
विकास कांदोळकर
'तियात्र’ या गोमंतकीय कला प्रकारावर लिहिताना, १९७९सालापासून तियात्राचे गाढे अभ्यासक असलेले, हल्लीच देहावसान झालेले, केपे येथील जॉन क्लारो यांच्याबरोबर, ‘तियात्र’च्या माहिती संकलनासाठी गोवा-मुंबई प्रांतातील विविध भागांतील केलेल्या दौऱ्यांची आठवण झाली.
तियात्र या कलाप्रकाराची शान असलेल्या ‘तियात्र अकादमी, गोवा’ संस्थेच्या ‘वेबसाइट’वर असलेली माहिती ही जॉन क्लारो यांच्या अथक परिश्रमांची परिणती आहे, हे अस्मादिक, त्यांच्याबरोबरच्या त्रासदायक पण सृजनात्मक असलेल्या सहवासाच्या अनुभवातून सांगू शकतात.
तियात्राच्या प्रांतातील त्यांच्या अनुभवाचा प्रत्यय आल्यामुळे संशोधनात्मक वृत्तीतून या प्रकाराचा अभ्यास करता आला. ‘इटालियन भुरगो’ या सुरुवातीच्या तियात्रापासून वर्तमान काळातील तियात्रापर्यंतची सखोल माहिती त्यांच्याकडे असे.
लुकासिन रिबॅरो या आसगाव गोव्यातील तरुणाने १७ एप्रिल १८९२ या दिवशी ‘इटालियन भुरगो’ या नावाने पहिलेच तियात्र मुंबईत सादर केले. या तियात्राची प्रेरणा त्यांनी ‘इटालियन बॉय’ या त्याकाळी मुंबई दौऱ्यात असलेल्या इटालियन ऑपेरा कंपनीकडून घेतली. किंबहुना त्याने आपल्या पहिल्या सादरीकरणासाठी त्याच इटालियन कंपनीकडून त्यांची वेशभूषा, नेपथ्य, इत्यादी विकत घेतले.
तियात्राचे कथानक सहा-सात भागांत विभागले गेलेले असते. यामध्ये विविध स्थळ-काळातील दृश्ये असतात. दृश्य बदल करण्यास पुढे रस्त्याचा पडदा टाकून मागे नेपथ्यरचना केली जाते. दरम्यानच्या काळात प्रेक्षकांनी कंटाळू नये म्हणून ‘इटालियन भुरगो’ या पहिल्याच तियात्रात कथानकाशी संबंधित नसलेली दोन-तीन गाणी (कांतारां), बँडच्या साहाय्याने प्रत्येक दृश्य बदलाच्या वेळी म्हटली गेली.
म्हणजेच सुमारे १४-१५ कांतारां आणि कथानक यांच्या सुरेख मिश्रणामुळे तियात्र हा एक वेगळाच कलाप्रकार ठरला. पहिल्याच तियात्रात लुकासीन रिबेरोबरोबर काम करणाऱ्या जुआव आगुस्तीन फर्नांडिस यांना ‘फादर ऑफ तियात्र’ म्हटले जाते कारण त्यांनी आपल्या जीवनात तियात्राच्या विकासासाठी खूप परिश्रम घेतले.
तियात्र अकादमीच्या वेब पेजवर ‘इटालियन भुरगो’ या पहिल्या तियात्राचे दस्तऐवजीकरण नसल्यामुळे, तियात्र या कलाप्रकाराच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त जुआव आगुस्तिन फर्नांडिस यांनी ‘एव मारिया’ अंकात २८ नोव्हेंबर १९४३ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रातील माहिती प्रमाण मानली गेली आहे.
