Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्या'त फोंड्याचा समावेश का नाही?

Third District: फोंडा तालुक्याबरोबरच मोल्यापासून सावर्ड्यापर्यंतच्या भागातील अनेक लोक आपल्या दैनंदिन कामासाठी फोंड्यात येत असतात.
Goa Third District
Goa Third DistrictDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा तालुक्याबरोबरच मोल्यापासून सावर्ड्यापर्यंतच्या भागातील अनेक लोक आपल्या दैनंदिन कामासाठी फोंड्यात येत असतात. या दृष्टीने विचार केल्यासही फोंड्याचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेश व्हायला हवा होता, असे वाटते.

तिसऱ्या जिल्ह्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे गेली बरीच वर्षे लोंबकळत पडलेल्या प्रश्नाला आता पूर्णविराम मिळाला आहे. पण या निर्णयाचे स्वागत करत असताना या तिसऱ्या जिल्ह्यात फोंडा का नाही, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

खरे तर ‘तिसरा जिल्हा’ ही संकल्पना रवि नाईकांची. २०११साली ते गृहमंत्री असताना ही कल्पना आकाराला येऊ लागली होती. त्यावेळी धारबांदोडा तालुका अस्तित्वात आल्यामुळे राज्यात एकूण बारा तालुके झाले होते. त्यामुळे फोंडा, धारबांदोड्यासह आणखी दोन तालुके घेऊन तिसरा जिल्हा करावा आणि त्याचे मुख्य कार्यालय फोंड्यात असावे असा प्रस्ताव रविंनी पुढे आणला होता. केवळ पुढे आणला नव्हता, तर ते तयारीलाही लागले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या दिगंबर कामतांना या तालुक्याचे महत्त्व पटवून देऊन त्यांनी हा प्रस्ताव जवळजवळ मंजूर करूनसुद्धा आणला होता. पण अपेक्षेपेक्षा लवकर २०१२सालच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे ही मंजुरी व त्यामुळे तिसरा जिल्हा होण्याची प्रक्रियाही लटकली.

रविंनी त्यावेळी या जिल्ह्याच्या कार्यालयाकरिता बेतोडा जंक्शनजवळची एक जागाही निश्चित केली होती. तिसरा जिल्हा झाल्यावर फोंडावासीयांना आपल्या सरकारी कामांकरता पणजी वा मडगावला जावे लागणार नाही, असे रवि आपल्या प्रत्येक भाषणात सांगत असत. हा जिल्हा म्हणजे आपले एक स्वप्न आहे, असेही ते म्हणत. २०१२साली आपण निवडून आल्यावर लगेच तिसऱ्या जिल्ह्याच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार असे ते छातीठोकपणे बोलत असत. त्यांनी या कार्यालयाच्या उद्घाटनाची तारीखसुद्धा ठरवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यांचे स्वप्न अधांतरीच राहिले.

काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार आले तरी रवि यांनी प्रयत्न करणे काही सोडले नाही. फोंड्याच्या कोणत्याही कार्यक्रमाला येणाऱ्या तत्कालीन मंत्री व आमदारांकडे ते हेच तिसऱ्या जिल्ह्याचे तुणतुणे वाजवत असत. नंतर भाजपमध्ये जाऊन आमदार- मंत्री झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना हा तिसऱ्या जिल्ह्याचा प्रस्ताव दिला होता.

मुख्यमंत्र्यांनी तो मान्यही केला होता. त्यामुळे, आता तिसरा जिल्हा होणार म्हणजे त्यात फोंडा असणार अशी सर्वांची समजूत झाली होती. पण आता या समजुतीला सुरुंग लागला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रविंचे इतक्या वर्षांचे स्वप्न तर भंग झाले आहेच, त्याचबरोबर फोंड्याचा समावेश केला गेला नाही म्हणून अनेक घटकांकडून नाराजीही सहन करावी लागत आहे.

Goa Third District
Ro-Ro Ferry In Goa: गाजावाजा करत सुरू केलेली 'रो-रो फेरीबोट' सेवा 15 दिवसांतच ठप्प होण्याच्या मार्गावर, प्रवाशांना नाहक मन:स्ताप

तसे पाहायला गेल्यास फोंडा हे राज्यातील मध्यवर्ती शहर. त्यामुळे फोंडा तालुक्याबरोबरच मोल्यापासून सावर्ड्यापर्यंतच्या भागातील अनेक लोक आपल्या दैनंदिन कामासाठी फोंड्यात येत असतात. यामुळेच दक्षिण गोव्यातील मडगावनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून फोंड्याकडे पाहिले जाते. या दृष्टीने विचार केल्यासही फोंड्याचा तिसऱ्या जिल्ह्यात समावेश व्हायला हवा होता, असे वाटते.

आता राहता राहिला प्रश्न आदिवासीबहुल भागाचा. ज्या चार तालुक्यांचा या जिल्ह्यात समावेश केला आहे ते आदिवासीबहुल आहेत असे सांगितले गेले आहे. पण फोंडा तालुक्यातील प्रियोळ व मडकई मतदारसंघातही अनेक भाग आदिवासीबहुल आहेत, हेही तेवढेच खरे आहे. त्याचबरोबर सरकारी कामांसाठी इतर भागांपेक्षा फोंड्यात येणे सोपे पडले असते ही गोष्ट ही नजरेआड करता येत नाही. फोंड्याला वगळण्यामागे काही राजकीय कंगोरे आहे की काय, यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

हा रविंना शह देण्याचा किंवा त्यांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. सध्या रवि जरी भाजप सरकारमध्ये मंत्री असले तरी त्यांचे खच्चीकरण केले जात आहे हे अनेक उदाहरणावरून दिसून आले आहे. रविंना जे महत्त्व काँग्रेस सरकारमध्ये होते ते भाजपमध्ये नाही हेही बघायला मिळत आहे. फोंड्यात गेल्या कित्येक वर्षांत नवीन प्रकल्प आलेले नाहीत. रवि गृहमंत्री असताना जो काही फोंड्याचा विकास झाला होता तोच विकास आजही दिसत आहे. त्यात काही भर पडलेली दिसत नाही.

त्यात परत विश्वनाथ दळवी नावाचे वादळ फोंड्यात घोंघावताना दिसायला लागले आहे. एक साधा नगरसेवक असूनसुद्धा दळवी जे फोंड्यात सध्या ‘कार्य’ करत आहेत ते पाहून त्यांच्यामागे कोणीतरी मोठा ‘गॉडफादर’ असल्याची प्रचिती यायला लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना ‘फ्री हँड’ दिल्याचेही बोलले जात आहे. आता यात तथ्य किती आहे हे सांगणे कठीण असले तरीही दळव्यांद्वारा रविंपुढे आव्हान उभे करण्याचे प्रयत्न फोंड्यात सुरू झाले आहेत एवढे निश्चित.

Goa Third District
Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

तिसऱ्या जिल्ह्यातून फोंड्याला वगळणे हा या प्रयत्नांचाच एक भागही असू शकतो. ‘इसको मिटाना उसको बनाना इस नगरीकी रीत’ या गाण्याचे प्रात्यक्षिक सध्या फोंड्यात क्षणोक्षणी बघायला मिळत आहे. आता याचा कोणता परिणाम होतो, कसे पडसाद उमटतात याचे उत्तर मात्र काळाच्या उदरात दडले आहे एवढे निश्चित!

मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com