिसून येऊ लागले आहे.
ब्रिटीश काळात ‘चहा’चा प्रसार जसा चालायचा तसाच आज ड्रग्सचा प्रचार चालतो. फुकटात नशा देऊन सवय लावायची, मग नंतर त्याच्या बदल्यात पैसा मागायचा आणि गुन्हे करण्यास प्रवृत्त करायचे हे षड्यंत्र स्पष्ट दिसते. खेळांच्या आयोजनांतून, सोशल मीडियावरून युवकांना आज या जाळ्यात ओढले जात आहे.
परदेशी ड्रग्स माफिया – विशेषतः रशियन, ब्रिटीश, इस्त्रायली व नायजेरीयन टोळ्यांनी गोव्याच्या किनारपट्टीवर आपले बस्तान बसवले आहे. स्थानिक लोकांचा, नेत्यांचा, पोलीसांचा काही प्रमाणात त्यांना पाठींबा मिळतो ही जनमानसात ऐकू येणारी खुली बाब आहे. दुर्दैवाने ड्रग्स व्यवहारातील मुख्य मासे सटकतात आणि पकडले जातात ते फक्त छोटे मोहरे.
नशेसंबंधित गंभीर समस्येचे मूळ गावोगाव पोचले असून, घरातले आई-वडील, शिक्षक, समाजसेवक यांना एकत्र येण्याची वेळ आली आहे. याचाच भाग म्हणून गावपातळीवर नशेचा प्रसार करणाऱ्यांविरोधात माहिती संकलित करून नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोला (NCB) पाठवण्याचे काम समाज समिती करणार आहे. फॉर्मात नाव न देता गोपनीय माहिती देण्याची मुभा असेल. हे फॉर्म NCB व पंचायत दोघांपर्यंत पोहोचतील. परिणामी, संशयितांना परागंदा व्हावे लागेल व युवक वाममार्गावरून परत येण्याच्या शक्यता वाढतील.
गोवा ‘ड्रग्स हब’ बनू नये, यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. पालकांनी, युवकांनी या उपक्रमात सहभागी होण्यातच नशा मुक्त गोव्याचा मार्ग मोकळा होण्याच्या आशा आहेत.
- व्यंकटेश नाईक (समाज कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.