Haath Kaatro Khamb: पोर्तुगिजांनी छळात हात कापले; गोमंतकीयांच्या वेदनांची कहाणी कोरलेला ओल्ड गोव्यातील 'हातकात्रो खांब'

Haath Kaatro Khamb Old Goa: हातकात्रो खांब हे ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. सरकारने, पुरातत्त्व खात्याने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
Haath Kaatro Khamb
Haath Kaatro Khamb Old GoaDainik Gomantak
Published on
Updated on

अभिदीप देसाई

ज्या गोव्यात आज लाखो पर्यटक पोर्तुगीज वास्तुकलेचा आस्वाद घेतात, त्याच गोव्यात एक असा स्तंभ उभा आहे, जो केवळ दगडाचा नाही, तर ज्यामध्ये शेकडो गोमंतकीयांच्या वेदनांची आणि अन्यायाची कहाणी कोरलेली आहे. हा स्तंभ म्हणजे हातकात्रो खांब! हात कापणारा खांब या अर्थाने स्थानिकांमध्ये परिचित. इतिहासाच्या गर्भात दडलेली वेदना

हा स्तंभ जुने गोवे येथे स्थित असून, १६व्या शतकात पोर्तुगिजांनी शिक्षा देण्यासाठी सार्वजनिकरीत्या वापरात आणला होता. या स्तंभावर कैद्यांचे हात दोऱ्यांनी इतक्या तीव्रतेने बांधले जात, की त्यांच्या हातांचे सांधे तुटत. या अमानुष शिक्षेमुळेच याला हातकात्रो खांब हे नाव मिळाले.

ज्येष्ठ पोर्तुगीज संशोधक अँटोनिओ लोपेस मेंडेस यांनी १९व्या शतकात या स्तंभाचे वर्णन पेलोरिन्हो नोवो (नवीन खांब) असे केले आहे. यावर पूर्वी सात पायऱ्या होत्या, ज्या आता नष्ट झाल्या आहेत. सध्या हा स्तंभ साडेतीन फूट उंचीच्या लेटराईट दगडाच्या चौथऱ्यावर उभा आहे. लोकस्मृतीत हा खांब क्रूर धार्मिक छळाचे प्रतीक म्हणून आजही जिवंत आहे.

शिवमंदिराशी असलेली संभाव्य नाळ

इतिहासकार डॉ. पी. पी. शिरोडकर यांनी १९८३मध्ये या स्तंभावर एक प्राचीन कन्नड भाषेतील शिलालेख शोधून काढला, ज्यामध्ये ‘दयाज्ञ’ असा उल्लेख आहे, जो बहुधा भगवान शिव या देवतेचा निर्देश असावा. या खांबावरील शिल्पशैली आणि शिलालेख पाहता, हा स्तंभ कदाचित दिवाड येथील प्राचीन सप्तकोटेश्वर मंदिराचा असावा, ज्याचे बांधकाम विजयनगर साम्राज्याच्या माधव मंत्र्याने १३९१मध्ये केले होते.

हे मंदिर प्रथम बहमनी सुलतानांनी १४७१मध्ये उद्ध्वस्त केले आणि नंतर पोर्तुगिजांनी त्याचे अवशेष वापरून जुने गोवे येथे चर्च उभारल्या. अनेक मंदिरांचे खांब, शिखरे आणि मूर्तींचे अवशेष आजही भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संग्रहालयात पाहायला मिळतात.

आजची स्थितीः- अपमानास्पद आणि वेदनादायक

दुर्दैवाने, आज हे ऐतिहासिक आणि भावनिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थळ भिकाऱ्यांचे आश्रयस्थान बनले आहे. येथे अनेक भिकारी बसलेले आढळतात. खाणे, पिणे, भांडणे आणि कचरा टाकणे यामुळे या परिसराचे पावित्र्य आणि सौंदर्य दोन्ही लोप पावत आहे. अशा वर्तनामुळे या स्मारकाची ऐतिहासिक व सांस्कृतिक शुचिता धोक्यात येत आहे. सरकार व शासकीय पातळीवर असलेली ही उदासीनता फार घातक आहे. गोव्याच्या खाणाखुणा, गोव्याचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या वारसास्थळांबद्दल असे उदासीन न राहता युद्धपातळीवर काही गोष्टी करणे गरजेचे आहे.

Haath Kaatro Khamb
UNESCO Heritage Goa:'पूर्वजांनी धर्म रक्षणासाठी बलिदान दिले, हात कातरो खांबाचा युनेस्कोच्या सूचीत उल्लेख व्हावा'; हिंदू जनजागृती समिती

तातडीने पावले उचलावीत

गोवा सरकार व पुरातत्त्व खात्याकडे नम्र विनंती आहे की त्यांनी खालील उपाय त्वरित राबवावेत:

१.या परिसरातील अनधिकृत भिकाऱ्यांना त्वरित हटवावे.

२.परिसराची स्वच्छता आणि देखभाल नियमितपणे करावी.

३.स्तंभावर व परिसरात माहितीफलक लावावेत, जे या जागेचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट करतील

४.परिसरात प्रकाशयोजना व सौंदर्यीकरण करावे, जेणेकरून या स्मारकाचा गौरवशाली इतिहास अधोरेखित होईल

Haath Kaatro Khamb
Hatkatro Khamb In Goa: ‘हात कात्रो खांबा’ची विटंबना; राज्याच्या पुरातत्त्व खात्याने लक्ष घालण्याची होतेय मागणी

आपला वारसा, आपली जबाबदारी

हातकात्रो खांब ही केवळ एक वास्तू नाही; ती आपल्या इतिहासाची, वेदनेची आणि सांस्कृतिक जिद्दीची साक्ष आहे. या खांबाचे जतन करणे म्हणजे गोव्याच्या अस्मितेचे व हिंदू समाजाच्या सहनशक्तीचे स्मरण ठेवणे होय. आपल्या पुढच्या पिढ्यांना या वास्तूच्या माध्यमातून सत्य सांगणे ही आपली जबाबदारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com