
आज प्रत्येकाच्या जीवनात इतके ताण-तणाव भरलेले आहेत की विरंगुळ्याच्या क्षणासाठी सारेच आसुसलेले असतात. आपल्या मित्रांच्या सहवासात, निसर्गाच्या सहवासात काही वेळ घालवून हा विरंगुळा मिळवावा असे साऱ्यांनाच वाटते.
मी स्वतः गेली अनेक वर्षे हिमालयात ट्रेक आयोजित करत असतो. जेव्हा मी त्यात सहभागी झालेल्या सदस्यांकडे बोलतो, ज्या मधील अनेक जण आयटी व्यवसायिक असतात. ते दर दिवशी आपल्या कार्यालयात 16 ते 18 तास काम करत असतात.
आठ ते दहा दिवसांची हिमालयातील भ्रमंती त्यांच्यासाठी 'स्ट्रेस बस्टर' (ताण कमी करण्यात मदत करणारी क्रिया) म्हणून काम करते आणि आपले दैनंदिन काम करण्यास ते पूर्ण ताजेतवाने बनतात. अर्थात हिमालयातील ट्रेक आयोजित करत असताना आम्ही योग्य ती खबरदारी बाळगत असतो.
फक्त हिमालयातच नव्हे तर गोव्यात देखील पावसाळ्याच्या दिवसांत जंगलात किंवा एखाद्या पाणवठ्यावर जेव्हा सहल आयोजित केली जाते तेव्हा देखील खबरदारी बाळगणे अत्यंत गरजेचे असते.
वर्तमानपत्रांमध्ये आज वाचायला मिळते की गोव्यात दर चार दिवसांनी एक व्यक्ती पाण्यात बुडून आपला जीव गमावते. हे का घडते? कारण सहलीला जाणे याचा अर्थ आपण तिथे मद्यपान करावे, मस्ती करावी असाच बहुतेक जण घेतात आणि मग तशा अवस्थेत पाण्यात उतरणे होते.
त्यांच्यापैकी अनेक जणांना पोहायला येत नसते, अनेक जणांना तिथल्या पाण्याची खोली ठाऊक नसते, पाण्यात काय आहे हे ठाऊक नसते. प्रसिद्ध दूधसागर धबधब्याच्या जवळ असलेल्या पाण्यातील दगडांमध्ये पाण्याच्या दबावामुळे गुहा बनल्याचे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे ही ही जागा होण्यासाठी अत्यंत धोकादायक बनली आहे. अशाच धोकादायक जागा इतरत्रही आहेत. अशा जागांवरील पाण्यात उतरणे हे निश्चितच सुरक्षित नसते.
खरे तर अशा जागांवर मद्य प्राशन करून जाणे किंवा मद्य घेऊन जाणे यावर सरकारी खात्यांकडून कठोर बंदी आणायला हवी.
अशा घटनांमुळे ज्या संस्था जबाबदारीपूर्वक आणि शिस्तबद्धपणे अशा जागी आपले ट्रेक आदी कार्यक्रम आयोजित करत असतात त्यांचेही नाव बदनाम होते.
अशाप्रकारे बेजबाबदारीने वागून आपला जीव गमावणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असते. एक मानवी जीव हरपणे ही त्याच्या कुटुंबासाठी दुःखद घटना असतेच परंतु समाजासाठी देखील ती नुकसानदायक घटना असू शकते. त्या व्यक्तीच्या शिक्षणावर, तिच्या विकासावर समाजाकडून बरीच गुंतवणूक केली गेलेली असते. म्हणून अशा जागी आपण जबाबदारीने वर्तन केले पाहिजे.
'एडवेंचर' हे नक्कीच स्वागतार्ह आहे परंतु त्यातील जोखीम ही हिशोबी पद्धतीने घ्यायला जायला हवी. प्रत्येक 'एडवेंचर' मध्ये जोखीम ही असतेच मात्र त्या संबंधाने जागरूकताही हवी. स्वतःवर ताबा हा असायलाच हवा. गोव्यात आपण यावर बारकाईने विचार करणे गरजेचे आहे.
मनोज जोशी, युथ होस्टेल, पदाधिकारी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.