तियात्र अकॅडमीने किंवा इतरांनी याच्या पलीकडे जाऊन काही संशोधन केल्याचे दिसून येत नाही. तियात्राचा अभ्यासक पण त्यापेक्षाही ‘गोंयकार’ असल्यामुळे, तसेच जॉन क्लारो, मायक मेहता, एम. बॉयर, जासिंत वाझ, प्रेमकुमार, ज्यो रोझ, अनिलकुमार, प्रेमानंद सांगोडकर, ग्रेग-सबीना, रोम टोनी, ख्रिस पेरी, फिडेलीस, मास्टर वाझ, जेसी, बॅटी नाझ, इत्यादींसारख्या अनेक दिग्गज कलाकारांबरोबर,
गोवा, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये केलेल्या हजारो प्रयोगांच्या अनुभवातून अस्मादिकाला या कला प्रकारात सध्या तरी पाच-सहा संशोधनाच्या जागा दिसतात, ज्यामुळे तियात्राचे जागतिक स्तरावरील महत्त्व वाढू शकते. वेळेने साथ दिल्यास अवश्य पुस्तक रूपाने त्या उघडकीस आणू. इथे नमूद करावेसे वाटते की भूतकाळात ४०-४५ वर्षांपूर्वी जॉन क्लारो, मायक मेहता, एम. बॉएर यांनी, प्रस्तुत लेखकाने सुचवलेल्या बदलांची दखल घेत कौतुकही केले होते.
परंपरागत गोव्याची संस्कृती आणि ओळख आकर्षकपणे मांडणारे खेळ किंवा ‘फेळ’, प्रेक्षकांनी वेढलेल्या जमिनीवर, स्टेज, पडदे, इत्यादींशिवाय फक्त ब्रास बँडच्या साहाय्याने कलाकार आत्मविश्वासाने सादर करत आले आहेत. गेल्या शतकातील सातव्या दशकाच्या दरम्यान खेळ-तियात्र खुल्या आणि बंदिस्त सभागृहात होऊ लागले. सामान्य व श्रमिक लोकांचे मनोरंजन करणारा हा रंगभूमीवरील प्रकार मूळ तियात्राला पुढे आव्हानात्मक ठरला. तियात्र सादर करणाऱ्या जवळ-जवळ सर्व गटांमध्ये आपापसांतील व्यावसायिक तसेच इतर वैरभावनांमुळे तियात्र या कलाप्रकारात कलात्मक बदल करण्यात ते कमी पडले.
तियात्र व खेळ तियात्र कलाकारांनी कलेच्या उत्कर्षासाठी आणि सुरक्षिततेसाठी एक झाले पाहिजे ही कळकळीची विनंती.
हल्लीच कला व संस्कृती खात्याच्या व राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत रंग महोत्सव’ कला अकादमीच्या काम्पाल सभागृहात झाला. कला अकादमीचा रंगमेळ बंद पडलेला असताना, तियात्र जागतिक पातळीवर नेण्याचे विधान, केंद्रीय नाट्य विद्यालयाला साखळी रवींद्र भवनमध्ये हवी ती मदत करण्याचा इरादा आणि नाट्य विद्यालयाच्या प्रवक्त्याचे ‘सबका साथ सबका विश्वास’ विधानाने महोत्सव ‘बेरंग-भयास्पद’ वाटला.
‘गोयकरां’च्या जमिनी, धंदे, राजकारणी, पर्यटन, व्हायब्रंट स्वप्ने तसेच जुगारी जहाजे, जुगारी वसाहती, इत्यादी दिल्लीकरांच्या हातात असताना ही ‘देवाणघेवाण’ बऱ्याची वाटली नाही.
दिल्लीकरांचे ‘सेकंड’ होम्स वसवण्यासाठी ‘गोंयकारांची फर्स्ट आणि ओन्ली फर्स्ट होम्स’ तर उद्ध्वस्त केली जात नाहीत ना? का कोणास ठाऊक ‘एला’हून ‘ताळगाव’कडे आलेल्या राजधानीची तीव्रतेने आठवण आली.
गोव्याच्या ‘नॅचरल इंटेलिजन्स’ असलेल्या तियात्र कलाप्रकारात दिल्लीचे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ आणून ‘तियात्र’ या गोव्याच्या अद्वितीय कलाप्रकाराला ‘फोणांत’ (अंतिम खड्ड्यात) तर घातले जात नाही ना?
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.