Opinion: जून, जुलैत गोव्यात पाऊस उसंत न घेता अक्षरश: कोसळत असतो..

Emotional Collapse: जेव्हा असीम दु:खाचे डोंगर मनुष्याच्या जीवनात येतात, तेव्हा त्याच्यावर ‘आभाळ कोसळले’ असे आपण म्हणून जातो. हे दु:खाचे आभाळ कोसळते, तेव्हा या कोसळण्याला दु:खाची गडद छाया असते.
Goa Rain Update
Goa Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

कविता आमोणकर

नदी-नाल्यांतून वाहणारे झुळूझुळू पाणी जेव्हा उंचच उंच डोंगरमाथ्यावरून खाली कोसळते, तेव्हा क्षणार्धात त्याचा धबधबा होतो. एरव्ही सपाट भूतलावरून वाहणारे हे पाणी जेव्हा प्रचंड वेगाने डोंगरावरून खाली कोसळते, तेव्हा त्याचे सौंदर्य हे पाहण्याजोगे असते. हे पाणी उंचावरून कोसळताना डोंगरावरील अनेक अणकुचीदार कातळांवरुन, दगडधोंड्यांवरून, झाडापेडांवरून आदळून त्यावर प्रघात करून जाते. हा प्रघात करताना या पाण्याचे अनेक तुषार वातावरणात पसरतात. अनेक तुषार एकत्र झाल्याने पाणी दुधाळ रंगाचे होऊन जाते.

शांत वाहणारे हे पाणी जेव्हा उंचावरून कोसळते तेव्हा त्याची परिणती ही वेगळ्याच स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. कोसळण्यात, आणि तीही इतक्या उंचावरून कोसळण्यातही किती सुंदरता असते, याचा अनुभव आपल्याला मिळतो. इथे पाण्याचे कोसळणे हे मनाला लुभावणारे असले तरी प्रत्येक कोसळणारी गोष्ट ही तितकीच सुंदर असते, असे मात्र नाही.

‘आभाळ कोसळणे’ हा वाकप्रचार जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अतिशय कठीण परिस्थिती कोसळते, तेव्हा वापरला जातो. जीवन जगताना मनुष्याला जेव्हा अतीव दु:खाचा सामना करावा लागतो, तेव्हा ‘त्याच्यावर आभाळ कोसाळले’, असे म्हटले जाते.

‘सुख पाहता जवाएवढे आणि दु:ख आभाळाएवढे’, अशी म्हण आहे ती काही खोटी नाही. कितीही सुख पदरात असले तरी ते कमीच भासते. परंतु दु:ख मात्र कितीही असले तरी ते आभाळाएवढे, म्हणजे त्या दु:खाला काही सीमा नाहीत असे वाटून जाते.

मग जेव्हा असीम दु:खाचे डोंगर मनुष्याच्या जीवनात येतात, तेव्हा त्याच्यावर ‘आभाळ कोसळले’ असे आपण म्हणून जातो. हे दु:खाचे आभाळ कोसळते, तेव्हा या कोसळण्याला दु:खाची गडद छाया असते.

कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने, जीवनात किंवा परीक्षेत अपयश आल्याने, प्रेमभंग झाल्याने किंवा अपेक्षाभंग झाल्याने सहन न होणाऱ्या दु:खाचा जेव्हा जीवनात प्रवेश होतो, तेव्हा हे दु:ख सहन होऊ न शकल्याने कधी कधी माणूस उभ्याउभ्याच कोसळतो. कधी कधी हे कोसळणे इतके वेदनादायी असते, की एखादा संवेदनशील माणूस परत उठून उभा राहायला असमर्थ ठरतो.

अनेकांना आपले दु:ख हे मनात साठवून ठेवण्याची सवय असते. मनात साठवलेल्या या दु:खाच्या ओझ्याखाली हळवे मन दबून जाते. मनातले दु:ख उरामध्ये साठवून ठेवताना एखाद्या नाजुक क्षणी अचानक कधीतरी मनाचा बांध फुटतो आणि रडू कोसळतं.

धाय मोकलून रडताना मनात साचलेले दु:ख हे डोळ्यांवाटे अश्रूंच्या रूपात कोसळून जाते. ओक्साबोक्षी रडताना डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागतात आणि काळजात लपवलेले दु:ख हे अश्रूंच्या रूपांत वाहू लागते.

