पोलिसच दारू ढोसून जीप चालवतो, मुख्‍यमंत्र्यांच्‍या वाहन ताफ्‍याकडे झेपावतो; सामान्यांचं काय?

goa traffic safety: रात्र वैऱ्याची आहे’, ही म्‍हण प्रचलित आहे, तसे ‘रस्ते झाले मृत्यूचे सोबती’, असे खेदाने म्‍हणावे लागत आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

जिथे पोलिस कर्मचारीच दारू ढोसून जीप चालवतो व मुख्‍यमंत्र्यांच्‍या वाहन ताफ्‍याकडे झेपावतो, यापेक्षा आणखी आणखी गंभीर उदाहरण ते कोणते? मुख्‍यमंत्र्यांच्‍या सतर्क चालकामुळे ‘तेव्‍हा’ अपघात टळला, पण सामान्‍यांचे काय?

रात्र वैऱ्याची आहे’, ही म्‍हण प्रचलित आहे, तसे ‘रस्ते झाले मृत्यूचे सोबती’, असे खेदाने म्‍हणावे लागत आहे. कारण, घरातून वाहन घेऊन बाहेर पडलेली आपली व्‍यक्‍ती घरी सुखरूप परतेल का, याची मनाला चुटपूट लागून राहते, अशी भीषण स्‍थिती गोव्‍यात निर्माण झाली आहे. कारण, अर्धा जून महिना कुठे संपतोय तोच गोव्यात रस्ते अपघातांनी कहर केला आहे.

१५ दिवसांत झालेले १७ मृत्यू रस्ता सुरक्षा यंत्रणेच्या मर्यादा उघड करतात. वाहनचालकांची बेफिकिरी दर्शवतात. वाहतूकमंत्र्यांच्या अपघातबळी घटल्याच्या दाव्यांना मृत्यूंची मालिका निर्दयीपणे खोटे ठरवते. मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश जण दुचाकीस्वार वा त्यांचे सहप्रवासी आहेत. जागोजागी रस्‍ते रुंद झाले तसे अपघातबळीही वाढले, याचे शल्‍य म्‍हणूनच कायम आहे.

CM Pramod Sawant
Goa Congress: काँग्रेसची बैठक झाली; पण मला निमंत्रण नाही! गिरीश यांच्याशी मतभेत नाहीत

जानेवारीपासून आतापर्यंत १२२ बळी गेलेत, जे गत वर्षीच्‍या तुलनेत ९ टक्‍के अधिक आहेत. अपघातांमुळे कित्‍येक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. पण, प्रत्येक घटनेनंतर काही दिवस चर्चा होऊन पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. तेव्‍हा एक लक्षात घ्‍यायला हवे- ‘आपला जीव आपणच जपायचा आहे’. कारण, रस्‍त्‍यांवरून चालणेही मुष्‍कील बनले आहे. कांपाल-पणजी येथे फूटपाथवरून चालणाऱ्या संगीतकार रॉड्रिग्‍ज यांचा काय दोष होता? भरधाव कारच्‍या एका धडकेने त्यांच्या आयुष्याची स्वरमैफल कायमची थांबली.

पहाटेच्‍या वेळी गोमेकॉत उपचारांसाठी रांग लावायला जाणाऱ्या फर्नांडिस दांपत्‍याला भरधाव वाहनाने ठोकरले, ते ‘ओपीडी’ऐवजी शवागारात पोहोचले. याहून दुर्दैवाची पराकाष्ठा ती कोणती?

पेडणेत वैद्यकीय उपचारांसाठी जाऊन माघारी साळ येथे घरी परतणाऱ्या राऊत दांपत्‍याची झालेली अखेर तर अंगावर शहारा आणणारी! चूक कुणाची..? अशा असंख्‍य दुर्घटनांची उत्तरे कागदपत्रे रंगवून दिली जातात, ज्‍यात काही ‘राम’ नसतो. प्रश्‍‍न आहे, अपघात थांबवायचे कसे? उत्तरे आपल्‍यालाच शोधावी लागतील.

