
GMC Controversy
गोमेकॉतील जाहीर, ऑन कॅमेरा राग प्रदर्शन नाट्याच्या तिसऱ्या दिवशीची गोष्ट. अगदी सकाळी सकाळी, तसा गोव्याशी थेट काहीही संबंध नसलेल्या माझ्या मलेशियातील विस्तारित कुटुंबातील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टरांचा मेसेज आला. ‘तो’ जगजाहीर व्हिडिओ पाठवून, ‘खरेच का हे गोव्यात घडले?’ अशी विचारणा करणारा तो मेसेज होता.
त्यावेळी या एकूण प्रसंगाविषयी, माझ्याबाबतीत तरी दिसलेल्या एका पॅटर्नने माझे लक्ष वेधून घेतले. ७ जूनला जेव्हा ही घटना घडली तेव्हा सगळ्यात आधी फोन आणि मेसेजेस आले ते गोव्यातील ओळखीच्या लोकांचे, कोण-कोठला हा डॉक्टर असे विचारणारे. मग आले ते हळू आवाजात या साऱ्या नाट्यात प्रमुख भूमिका निभावलेल्या पत्रकारांविषयी विचारणा करणारे.
त्यानंतर देशभरातील माझ्या परिचयाच्या वर्तुळातील लोकांनी नक्की झालंय काय, हे जाणून घेण्यासाठी माझ्याशी संपर्क केला. त्यानंतर विदेशात स्थायिक झालेल्या पण मूळ गोमंतकीय आप्तस्वकीय, सहपाठी इत्यादींकडून त्या संबंधीची विचारणा आणि मग वर नमूद केल्याप्रमाणे गोव्याशी तसा काहीही संबंध नसलेल्या देश विदेशातीलही अनेक लोकांकडून या संबंधी विचारून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला गेला.
आपण पाण्यात दगड टाकतो तेव्हा खडा टाकलेल्या जागेवरून सुरुवात झालेले तरंग हळूहळू खूप दूरवर पसरत जातात, तसेच काहीसे हे मला वाटले. एका व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सामान्य नागरिकांशी लोकशाहीतील लोकप्रतिनिधीकडून विनाकारण गैरवर्तन केले जाते, त्याचा अपमान केला जातो. या एकूणच २-३ मिनिटांच्या घटनेचे पडसाद तरंगाप्रमाणे सर्वदूर, देशभरच नव्हे तर जगभर उठतात, सारेच अचंबित करणारे.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जसजशी ही गोष्ट जवळच्या वर्तुळातून, दूर, अतिदूरच्या वर्तुळात पोहोचली तसे तसे तिचे त्या त्या वर्तुळात पडसाद उमटत गेले. शासनाला शीघ्र गतीने या साऱ्या प्रकारावर तोडगा काढण्यासाठीही याच पडसादांनी भाग पाडले असे म्हटले तर अतिशयोक्ती होऊ नये. स्वतःच्या सफाईत एक शब्दही न बोलू दिल्या गेलेल्या त्या नागरिकाच्या मूक व्यथेचे अगदी विश्वभर प्रतिध्वनीत झालेल्या गडगंज आवाजात रूपांतर करण्याच काम केले ते माहिती तंत्रज्ञानाने.
इस्रायली इतिहासकार, तत्त्ववेत्ते आणि लेखक युवाल नोआ हरारी मोठमोठाल्या लोकशाहींच्या व्युत्पत्तीचे श्रेय माहिती तंत्रज्ञानाला देतात. लोकशाही म्हणजे जनतेचे, जनतेसाठी आणि जनतेद्वारे चालवले जाणारे सरकार, ही अब्राहम लिंकन यांची एकमेवाद्वितीय व्याख्या. आता लोकांनी राज्य चालवणे म्हणजे काय करणे? तर एकमेकांशी विचारविनिमय करून सर्वांच्या भल्याचा विचार करून योग्य निर्णय घेणं. ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः|’ हे ध्येय ठेवून त्या निर्णयांची अंमलबजावणी करणे.
युवाल म्हणतात, मानवी इतिहासाच्या सुरुवातीच्या टप्प्यातही अशा प्रकारची लोकतांत्रिक शासन व्यवस्था होती. पण ती शिकारी आणि संकलक (र्हीपींशअॅ-सरींहशअॅशअॅ) समुदाय किंवा अथेन्ससारख्या लहानग्या सिटी स्टेटपर्यंत मर्यादित होती. कारण त्यांच्यात विचारविनिमय व्हायचा तो सभा संमेलनात प्रत्यक्ष भेटून. त्यामुळं तेथील लोकशाही, जेवढे लोक एका जागी सामावू शकतील, तेवढ्या समुदायापुरती सीमित होती. त्यामुळं, त्या काळी जगात कोठेही मोठ्या लोकशाह्या अस्तित्वात नव्हत्या.
