Goa Casino: गोव्यात 'जुगारी शहर' झाल्यास पर्यटक निसर्ग सोडून कॅसिनोत जातील, 'मटका आणि प्रॉबेबिलिटी’ सारख्या डिग्री देता येतील..

Goa Gambling Hub: गोवा म्हटले की गोव्याची संस्कृती, कला, निसर्गातील शेते, जंगले, समुद्रकिनारे, नारळाची झाडे, इत्यादी पर्यटकांना आकर्षित करत.
Casino News
CasinoDainik Gomantak
Published on
Updated on

विकास कांदोळकर

गोवा म्हटले की गोव्याची संस्कृती, कला, निसर्गातील शेते, जंगले, समुद्रकिनारे, नारळाची झाडे, इत्यादी पर्यटकांना आकर्षित करत. पण आता गोवा सरकारने तिळारी पाणी प्रकल्पाअंतर्गत असलेली धारगळ येथील शेतजमीन जुगारी शहर वसविण्यासाठी, एका खाजगी कंपनीला देऊन, गोव्यातील युवक-युवतींनी शेती व तत्सम उद्योग व्यवसाय सोडून जुगारी कलेकडे वळण्याचे व गोवा जुगारी राज्य बनण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

सरकारला धारगळ चमचमते ‘लास वेगास’ बनवायचेय. कल्पना करा, धारगळचे जुगार-वैभव दाखविण्यासाठी गल्ली-गल्लीत जुगाराचा ‘चमचमाट’! धारगळच्या काना-कोपऱ्यात स्लॉट मशीन्स आणि पोकर टेबल्स!! सरकारने ‘पॉलिसी’ बदलत जुगाराला उद्योग घोषित केल्यास, ‘सबसिडी’ मिळाल्यास, पुढे-मागे स्थानिक व शेजारील राज्यांतील ‘पटवाले’ आणि ‘मटकेवाले’सुद्धा आपली दुकाने ‘धारगळ जुगारी नगरी’त थाटू शकतील.

लोकांच्या जमिनी हडपून ‘मोपा विमानतळ’ झालाच आहे. पर्यटक धारगळ जुगारी नगरीत आपली संपत्ती गमवायला येतील. सरकारचा दावा असेल, पर्यटन, रोजगार वाढून अर्थव्यवस्था अंतराळात पोचली! पण शोकांतिका अशी की जुगारामुळे माणुसकी नष्ट होऊन, माणसे कंगाल होतात, सरकार नव्हे!

धारगळ जुगारी शहरात काय असेल? रस्त्याच्या कडेला जुगार खेळण्यास आकर्षित करणारे मोठमोठे पोस्टर्स, रम्मी खेळणारे आजोबा-आजी, लॉटरीच्या तिकिटांवर भविष्य शोधणारी तरुणाई, जुगारी अड्ड्याचा ‘बायप्रॉडक्ट’ असलेला वेश्याव्यवसाय आणि जुगारी अड्ड्यातून बाहेर पडलेली कर्जबाजारी मंडळी. सरकारला वाटते, यातून करांचा पाऊस पडून सरकारी तिजोरी ‘उफाट’ भरेल. पण हा पाऊस कॅसिनो मालकांच्या खिशात जाऊन, सामान्य माणसाच्या घरात फक्त कर्जाचे ‘वादळ’ येईल.

गोव्यातील कॅसिनोंमुळे आधीच गुन्हेगारी आणि सामाजिक समस्यांनी डोके वर काढलेय. तरीही सरकारला आणि सामाजिक जाणिवेविषयी अशिक्षित-अडाणी राजकारण्यांना वाटते, की हाच जुगार गोव्याचा उद्धार करेल. अडसर, दिवाळखोरी, आणि सामाजिक पतनाला नेणारा असला तरी जुगार राजस्व आणतो, नोकऱ्या निर्माण करतो, जनतेचे मनोरंजन करतो, असे भासवून अर्थव्यवस्था उत्तेजित करण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकार ठामपणे सांगू शकते.

Casino In Goa
Casino In GoaDainik Gomantak

गोव्यातील जनता जुगारात गुदमरल्यामुळे पैसा कुठून येणार? शिक्षण पॉलिसी बदलत सरकार म्हणेल, शाळेत कशाला जायचे? स्लॉट मशिन फिरवा आणि आयुष्य बदला! तसे असेल तर सरकारने आपल्या अनैतिक दृष्टिकोनातून, जुगाराला संस्थात्मक स्वरूप द्यावे.

