
प्रमोद प्रभुगावकर
परवा सहज म्हणून फेसबुक न्याहाळत असताना एका व्हिडिओने लक्ष वेधून घेतले. कोणा जपानी व्यक्तीनेच तो व्हिडिओ पोस्ट केला असावा. व्हिडिओत जपानमधील एका शहरांतील रस्ता होता. जोरदार पावसाने रस्त्यावर गुढघाभर पाणी साचले होते. तशाही स्थितीत वाहने पाण्यातून वाट काढत जात होती तर एक जपानी इसम हातांत काठी घेऊन ती पाण्यात एका जागी खूपसत होता.
बराच वेळ पावसांत भिजत त्याचे ते काम चालू होते.साधारण दहा एक मिनिटांनी त्याने ते काम थांबविले व खाली गुडघ्यावर बसून पाण्यात हात घालून बराच कचरा बाहेर काढला व त्यानंतर तुंबलेले पाणी ओसरू लागले व काही वेळाने सर्व पाण्याचा निचराही झाला. ज्याने ही पोस्ट केली त्याने तिच्या शेवटी जपानी व्यक्तीचे आपल्या शहराप्रति व देशाप्रति असलेले प्रेम त्यातून दिसून येते असे म्हटले आहे.
वरकरणी पाहिले तर हा एक साधासुधा प्रसंग वा घटना म्हणता येईल. पण त्या व्यक्तीने पावसात भिजत राहून आपल्या शहर वा भूमीप्रति असलेली माया, आपलेपणाच त्यातून दाखविला हे खरे. आपणाला निदान गोव्यात तरी दिवसाला असे कितीतरी अनुभव येत असतील. पण आपण त्याबाबत किती प्रतिसाद देतो याचा प्रत्येकाने विचार करावा.
गोव्यातच केवळ नव्हे तर दक्षिण भारतात सगळीकडे यंदा पावसाचे अपेक्षेपेक्षा लवकर आगमन झाले. ते साधेसुधे नव्हते तर दणक्यात झाले. आषाढात पडतो तसा पाऊस वैशाखातच पडला. परिणामी अनेक भागात पूर आले रस्ते पाण्याखाली गेले व आपण पावसाला, सरकारला, नगरपालिका वा ग्रामपंचायतींना दोष देत राहिलो. आपण या आकस्मिक आपत्तीप्रति काय करतो वा काय करायला हवे याचा विचार कोणी केला का, याचे उत्तर नकारार्थीच येईल.
केवळ पाऊसच नव्हे तर दैनंदिन जीवनात अशा अनेक बाबी दिसून येतात की एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपले कर्तव्य पार पाडण्यास कमी पडत असतो. प्रत्येकजण आपण स्वतः काय करायला हवे ते नजरेआड तर करतोच पण दुसऱ्याने काय करावे ते मात्र चटदिशी ठरवतो व सांगत असतो. वर उल्लेख केलेल्या पावसाने अनेक भागांत अनेक समस्या उद्भवल्या. त्यांतील प्रमुख म्हणजे पाणी तुंबून रस्ते पाण्याखाली जाण्याचे. हे पाणी का तुंबते याचा विचार मात्र केला जात नाही.
प्रमुख कारण म्हणजे रस्त्याकडेची गटारे वा खळ्या न उपसण्याने. नगरपालिका क्षेत्रांत असा उपसा होतो, पण ग्रामीण भागात तसा तो होत नाही. तेवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी नारळाच्या झावळ्या गटारांत फेकल्या जातात वा पडतात व त्यामुळे कचरा व पाचोळा अडकून पाणी तुंबते. पण त्या भागांतील रहिवाशाला तेथून येत जात असतानाही ते काढून टाकावे असे वाटत नाही याला काय म्हणायचे. कचरा संकलनाचेही तसेच आहे.. गोव्यात आता नगरपालिका क्षेत्रांत व ग्रामपंचायत स्तरावरही दैनंदिन कचरा संकलन केले जाते.
घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार सुका व ओला कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. पण तसा तो देण्यासही आपण कुचराई करत असतो. त्यामुळेच हे संकलन व्यवस्थित होत नाही. मुद्दा तेवढ्यावर संपत नाही तर मोठ्या प्रमाणात लोक कचरा संकलनात सहकार्य करत नाहीत व त्याऐवजी नंतर तो गुपचूप नेऊन कुठेतरी रस्त्याच्या कडेला वा निर्जन ठिकाणी नेऊन फेकत असतात.
त्यामुळे एकंदर व्यवस्थेचा बोजवाऱ्या उडत तर असतोच पण सरकार या कामावर महिन्याला कोट्यवधी खर्च करत असूनही ते वाया जात असतात. अनेक पालक मुलांना शाळेत सोडत असताना वाहनात कचरा भरलेली पिशवी नेऊन वाटेत टाकून देताना आढळतात. असे प्रकार चालू लागले तर मुलांसमोर आपण कसले आदर्श ठेवणार हा प्रश्न आहे. जे कचऱ्याचे तेच सांडपाणी व्यवस्थेचे.
गोव्यात अनेक शहरांतच केवळ नव्हे तर कोलवा, कवळे , नावेली यांसारख्या ग्रामीण भागांतही आता मलनिस्सारण व्यवस्था कार्यान्वित केली गेली आहे. पण त्याच्या जोडण्या घेण्यात स्वारस्य दाखविले जात नाही उलट रस्त्यालगतच्या गटारांत सांडपाणी सोडले जाते. त्याचे दुष्परिणाम म्हणजे अशा योजनांवर प्रचंड खर्च होऊनही त्याचा लाभ मिळत नाही. काही ठिकाणी तर लोकांचा अशा प्रकल्पांनाच विरोध असतो. खरे लोकांना अशा योजनांचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. पण प्रत्येक बाबतीत राजकारण आडवे येते हेच खरे.
देशाच्या स्वातंत्र्याचा सध्या अमृतमहोत्सव तर गोवा मुक्तीचा हीरक महोत्सव सुरू आहे. त्या निमित्त विविध उपक्रम चालतात. पण इतकी वर्षे होऊनही एक प्रगल्भ व सामाजिक भान असलेला नागरिक आपण बनू शकलो आहे का, याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. कारण कोणत्याही गोष्टीबाबत, ‘मला काय त्याचे?’ हीच भावना सर्वत्र दिसते.
गोव्यात परवा क्रांतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त डॉ. राम मनोहर लोहिया व डॉ. मिनेझीस यांनी गोमंतकीयांच्या मनांत पोर्तुगिजाविरुद्ध उठावाची बिजे कशी रोवली त्याच्या आठवणी अनेकांनी काढल्या. दरवर्षीच त्या काढल्या जातात व शपथाही घेतल्या जातात. पण त्या दिवसापुरत्याच त्या टिकतात. दुसऱ्या दिवशी सगळेच विसरतात ही आजची स्थिती आहे. शालेय नव्हे तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना क्रांतिदिनाबाबत विचारून त्यांचे उत्तर काय येते ते पाहिले तर आपण कोणत्या जगात वावरतो ते कळून येईल. हेच खरे आजचे वास्तव आहे. त्याबाबत कधी गांभीर्याने विचार होणार का, की मागील पानावरून पुढे असेच चालणार याचा विचार व्हावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.