पण जसजशी प्रिंट, टेलिग्राम, रेडिओ, टेलिफोन, टीव्ही आदी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची साधने उत्पन्न होत गेली तसतशी विचार विनिमयासाठी स्थळकाळाची बंधने नाहीशी झाली. लाखो लोक या माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधू शकले आणि त्यातून विकसित झाली ती लाखो, कोट्यवधी लोकांद्वारे सामूहिकपणे चालवली जाणारी शासन व्यवस्था, अर्थात लोकशाही! माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जसजसे बदल होत गेले तसतशी लोकशाहीची शासन व्यवस्थाही बदलत गेली.
संगणक, इंटरनेट, सोशल मीडिया, एआय आदी संवाद साधण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी उपलब्ध झालेल्या अतिहुशार तंत्रज्ञानाने तर सरकार बनवण्यापासून ते शासन चालवण्यापर्यंत लोकतंत्रातल्या साऱ्याच गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला.
माहिती तंत्रज्ञानाद्वारे लोकशाही अधिक सक्षम होणे शक्य आहे, कारण याच्या माध्यमातून शासनात पारदर्शकता आणता येते, नागरिकांचा सहभाग वाढवता येतो आणि सरकारला उत्तरदायी ठेवता येते. मतदान सुलभ करणे, जनजागृती घडवणे, कार्यक्षम प्रशासन तयार करणे, सामाजिक चळवळी संघटित करणे आणि सर्वसमावेशक सहभाग सुनिश्चित करणे हे या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होते.
माहिती तंत्रज्ञानाची ही ताकद लोकतंत्र प्रगल्भ, सुदृढ आणि समृद्ध करण्यासाठी वापरली तर कल्पनातीत क्रांती घडू शकते हे वादातीत आहे. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा सर्वसामान्य नागरिक डोळसपणे वागेल. आपली दिशाभूल करण्यासाठी हे तंत्रज्ञान शस्त्र म्हणून काही आपमतलबी प्रवृत्तींकडून वापरले जातेय याची स्पष्ट जाणीव त्याला होईल. पण ही झाली नाण्याची एक बाजू.
खरे तर माहिती तंत्रज्ञानाने आज आम्हांला मानवी इतिहासाच्या एका विचित्र वळणावर आणून ठेवलं आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर लोकशाही आणखीनच प्रगल्भ करण्यासाठी केला जाऊ शकतो, हे सत्य आहेच. पण हेही तेवढेच खरे आहे की याच तंत्रज्ञानाचा गैरवापर लोकशाहींना हुकूमशाही(ओटोक्रॅटिक रेजीम)च्या आणखीन भयानक अवताराकडे म्हणजे एकाधिकारशाही(टोटॅलिटेरियन रेजीम)कडे नेण्यासाठीही केला जाऊ शकतो.
टोटॅलिटेरियन(एकाधिकारशाही) शासन यापेक्षा एक पाऊल पुढे जातं. ही व्यक्ती किंवा गट केवळ ‘हम करेसो कायदा’ म्हणत एकाधिकारी सत्ता चालवत नाही, तर प्रत्येक नागरिकावर (स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्याचं लक्ष ठेवून) पाळत ठेवतो, त्याच्या स्वतंत्रपणे अभिव्यक्त होण्यावर बंधन आणतो, अगदी त्याच्या व्यक्तीस्वातंत्र्यावरच घाला घालतो.
ही पाळत अतिशय सूक्ष्म पातळीवरही प्रभावी पद्धतीने ठेवण्यासाठी, सामन्याच्या आयुष्यात नको तितकी दखल देण्यासाठी मदत घेतली जाऊ शकते ती माहिती तंत्रज्ञानाची. किंबहुना भारत धरून सगळ्याच मोठ्या लोकशाहींमध्ये हल्ली असाच कल दिसतोय हे सत्य नाकारता येत नाही.
नागरिक दक्ष राहिले नाहीत आणि जर ही एकाधिकारशाहीकडे झुकणारी प्रक्रिया अशीच चालू राहिली तर जगभरातील लोकशाहींच्या शवपेटिकेवर शेवटचा खिळा बसायला वेळ लागणार नाही. त्यालाही तंत्रज्ञानच जबाबदार असेल हे मात्र नक्की.
- संगीता नाईक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.