शाळांमध्ये जुगार शिक्षण बंधनकारक करावे. मुलांना वाचणे शिकण्यापूर्वी कार्ड खेळायला शिकवावे. जुगार व त्यावर अवलंबीत व्यवसायांच्या शिक्षणाचे भविष्य मंगलमय करण्यासाठी धारगळ जुगारी नगरीतील कानाकोपरा युवक-युवती, स्लॉट मशीन्स आणि पोकर टेबलांनी भरून टाकावा. पेडण्यात विमानतळ सुरू होऊनसुद्धा त्यावेळी गरज असलेली ‘एरोनॉटिकल’ शिक्षणसंस्था सुरू न केल्यामुळे गोवेकरांना मोठ्या हुद्द्यावरील नोकऱ्या न मिळाल्यामुळे सफाई कामगार, सेक्यूरिटी, ड्रायव्हरसारख्या किरकोळ नोकऱ्यांवर भागवावे लागले, याची खंतही सरकारला बोचत असेल.

Casino News
Casino Ship: अद्भुत! मांडवीत होणार देशातील सर्वात मोठे 'कॅसिनो शिप'; ‘डेल्टिन रॉयल’पेक्षा अडीचपट भव्य

धारगळ जुगारी शहर संदर्भात सरकारने वेळीच सावध होऊन जुगार आणि अवलंबित व्यवसायांच्या शिक्षणासाठी धारगळमध्ये जुगार ट्रेनिंग कॉलेज सुरू करावे. समाजविरोधी जुगार व्यवसायासाठी ट्रेनिंग कॉलेज सुरू करण्याचे हे पाऊल खरोखरच सरकारचा शिक्षण आणि नैतिकतेचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. कल्पना करा, असे कॉलेज जिथे विद्यार्थी ‘पोकरची ओळख: कसे ‘ब्लफ’ करून दिवाळखोर होता!’,

‘रुलेटसाठी धाडसी किंवा आर्थिक दिवाळखोरी!!’, ‘जुगार मार्गदर्शिका!!!’ असे कोर्स शिकतील. हे कॉलेज ‘बेटिंग पेशकशी’, ‘जुगार अडसर अभ्यास’, ‘स्टेटिस्टिकल पट-अभ्यास’, ‘मटका आणि प्रॉबेबिलिटी’ सारख्या उन्नत डिग्री देऊ शकेल. सरकारच्या योजनेत अवैध मार्गांतून पैसा कमावलेले राजकीय नेते अधिक पैसा जमविण्यासाठी जुगार खेळतील! आणि नियम? ते फक्त सामान्य माणसांसाठी!! कॅसिनो मालक आणि बड्या मंडळींसाठी विशेष सवलती.

Casino News
Goa Crime: दक्षिण गोव्‍यात 'मटका खुलेआम', केवळ ३१८ प्रकरणांची नोंद; 'कडक कारवाई'च्या आदेशाला वाटाण्‍याच्‍या अक्षता

आधीच कॅसिनोंनी ‘नीज गोंयकारांचे’ पाणी, जमीन, हवा इतकेच काय तर सुखही लंपास केले आहे. अयोग्य नियोजनातून चहूबाजूंनी उत्पन्नाचे स्रोत घालवून बसलेल्या सरकारचा हा ‘आर्थिक विकासाचा मास्टरस्ट्रोक’ एक भयंकर स्वप्नविकार आहे! वास्तवात, धारगळ जुगारी शहर गोव्याच्या सांस्कृतिक वारशाला आणि नैसर्गिक सौंदर्याला काळिमा फासेल. पर्यटक गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य अनुभवायचे सोडून, कॅसिनोत बँक बॅलन्स रिकामे करायला येतील.

जुगाराने गोवा ‘विकसित’ होईल ही गोवा सरकारची सुपीक कल्पना एका नव्या घोटाळ्याचा पाया आहे. गोव्यातील जनता आणि पर्यटकांना खरंच धारगळ जुगारी शहराची गरज आहे का? निसर्ग, संस्कृती आणि शांततेने संपन्न असलेल्या गोव्यात सरकारने जुगारी नगरीच्या स्वप्नविकारातून जागे होऊन खऱ्या समतोल विकासावर लक्ष केंद्रित करावे. नाहीतर, ‘मायनिंग आणि टुरिजम’साठी बड्या लोकांनी ओरबाडून खाल्लेला गोवा खरंच ‘लास वेगास’ बनेल! फक्त कर्ज आणि निराशेच्या बाबतीत!!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com