
गोव्यात १३८० ते १४७० अशी अनेक दशके विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत गोव्याची भरभराट झाली. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दशकांत जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता.
एवढ्या विशाल साम्राज्याचा महाप्रतापी राजा हरिहर(द्वितीय) याने १३४४ ते १४०४ या त्याच्या कालावधीच्या अंतर्गत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभागले. कोकण (कोकण-राज्य), उत्तर कानरा आणि दक्षिण कानरा (बाराकुर-राज्य आणि मंगळुरू-राज्य), उत्तर आंध्र (उदयगिरी-राज्य) आणि दक्षिण आंध्र (चंद्रगिरी-राज्य), उत्तर तमिळ (पदैविदु-राज्य), दक्षिण तमिळ (पांडिया-राज्य) आणि पूर्व तमिळ (मुलुवाई-राज्य) अशी विभागणी केली गेली.
प्रांतांचे प्रशासन सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विकेंद्रित केले गेले होते, जिंकलेल्या क्षेत्रांना स्थानिक सरदारांच्या आधिपत्याखाली सामंत म्हणून राज्य करण्याची परवानगी होती.
२९ ऑगस्ट १३८० रोजी हरिहर (द्वितीय) याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच श्मल्लप्पा वोडेयर म्हणजेच वीर वसंत-माधव राय (माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकपट्टण किंवा गोवा होती. माधव मंत्री त्यापूर्वी एकाच वेळी बाराकुर-राज्य(दक्षिण कानरा) आणि उत्तर कानरा यांचे राज्यपाल म्हणून काम पाहत होते. विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर(द्वितीय)च्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्याने संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले.
गोव्यात फोंड्यातील नागेशी येथील श्रीनागेश मंदिराच्या समिती कार्यालयाच्या भिंतीवर लावलेला, मध्ययुगीन काळातील १४१३चा एक दगडी शिलालेख मंदिराच्या वैभवाचे दर्शन घडवतो. शिलालेखाच्या वरच्या बाजूला घुमटाच्या आकाराची रचना आहे.
मजकुराच्या वर, सूर्य आणि चंद्राची आकृती आहेत. विजयनगरचा राजा देवराय(प्रथम) याने गोवा आपल्या आधिपत्याखाली आणला होता त्या काळात हे कोरले गेले होते. शिलालेखाची सुरुवात श्रीगणपतीच्या आवाहनाने होते. पुढे त्यावर राजा देवराय(प्रथम) यांचे वर्णन विजयनगरचे शासक ‘महाराजाधिराज परमेश्वर श्री वीरप्रताप देवराय महाराज’ असे केले आहे.
त्यात राजा देवराय(प्रथम) यांचे गोव्याचे राज्यपाल नंजन गोसावी यांचाही उल्लेख आहे. शिलालेखात पुढे म्हटले आहे की, कुंकळी येथील पुरुष शेणवीचा मुलगा माई शेणवी याला रामनायक बांदिवडेचा सरदार, नागन नायक, राम प्रभू आणि मांगे प्रभू यांनी गावाच्या वतीने खालील विशेषाधिकार दिले होते.
त्यात असे म्हटले आहे की एका गोपाळ भट्टला वेदखंडिकेचा (बागेचे नाव) अधिकार होता, ज्याच्या बदल्यात तो दरवर्षी श्रीमहालक्ष्मी देवालयाला १२ भांडे तेल आणि २ तांक देत असे. माई शेणवीने गावाला २० तांक भेट दिली आणि बागेवर लावले जाणारे सर्व कर माफ केले. माई शेणवीने असेही ठरवले की गोपाळ भट्टने दरवर्षी कार्तिक महिन्यातील पौर्णिमेच्या रात्री मंदिरासमोरील दीपमाळ पेटवण्यासाठी काही प्रमाणात तेल आणि वाती द्याव्यात.
नागेशी शिलालेखात केलेल्या वर्णनावरून राजा देवराय(प्रथम) ज्यांना विजयनगरचे शासक ‘महाराजाधिराज परमेश्वर श्री वीरप्रताप देवराय महाराज’ असे संबोधले गेले आहे जो विजयनगर साम्राज्याचा ५ नोव्हेंबर १४०६ - २५ फेब्रुवारी १४२३ या राज्यकाळात सम्राट होता .
हरिहर (द्वितीय) यांच्या मृत्यूनंतर, त्याच्या मुलांमध्ये उत्तराधिकारावरून वाद झाला, ज्यामध्ये देवराय (प्रथम) अखेर विजयी झाला. तो एक अतिशय सक्षम शासक होता जो त्याच्या लष्करी कारनाम्यांसाठी आणि त्याच्या साम्राज्यातील सिंचन कामांच्या योजनासाठी प्रसिद्ध होता. त्याने घोडदळात सुधारणा करून विजयनगर सैन्याचे आधुनिकीकरण केले, तुर्क कुळातील कुशल धनुर्धारींना नियुक्त केले आणि त्याच्या धनुर्धाऱ्यांची लढाई क्षमता वाढवली व अरबस्तान आणि पर्शियातून घोडे आयात केले.
विजयनगर साम्राज्याची राजधानी सर्वांत १५ शतकातील मोठ्या शहरांपैकी एक बनवण्याचे श्रेय देवराय(प्रथम) यांना जाते. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाण्याची कमतरता असल्याने शाही राजधानींची वाढ मर्यादित होत आहे हे त्यांनी जाणले.
सुमारे १४१०मध्ये त्यांनी तुंगभद्रा नदीवर एक बंधारा बांधला आणि तुंगभद्रा नदीपासून राजधानीपर्यंत २४ किमी लांबीच्या जलवाहिनीचे बांधकाम सुरू केले. देवराय(प्रथम) यांनी हाती घेतलेल्या अनेक प्रकल्पांची माहिती नुनिज या इतिहासकाराने दिली आहे. त्यांच्या या प्रकल्पांमुळे साम्राज्यात समृद्धी आली. प्रशासकीय बाबींमध्ये देवराय(प्रथम)ने धर्मनिरपेक्षता राखली. त्यांच्या सैन्यातील मुस्लीम सैनिकांच्या सोयीसाठी त्यांनी एक मशीद आणि एक कत्तलखाना बांधला होता असे पुरावे सापडतात.
त्याच्या कारकिर्दीत, देवराय गोलकोंडाच्या वेलामा, गुलबर्गाचा बहमनी सुलतान, कोंडाविडूचा रेड्डी आणि विजयनगरचे पारंपरिक प्रतिस्पर्धी, कलिंगाचे गजपती यांच्याशी सतत युद्ध करत होते.
देवराय पहिला तुर्की कुळातील कुशल धनुर्धारींना नियुक्त करून त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या विशाल प्रदेशाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम होता आणि त्याच्या धनुर्धरांची लढाई क्षमता वाढवत होता. रेड्डी राज्यात बंड निर्माण झाल्यानंतर, देवराय(प्रथम)ने रेड्डी राज्याचे विभाजन करण्यासाठी वारंगलशी युती केली.
सुमारे १४२०मध्ये, फिरोजशहाने वारंगलवर आक्रमण केले परंतु दोन वर्षांच्या वेढ्याचा शेवट फिरोजशहाच्या सैन्यासाठी आपत्तीत झाला. देवरायाने फिरोजशहाचा भयानक पराभव केला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी सुलतानला दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील जिल्हे देवराय(प्रथम)च्या स्वाधीन करावे लागले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.