अग्रलेख: ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल! सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना..

Goa Opinion: पानाची पाने नकारात्मक घटना छापताना कुठे तरी चुकीच्या गोष्टींना होणाऱ्या विरोधाची बातमी, चांगल्या वर्तमानाची आशा टिकवून ठेवते. सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना, येत्या वर्षात काही तरी चांगले घडेल, याची खात्री पटते
Goa traditional housing
Goa traditional housingDainik Gomantak
Published on
Updated on

काळाच्या ओघात जेव्हा काही वाईट, अप्रिय घडत असते तेव्हा काही चांगलेही घडत असते. चांगले, वाईट हे माणूस अनुभवांवरून ठरवतो. घडलेले घडून जाते, त्यातून काय शकतो, हे महत्त्वाचे असते. ते पुढे येणाऱ्या घटनांचा मार्ग ठरवते. लहान प्रमाणातला अत्याचार, भ्रष्टाचार सहन केला, की येणारा काळ त्याहीपेक्षा मोठा अत्याचार आपल्या माथी मारत जातो. त्याचा प्रतिकार केला आपली शक्ती वाढते, प्रभाव वाढतो आणि त्याचा प्रवाह कमी होत जातो.

अपघातांचे सत्र, खुनाची मालिका, दरोड्यांची साखळी काही तरी सांगत सरकत असते. हडफड्यात अग्निकांड जिथे घडले, तिथून येणाऱ्याजाणाऱ्यांना तो क्लब उभा राहण्यात काही तरी चुकते आहे, असे कधी वाटलेच नसेल का?

निश्‍चितच वाटले. ‘मला काय त्याचे?’ या दृष्टिकोनाने २५ बळी घेतले. ‘कुणी ऐकत नाही’, ‘कुणाला काहीच पडलेले नाही’ या सबबीआड दडणे आता सोडायला हवे. हातात मोबाइल आहे, तंत्रज्ञान आहे, समाजमाध्यम आहे, त्याची मदत घेऊन जे चुकीचे घडत आहे त्याविरुद्ध आवाज उठवणे प्रत्येकास शक्य आहे.

त्याची जबाबदारी केवळ पत्रकारितेवर ढकलून लोक मोकळे होतात. नोकरशहा, अधिकारी, पंच, आमदार, मंत्री यांना घाबरून राहण्याचे दिवस आता गेले आहेत. ‘अज्ञात’ राहूनही बरेच सकारात्मक बदल समाजात घडवले जाऊ शकतात.

जमीन गोव्याबाहेरील एखाद्या व्यक्तीस विकताना, फक्त अधिक पैसा, हाच एक निकष ठेवला तर ‘गोंय गोंयकारांचे उरूंक ना’ हेसुद्धा दिल्लीवाल्या हिंदीत सांगावे लागेल. अपघात झाला की, तेवढ्यापुरती पळभर हळहळ व्यक्त करून लोक मोकळे होतात.

मानवी चुकांमुळे, नियमांचे पालन न केल्यामुळे केवळ एक जीवच जातो असे नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते, याचा विचार वाहतूक पोलिस नाही म्हणून ‘नो एन्ट्री’तून गाडी घुसवतानाही झाला पाहिजे. घर बांधायला रेती तर हवी असते, पण ती वैधतेने केलेल्या रेती उपशातून मिळावी यासाठी सरकारवर दबाव आणण्याचा कितीसा व्यापक प्रयत्न होतो?

उगव्यात झालेला गोळीबार चार दिवस चर्चिला जातो; मूळ रेती उपशाचा प्रश्‍न तसाच राहतो. रात्रीच्या बीच-पार्ट्यांमध्ये होणारी ड्रग्जची विक्री आता ग्रामीण भागांतही होऊ लागली आहे. शाळकरी पोरे लिमलेटच्या गोळ्या खाव्यात तशा ड्रग्जच्या गोळ्या खात आहेत.

वेळीच वेशीवर अडवले नाही, की ते घरापर्यंत पोहोचते ते असे! लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाखाली बसून झाल्यागेल्याचे हिशेब मांडायचे काम तटस्थतेने हाताळताना, हाती टिकून राहिलेल्यापेक्षा ओघळलेलेच जास्त असते, याची खंत काही केल्या जात नाही.