राज्‍यात अनेक भागांत ‘फॉल्‍टी रोड इंजिनिअरिंग आहे’, असे तज्‍ज्ञ ओरडून सांगत आहेत. त्‍याकडे कुणीही पाहात नाही. राज्‍य सरकार ‘ब्‍लॅक स्‍पॉट’ दूर करण्‍यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी मिळवते. परंतु रस्‍ते सुरक्षिततेसाठी काय उपाय योजले, याची सपक आकडेवारीसह माहिती कधी दिली जात नाही. निधी खर्च होतो; पण अपघातांची कारणे, बळींची संख्या पाहिल्‍यास उपाययोजनांचा परिणाम नेमका कुठे दिसतो?

CM Pramod Sawant
Goa Crime News: 'ती' अवघ्या 15 वर्षांची! बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आलं भयानक सत्य, उत्तर प्रदेशच्या तरूणाला बेड्या

राज्‍यात वाहनांची संख्‍या १७ लाखांवर आहे, ज्‍यात पर्यटक वाहने लाखभर असतात. रस्‍त्‍यांवर वाहनांची घनता कमालीची वाढली आहे. अंतर्गत रस्‍त्‍यांपासून महामार्गावरही वाहनांची गर्दी होते, ज्‍यामुळे अपघातांची शक्‍यता कित्‍येक पटीने वाढते. हे स्‍थित्‍यंतर गोव्‍यासाठी नवीन नसले तरी वाहनचालक त्‍याला सामोरे जाण्‍यासाठी अद्याप सरावलेले नाहीत, हेच वारंवार सिद्ध होत आहे. दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात होतो, याहून भायावह काय स्‍थिती असावी? गर्दीतून संयम बाळगून वाहन चालवण्‍याचे भान आपण विसरलो आहोत.

वाहतूक परवान्‍यांच्‍या सहज उपलब्‍धीवर सरकार अद्याप गंभीर नाही. दारुड्या चालकांवर कुणाचे नियंत्रण नाही, कायद्याचा धाक नावालाही नाही. जिथे पोलिस कर्मचारीच दारू ढोसून जीप चालवतो व मुख्‍यमंत्र्यांच्‍या वाहन ताफ्‍याकडे झेपावतो, यापेक्षा आणखी आणखी गंभीर उदाहरण ते कोणते? खरे तर सरकारला शरम वाटायला हवी. मुख्‍यमंत्र्यांच्‍या सतर्क चालकामुळे ‘तेव्‍हा’ अपघात टळला, पण सामान्‍यांचे काय? असे कितीतरी मद्यपी चालक रोज बिनबोभाट रस्‍ते मापत जातात.

त्‍यांना कोण धडा शिकवणार? सरकारने अपघात कमी झाल्‍याच्‍या वाफा दवडण्‍यापेक्षा वाहतूक सुरक्षा जागृती मोहिमेवर भर द्यावा, जिथे-जिथे वाहतूक नियमांचे उल्‍लंघन होते, तेथे कठोर दंड ठोठवावा. ‘ए-आय कॅमेरे’ बेशिस्‍त वाहतुकीला लगाम ठरू शकतील; पण ते कार्यान्‍वित होतील तेव्‍हाच. कायद्याचा धाक व स्‍वयंप्रेरणेशिवाय आता तरणोपाय नाही. जीव आपला आहे.

वाहन शिस्तीतच चालवावे, शिवाय क्षणोक्षणी लक्षात ठेवा- आपली चूक नसतानाही समोरून येणाऱ्या वाहनचालकाची बेफिकिरी आपला घात करू शकते. प्रत्येक प्रवासामागे घरी सुखरूप परतण्याची आशा असते. कोणीतरी आपल्या सुरक्षित परतीची वाट पाहत असते. रस्त्यावरची एक क्षणिक बेफिकिरी एखाद्या घरातील दिवा कायमचा विझवू शकते, हे वास्तव प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची वेळ आता निघून गेली आहे; ती कृतीत उतरवण्याची वेळ आली आहे.

रस्त्यावरील प्रत्येक निर्णय हा वाहन चालविण्यापुरता नाही. तो स्वतःच्या, इतरांच्या जीविताच्या जबाबदारीचा असतो. सरकार, प्रशासन व नागरिकांनी मिळून ही जबाबदारी स्वीकारली तरच रस्ते हे मृत्यूचे सोबती न राहता सुरक्षित प्रवासाचे माध्यम बनू शकतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com