Goa Opinion: लहानपणी केलेली काजू, आंब्यांची चोरी ते ‘कॉर्पोरेट’ धंदा, पूर्वापार चालत आलेली 'चौर्यकला'

Goa Opinion: चोरी ही माणसाच्या स्वभावात दडलेली असते. श्रीमंतीमुळे अन्नपाण्याची नासाडी करणे तर गरिबीत अन्न व पाण्यासाठी चोरी करणे हे पूर्वापार चालत आलेले सत्य आहे.
Theft
TheftDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

तर्कबुद्धीची, अमूर्तपणे विचार करण्याच्या शक्तीची, भाषा आणि संस्कृती विकसित करण्याच्या समृद्ध क्षमतेची चोरी करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे.

शंकासुराने’ (संकासुर) ब्रह्मदेवाचे वेद चोरले किंवा बालकृष्णाने दही, दूध, लोणी चोरले हे आपण ऐकत आलो आहोत. यावरून चौर्यकला ही भारतात आदी काळापासून चालत आलेली आहे, याला पुष्टी मिळते.

ज्या गोष्टीवर आपला हक्क नाही ती आपण घेणे म्हणजे चोरी करणे. ‘दिल चुराना’सारख्या काही घटनांमध्ये चोरी चांगल्यासाठी होत असली, तरी बहुतेक वेळा चोऱ्यांमुळे वाईटच गोष्टी घडत असतात. चोरी ही माणसाच्या स्वभावात दडलेली असते. श्रीमंतीमुळे अन्नपाण्याची नासाडी करणे तर गरिबीत अन्न व पाण्यासाठी चोरी करणे हे पूर्वापार चालत आलेले सत्य आहे.

गोव्यात मौर्य, सातवाहन, भोज, कदंब, चालुक्य, राष्ट्रकूट, सीलहार, विजयनगर, बहमनी, विजापूर आणि पोर्तुगीज राज्यकर्ते आले ते संपत्ती आणि भूप्रदेश चोरी करायच्या हेतूनेच. वडीलधारी माणसे म्हणायची की आमच्या घरांना कडी नसायची, कारण त्याकाळी चोऱ्याच होत नसत. कारण चोरण्याची इच्छाच नसेल किंवा चोरण्यासाठी काहीच नसेल तर चोर येणारच कशाला?

पुरातन भारतात रावणाने सीतेस चोरले, कृष्णाने चोरी करून दही-दूध खाल्ले. चोरी करणारे कोणी देव बनतात तर कोणी दानव, हे आपल्याला कृष्ण आणि रावणाच्या उदाहरणांवरून दिसून येईल. पण आजच्या काळात चोऱ्यांमुळे मानवाचे अकल्याणच झाल्याचे दिसते.

लहानपणी चोरी करणे म्हणजे कोणाच्या फळबागेत जाऊन काजू, आंबे, फणस, नारळ इत्यादी चोरणे; विहिरीतून चोरून पाणी काढणे, दुसऱ्याच्या शेताला लावलेले पाणी बांध फोडून आपल्या शेताला लावणे, नदीत दुसऱ्याने जाळे टाकून अडवलेले मासे चोरणे, चोरून विद्या शिकणे किंवा घरच्या बैल, म्हशी, कुत्र्या-मांजरांनी इतरांचे चोरून खाणे याच मुख्य चोऱ्या होत्या. पण मोठेपणी चोरी हा ‘कॉर्पोरेट’ धंदा, किंबहुना जगाचा मुख्य व्यवहार झाल्याचे वाटायला लागले.