पर्यावरणाचा, स्थानिक संस्कृतीचा र्‍हास, भूमाफियांचे अतिक्रमण, तरुणांचे स्थलांतरण, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य, कायदा-सुव्यवस्था यांचा बोजवारा या सगळ्याकडे ‘झाले-गेले’ म्हणत किती दुर्लक्ष करायचे? पर्यटन हवे म्हणून वाट्टेल ती किंमत मोजून ते जवळ करावे का?

त्यातून येणाऱ्या महसुलापेक्षाही त्याचा स्थानिक जीवनमानावर, लोकसंस्कृतीवर होणारा घातक परिणाम जास्त महत्त्वाचा नाही का? जे पर्यटनाचे तेच विकासाचे. विकासाच्या नावाखाली जे ओरबाडले जात आहे, त्यातून गोवा उरेल का?

सरकारी नोकरी मिळावी म्हणून दागिने गहाण टाकून, उसने घेऊन, प्रसंगी कर्ज काढून दिलेल्या पैशांनी ती मिळाली का? या भ्रष्टाचाराच्या ‘पूजे’त फुले वाहणाऱ्या अनेकांच्या आयुष्याचे निर्माल्य झाले त्याचे काय? इतके होऊनही पुन्हा ‘कॅश फॉर जॉब’ची ऑफर आली तर किती लोक नकार देतील? मग, अशांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार तरी काय उरतो? त्याच त्याच घटना पुन्हा पुन्हा घडत राहतात; बदलते ती तारीख आणि कॅलेंडर.

हे अति होऊ लागते तेव्हा निश्‍चितच क्षीण का होईना, त्याविरुद्ध प्रतिक्रिया उमटतेच. शंभर दु:खाच्या धाग्यांमध्ये हाच तो एक सुखाचा धागा! पर्यावरणीय संवेदनशील भागांतील प्रकल्पांना विरोध होऊ लागला आहे. जंगल, नद्या व डोंगर उत्खननाविरोधात आंदोलन होत आहे.

हा जागृतीचा झरा जोवर स्वच्छ आहे, तोवर दुर्घटनांची, भ्रष्टाचाराची, अत्याचाराची, अतिक्रमणांची भीती वाटत नाही. पानाची पाने नकारात्मक घटना छापताना कुठे तरी चुकीच्या गोष्टींना होणाऱ्या विरोधाची बातमी, चांगल्या वर्तमानाची आशा टिकवून ठेवते.

Goa traditional housing
Goa Opinion: लईराई जत्रेतील चेंगराचेंगरी, नाईटक्लबमधील 25 मृत्यू; यंत्रणांच्या उत्तरदायित्वाची निश्चिती ही काळाची गरज

सरत्या वर्षाकडे मागे वळून पाहताना, येत्या वर्षात काही तरी चांगले घडेल, याची खात्री पटते. उद्या येणाऱ्या नववर्ष चांगले असेल, असे स्वत:ला समजावताना गोव्यावर नितांत प्रेम असलेल्या प्रत्येक गोमंतकीयास गालिबचा हा शेर आठवेल;

देखिए पाते हैं उश्शाक़ बुतों से क्या फ़ैज़

इक बरहमन ने कहा है कि ये साल अच्छा है

Goa traditional housing
Goa Opinion: गोव्याचा दुसरा मुक्तिलढा जमीन माफियांविरुद्धचा असेल..

उश्शाक म्हणजे प्रेम करणारे, बुत म्हणजे मूर्ती किंवा प्रेयसी; गोवा हा गोमंतकीयांचा जीव की प्राण आहे, तो टिकावा यासाठी या नववर्षात काही तरी धोरण, ठोस कृती घडेल. कृतिशील विचारवंतांना वाईट घडून गेल्याचे दु:ख नसते. जुने जे घडून गेले ते पुन्हा पुन्हा घडते याचा त्रास होतो. नवे आहे ते जुने होते, त्याबद्दल काही वाटत नाही; खंत, जे जुने आहे ते जाणते होत नाही, याची आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com