डोळ्यांतून वाहणारे हे अश्रू मनातील साचलेले दु:ख बाहेर काढतात. डोळ्यांतील पापण्यांचा बांध फुटून ओक्साबोक्षी रडताना जेव्हा हे अश्रू कोसळून जातात, तेव्हा मनातील मणाचे ओझे मात्र कमी करून जातात . अश्रूंचे हे कोसळणे मनाला हलके करून जाते.

भूकंप होतो, तेव्हा मोठमोठ्या इमारती कोसळतात, झाडे कोसळतात, डोंगर, दरडी कोसळतात. हिमाचल प्रदेशात तर दरडी कोसळण्यासोबत भूस्खलनाच्याही घटना घडतात. दरडी, डोंगर कोसळताना निसर्गाचा हा भयंकर उत्पात समस्त मानवजातीच्या जीवनप्रणालीला अक्षरश: हादरवून सोडतो.

डोंगराच्या पायथ्याशी वसलेली अनेक गावे यात उद्ध्वस्त होतात. प्रचंड मानवी संहार होतो. पूल, रस्ते यावर दरडी कोसळल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. केवळ भूकंप होण्यानेच नाही, तर बांधकाम कच्चे असेल तरीही पूल कोसळण्याच्या घटना घडतात.

वैशाखाच्या रणरणत्या उन्हात भाजलेल्या तप्त भूतलावर जेव्हा पावसाच्या पहिल्या सरी कोसळतात, तेव्हा मातीच्या गर्भातून निघणारा सुगंध हा वातावरणात भरून राहतो. तप्त मातीवर पावसाच्या सरींचा वर्षाव होताच धरित्रीही सुखावते आणि तिच्यातून आपसूक सुगंध दरवळतो. मातीचा हा सुगंध मन वेडे करणारा असतो.

पुढे जून, जुलै महिन्यात गोव्यात पाऊस क्षणभरही उसंत न घेता अक्षरश: कोसळत असतो. पावसाचे हे कोसळणे समस्त मानवजातीला आणि प्राणिवर्गाला मात्र सुखावून जाते. पावसाच्या या मुसळधार कोसळण्याने नदी, नाले, तलाव तुडुंब भरतात.

Goa Rain Update
Bicholim: ..शुभ्र जलधारा कोसळती! डिचोलीतील धबधब्यावर पर्यटकांची गर्दी; आबालवृद्ध लुटताहेत आनंद

दक्षिण गोव्यात साळावली धरण जेव्हा पाण्याने पूर्ण भरते तेव्हा ते दृश्य पाहाण्यासाठी अनेक पर्यटकही या ठिकाणी गर्दी करतात. पारोडा येथील पूल नदीच्या पाण्याने भरून दिसेनासा झाला की गोव्यात समाधानकारक पाऊस पडला, असे जाणकार आजही म्हणतात. मिरामार, दोनापावल येथे उसळणाऱ्या लाटांचे तुषार अंगावर झेलण्यासाठी बाल तसेच आबालवृद्धही गर्दी करतात.

कधी कधी सरकारही कोसळते बरं का !.. जेव्हा अविश्वासाचा ठराव मंजूर होतो किंवा एखादा नेता दगाफटका करतो, तेव्हा सरकारचे कोसळणे हे निश्चित असते. कधीकधी शेअर बाजार कोसळतो आणि अर्थकारणात एकच हाहाकार उडतो.

Goa Rain Update
Himachal Rain: 307 रस्ते बंद, 100 पेक्षा जास्त मृत्यू; जोरदार पावसामुळे हिमाचलमध्ये जनजीवन विस्कळित

क्रिकेट खेळताना एखाद्या संघातील निवडक खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्यास त्यांच्या संघाची धावसंख्या कोसळते. तर कधी एखाद्या व्यक्तीला मूर्छा आल्याने ती व्यक्ती जमिनीवर कोसळते. एखाद्याला हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोक आल्यानेही तो जमिनीवर कोसळतो.

कोसळण्याचे हे कित्येक प्रकार असले तरी प्रत्येक कोसळण्यामागे काही कारण आहे. कधी कधी पाणी कोसळण्याने पाण्याचा सुंदर धबधबा तयार होतो, मनातील दु:ख हे रडू कोसळण्याने बाहेर पडल्याने मन रिकामे होते, तर कधी निसर्गाचा उत्पात झाल्यावर कोसळण्याने हाहाकार माजतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com