
गोवा या सुंदर प्रदेशाची भुरळ भारतीय चित्रपटसृष्टीला पडली नसती तरच नवल! १९६९ मध्ये प्रसारित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ या अमिताभ बच्चनच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यातील पणजी, आग्वाद, तेरेखोल इत्यादी भागांत प्रथमच झाले (कारण हा चित्रपट गोवा मुक्ती संग्रामाच्या कथानकावर आधारित होता) आणि त्यानंतर अनेक हिंदी, मराठी, तेलगू, मल्याळम आदी चित्रपटांचे चित्रीकरण गोव्यात सुरू झाले.
यापूर्वी ‘भुयांरातलो मनीस’ या कोकणी चित्रपटाचे चित्रीकरण आणि प्रसारण गोव्यात झाले होते पण ते अपवादात्मक होते. २००४साली भव्य असा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला. देश विदेशातील चित्रपट पाहण्याची आणि चित्रपटविषयक चर्चासत्रे ऐकण्याची संधी गोमंतकीयांना मिळाली. अनेक दिग्गज कलाकार, दिग्दर्शक यांना प्रत्यक्ष पाहता, भेटता आले.
या पाठोपाठ मराठी चित्रपट महोत्सव सुरू झाला. स्थानिक कलाकारांना वाव मिळावा म्हणून गोवा शासनाने चित्रपट निर्मितीसाठी अनुदान किंवा आर्थिक साहाय्य देऊ केले. कोकणी चित्रपट निर्मितीला चालना मिळाली. त्यांचेही महोत्सव सुरू झाले. पण त्यांना म्हणावा तसा प्रतिसाद प्रेक्षकाकडून मिळाला नाही किंवा मिळत नाही.
कदाचित प्रादेशिक चित्रपट निर्मितीत काही उणिवा असाव्यात! उत्तम कथानक, उत्तम संवाद लेखन, उत्तम कलाकार व त्यांचा उत्कट अभिनय, उत्तम दिग्दर्शन, उत्तम छायाचित्रण, आकर्षक लोकेशन, उत्तम संकलन, मनमोहक संगीत आणि ओठावर खेळणाऱ्या गीतांचे बोल या गोष्टी चित्रपटात समाविष्ट असल्या की कोणताही चित्रपट यशस्वी होतो. अलीकडचा ‘कांतारां’ हा कोकणी चित्रपट ऑस्कर नॉमिनेशनसाठी पाठवण्यात आला होता, याचे हेच रहस्य असावे.
चित्रपट, नाटके, संगीत सोहळे, वस्तू प्रदर्शने, व्याख्यानमाला, साहित्य संमेलने, गौरव समारंभ यांची रेलचेल गोव्यात पूर्वीपेक्षा वाढली आहे. गोवा राज्याचे कला आणि संस्कृती खाते सढळहस्ते यासाठी मदत करीत असते. मांडवी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते त्या संगमाच्या काठावर गोवा कला अकादमी हे सुंदर आणि देखणे शिल्प म.गो. शासनाच्या काळात उभे राहिले.
स्थापत्य विशारद कुरियन यांचे हे आरेखन आहे. नृत्य, नाट्य, संगीत आणि अन्य कला यांचे हे प्रेरणास्थान आहे. २००४साली आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ठरविले तेव्हा इफ्फीचा उद्घाटन सोहळा गोवा कला अकादमीत झाला होता आणि मा. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर प्रवेशद्वारावर उभे राहून सर्व व्यवस्थेचे नियंत्रण करीत होते. बाहेरून आलेल्या पाहुण्यांना याचे कोण कौतुक वाटले होते.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव निरंतर या प्रदेशात चालावा म्हणून पर्रीकर शासनाने ‘मनोरंजन सोसायटी’ची स्थापना केली. आता दरवर्षी या द्वारे चित्रपट विषयक कार्यक्रम जोशात साजरे केले जातात. या सर्वांचा परिणाम गोमंतकीयांच्या मूळ स्वभावावर, आवडीनिवडीवर आणि वागण्यावर होणे साहजिकच आहे.
मानसिक आणि वैचारिक बदल हा शिक्षणातून होत असतो. त्या दृष्टीने पाहिल्यास गोवा, दमण आणि दीव हा संघप्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त झाला तेव्हा शिक्षण हे मर्यादित भागापर्यंत आणि ठरावीक लोकांपर्यंतच पोहोचलेले होते. काही धनिक लोकांनी आपल्या वाड्यावर किंवा मंदिरातून मराठी प्राथमिक शिक्षण बहुजनांसाठी उपलब्ध केलेले होते. प्रत्येक तालुक्यात पोर्तुगीज सरकारी शाळा होत्या, पण त्यात पोर्तुगीज माध्यमाच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात होते.
मात्र १९५०-६० या दशकात मराठी हा विषय शिकवण्याची परवानगी पोर्तुगीज सरकारने दिली खरी, पण त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या होत्या. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि त्यांचे नेते यांच्याविषयी कोणतीही माहिती अभ्यासक्रमात येऊ नये ज्यामुळे या प्रदेशात स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन मिळेल, ही त्यातील एक होती.
इतकेच काय पण पाठ्यपुस्तकात नेहरू गांधी यांचे फोटो छापलेले आढळून आले तर ती पाने फाडून टाकावी लागत असत किंवा त्यांवर कागद चिकटवून ठेवावा लागत असे. तरीही स्व. मोहन रानडे, शारदा सावईकर, गजानन रायकर यांसारख्या अनेक देशप्रेमी शिक्षकांनी गोवा मुक्ती लढ्याची ज्योत सतत तेवत ठेवली. त्यासाठी हालअपेष्टा सोसल्या. पोर्तुगीज सरकारचा छळ सोसला.
केंद्र सरकारने गोवा, दमण व दीव हा प्रदेश संघप्रदेश म्हणून घोषित केला. ९ डिसेंबर १९६३ रोजी या संघप्रदेशाची विधानसभेची पहिली निवडणूक झाली. एकूण मतदान २,६०,३७२ एवढे झाले परंतु लोकांची मतदानाची ही पहिलीच खेप असल्याने १०,८७८ एवढी मते बाद ठरली आणि २,४९,४९४ एवढी मते ग्राह्य ठरली.
एकूण ३० मतदारसंघातून ३० उमेदवार निवडून आले. त्यातील १४ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे, १२ युनायटेड गोवन्स पक्षाचे, ३ अपक्ष आणि १ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा! बहुमतासाठी १६ आमदारांची जरुरी होती. म.गो. सर्वांत मोठा पक्ष होता त्या पक्षाला ३ अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला आणि म.गो. पक्षाचे पहिले लोकनियुक्त सरकार स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या नेतृत्वाखाली २० डिसेंबर १९६३ रोजी स्थापन झाले.
यावेळी भाऊसाहेब बांदोडकर हे कोणत्याही मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नव्हते. कारण त्यांना प्रत्यक्ष राजकारणात यायची इच्छा नव्हती, परंतु त्यावेळचे कोकणातील प्रजा समाजवादी पक्षाचे खासदार बॅ. नाथ पै हे त्यांचे मित्र आणि मार्गदर्शक होते. त्यांच्या आग्रहास्तव त्यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारले आणि नंतर आपल्या पक्षाचे निवडून आलेले मडकई मतदारसंघाचे उमेदवार वसंत वेलिंगकर यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागेवर रीतसर निवडून आले आणि पुढे त्यांनी आपल्या महानिर्वाणापर्यंत म्हणजेच १२ ऑगस्ट १९७३पर्यंत एक लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून या प्रदेशाची धुरावाहिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.