भारताच्या बाजारपेठेत महागड्या अमेरिकी वस्तूंना गिऱ्हाईक नाही, रशिया-चीनचा माल ठरतोय हिट
आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वव्यापी धुमश्चक्रीमुळे सत्तासमीकरणे सतत बदलत असतात. जगात कायमचा मित्र वा कायमचा शत्रू कोणी नसतो; शाश्वत असतात ते हितसंबंध, असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर अनेकदा येते. परंतु भारत व रशिया यांच्यातील मैत्री मात्र दीर्घकाळ तर टिकलीच; पण अनेक वादळांमध्येही ती दृढ राहिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताज्या घोषणेमुळे त्यांना ती किती खुपते आहे, हे कळते. रशियाशी असलेला भारताचा व्यापार दहा अब्ज डॉलरवरून तब्बल सहापटींनी वाढून ६९ अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.
परस्पर फायद्याचा हा व्यापार गतिमान करण्यासाठी सागरी मार्गांसह बहुविध वाहतूक पर्यायांना चालना देण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करीत आहेत. भारताला सर्वाधिक कच्चे तेल आणि शस्त्रास्त्रे पुरविणारा रशिया एकूण ६९ अब्ज डॉलरच्या या व्यापारात भारत लाभात आहे. चीनसोबत ९९ अब्ज डॉलरची आणि रशियासोबत ६४ अब्ज डॉलरची व्यापारात तूट सोसणारा भारत अमेरिकेसोबत मात्र ४३ अब्ज डॉलरनी फायद्यात आहे.
अमेरिकेची पोटदुखी हीच आहे. भारताच्या बाजारपेठेत महागड्या अमेरिकी वस्तू व सेवांना फारसे गिऱ्हाईक नाहीत. चीन आणि रशियाला मात्र भारताच्या बाजारपेठेत प्रचंड वाव आहे. रशियासोबत गेल्या पाच वर्षांमध्ये भारताच्या व्यापाराचा आलेख वेगाने उंचावत गेला. दीर्घ युद्धामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या रशियाने आपल्या अर्थव्यवस्थेला झळ बसू नये म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा सुमारे ३० टक्के स्वस्त दराने भारताला कच्चे तेल विकण्यास सुरुवात केली.
जगात कच्च्या तेलाचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. वर्षाकाठी भारताचा कच्च्या तेलावरील खर्च अकरा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक असतो. गेल्या तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय दरापेक्षा भारताला रशियाकडून प्रतिपिंप १८ ते २० डॉलरपर्यंत स्वस्त कच्चे तेल मिळू लागले. ते देखील पेट्रोडॉलरला बगल देणाऱ्या रुपया किंवा रुबलमधील चलनात. २०२३-२४ मध्ये भारताची २५ अब्ज डॉलर म्हणजे दोन लाख दहा हजार कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.
सरकारी आकड्यांनुसार भारताच्या कच्च्या तेलाच्या आयातीत ०.१८ टक्क्यांनी वाढ झाली, पण तेलावरील खर्चात १६ टक्क्यांची घट झाली. रशियाकडून तेलाचा ओघ एकेकाळच्या दोन टक्क्यांवरुन थेट ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढला, हे त्याचे कारण. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनीच नव्हे तर खासगी कंपन्यांनीही रशियाकडून स्वस्त खनिज तेलाची खरेदी करून अब्जावधी डॉलरचा नफा कमावला.
कच्चे तेलच नव्हे तर शस्त्रास्त्र खरेदीतही भारताची पहिली पसंती रशियाच आहे. रशियाने पाठवलेला माल भारतात येण्यासाठी ४० ते ५० दिवसांचा अवधी लागतो. हा कालावधी आणि वाहतूक खर्च कमी करून उभय देशांनी व्यापार अधिक सुलभ आणि किफायतशीर व्हावा म्हणून वाहतूक कालावधी ४० दिवसांवरुन २४ दिवसांवर आणणारा चेन्नई-व्लादिवोस्तोक सागरीमार्ग गेल्या वर्षी कार्यान्वित केला.
भारत आणि रशियादरम्यानचे सहकार्य केवळ व्यापारापुरते मर्यादित न राहता संरक्षण, दळणवळण, तंत्रज्ञान, स्थानिकीकरण,औषधे, रसायने, हवाई वाहतूक, सायबर सुरक्षा, औद्योगिक उत्पादन, माहिती-तंत्रज्ञान, रेल्वे, कृषी आदी क्षेत्रांमध्ये विस्तारत आहे. भारताच्या सशस्त्रदलांसाठी सहा लाख एके-२०३ रायफल्सची निर्मिती करण्यासाठी रशियन सरकारच्या सहकार्याने उत्तर प्रदेशात स्थापन केलेल्या इंडो-रशियन रायफल कंपनीने आतापर्यंत ५० हजार रायफल्सचे उत्पादन केले आहे.
भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस तुशील आणि आयएनएस तमल या अत्याधुनिक युद्धनौका, एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली आणि टी-९० रणगाड्यांनी भारतीय लष्कराला बळ लाभले आहे. व्यापारव्यतिरिक्त क्षेत्रातही ही मैत्री आहे. अमेरिकेच्या धमक्यांना भीक न घालणाऱ्या भारताला १९७१ च्या युद्धात याच रशियाने साथ दिली होती.
अमेरिकेप्रमाणे रशियाने भारतावर कोणत्याही अवाजवी मागण्या लादलेल्या नाहीत, अपेक्षा ठेवलेल्या नाहीत आणि भारताच्या धोरणात हस्तक्षेप, लुडबूडही केलेली नाही. रशिया भारताचा भरवशाचा मित्र आहे, याची कल्पना त्यावरून येते. तेल आणि शस्त्रखरेदी करून युद्धाने बेजार झालेल्या आणि ‘नाटो’चा शत्रू असलेल्या रशियाची अर्थव्यवस्था तगवत असल्याचा ठपका भारतावर ठेवण्यात आला आहे.
रशियाकडून स्वस्तात खरेदी केलेले तेल प्रक्रिया करुन भारत युरोपियन देशांना निर्यात करतो. पण त्यावरुन युरोपियन देश भारताला हटकू शकत नाहीत. त्यामुळे जगभर आयातशुल्काचे युद्ध सुरू करणाऱ्या ट्रम्प यांनी रशियाकडून तेल आणि शस्त्रखरेदी करीत असल्याचे निमित्त करुन भारताला दंडित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
भारताशी आपली व्यापारतूट भरुन काढण्यासाठी भारताने रशियाकडून स्वस्त मिळणारे तेल खरेदी करायचे थांबवून अमेरिकेकडून खरेदी करावे अशी अट ट्रम्प घालू पाहात आहेत. ऐन बहरात आलेल्या भारत-रशिया व्यापारात अमेरिका खोडा घालू पाहात आहे. पण या कचाट्यातून सहीसलामत सुटून रशियाशी परस्पर फायद्याचा सौदा करण्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.