नाटक-चित्रपट माध्यमातून आपल्याला एखादा चोर श्रीमंतांचे चोरून गरिबांत वाटण्याचे दाखवले जाते, जसे सरकार श्रीमंताकडून टॅक्स घेऊन गरिबांचे कल्याण करते. पण अलीकडे गरीब किंवा असहाय लोकांकडील चोरून ते सधन व सबलांना वाटण्याचे प्रमाण फारच वाढलेले दिसते. मेहनतीमुळे आपण श्रीमंत होतो ही पूर्वधारणा बदलून, चोरी करण्याच्या मेहनतीतूनच श्रीमंत बनण्याची उदाहरणे, गोव्यात तसेच इतरत्र जगात दिसून येत आहेत. भुकेने व्याकूळ माणसाने चोरी करणे समजू शकतो, पण श्रीमंतीने ओथंबलेले राजकारण्यासारखे लोक चोरी करायला लागले तर ते ‘क्लेप्टोमेनिया’ रोगाचे शिकार आहेत, याची जाणीव होते.

Theft
Goan Culture: मेषांच्या मृतात्म्यांचे स्मरण आजही केले जाते; गोवा, कोकणातील पूर्वापार चालत आलेले विधी

आजकाल चोरावर मोरांची संख्या बेसुमार वाढत चाललीय. राजकारणात तर ‘पंचा’पासून अति ‘उंचा’पर्यंत चोऱ्या करणे, हा धर्मच होऊन बसला आहे. तसेच आपण ‘चोर’ ठरू नये म्हणून भलतीच कडे ‘शोर’ करून सामान्यजनांचे लक्ष वळविणे, ‘मते’ चोरणे, खोटेनाटे बोलून लोकांची मने चोरणे, जनतेच्या पैशावर मौजमजा करणे, सरकारी योजनांचा स्वजनांसाठी वापर करणे किंवा इतरांचा जमीनजुमला हडप करणे या चोऱ्या अगदी सामान्य झाल्या आहेत.

योग्य सामाजिक जाणीव व स्थान असलेले लोकसुद्धा चोरी करताना दिसतात यामुळे वाईट वाटते. इंटरनेटच्या मायाजालात इतरांचे ज्ञान चोरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. चित्रपट-नाटकवाले चोरी करायला लागले. शिक्षक-विद्यार्थी पण यातून सुटले नाहीत. एकमेकांच्या ‘वेबपेज’वरून चोरलेल्या ऐवजातून, स्वतःची ‘आरोग्य पेज’ चालवणाऱ्यांच्या शिफारशीतून औषधे घेणाऱ्यांना ‘हगवण’ लागून आरोग्याची वाट लागली आहे. तसेच नेटवरील एकमेकांच्या ‘रेसिपी’ तोड-मोड करून केलेले, बायकांच्या हातचे खाद्यपदार्थ खाऊन, कित्येक नवऱ्यांच्या नाकी नऊ आल्याची उदाहरणे आहेत.

Theft
Shankhasur Kala Goa: शंखासुराची जुगलबंदी आणि मुखवट्यांनी रंगणारा कालोत्सव

गोव्यात पूर्वापार असलेल्या गावकऱ्यांच्या, देवळांच्या आणि कोमुनिदादच्या जमिनी स्थानिक, गोव्याबाहेरून आलेले लोक, राजकारणी, इतकेच काय तर सरकारही चोरत असल्याचे न्यायालयात दाखल होत असलेल्या खटल्यांवरून सिद्ध होत आहे. हल्ली एक नवीनच चोरीचा प्रकार समाजशास्त्रज्ञांच्या नजरेस आला आहे. हजारो वर्षांच्या प्रक्रियेतून तयार झालेल्या, माणसाकडे असलेल्या तर्कबुद्धीची, अमूर्तपणे विचार करण्याच्या शक्तीची, भाषा आणि संस्कृती विकसित करण्याच्या समृद्ध क्षमतेची चोरी करणाऱ्या चोरांचा सुळसुळाट झाला आहे. ‘कोविड’ रोगापेक्षा भयंकर असलेला चोरीचा हा नवा प्रकार आगीच्या वणव्याप्रमाणे सर्वत्र पसरतोय. सावधान!!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com