

इन्स्टाग्रामवर स्कोल करता करता ज्या विचित्र गोष्टी आपले लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात त्यातच एकदा गोवातील मोठी घरे, व्हिलाज वगैरे विकणाऱ्या एका ब्रोकर महिलेचं रील नेमके माझ्या फोनवर आले. त्यात ती गोव्यात घर घेऊ इच्छिणाऱ्या संभाव्य ग्राहकांना इथल्या रियल इस्टेट मार्केटची गणिते समजावून सांगत होती. ती म्हणाली ‘उत्तर गोवा की दक्षिण गोवा’, हा विचार करणे बंद करा. खरा फरक किनारपट्टी विरुद्ध अंतर्गत भाग असा आहे.
किनारपट्टी पर्यटकांसाठी आहे; तर अंतर्गत भागात ‘खरी माणसे’ राहतात.‘ वरवर पाहता हा एक निव्वळ व्यावहारिक सल्ला वाटू शकतो, पण तिच्या नकळत ती गोव्याचे एक चित्र गोव्यात जमिनी व घरे विकत घेऊ पाहणाऱ्यांची बनवत होती. तिचा अविर्भाव असा होता की, जणू काही गोव्याविषयी सर्व ज्ञान ती कोळून प्यायली आहे.
गोव्यात झपाट्याने रियल इस्टेटची खरेदीविक्री जोर घेत आहे आणि त्यामुळे होणारे भौगोलिक, सांस्कृतिक बदल आणि त्यांचे परिणाम आपण ह्याची देही ह्याची डोळा पाहत आहोत. पण त्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे गोव्याविषयी बोलण्यात, सामाजिक चर्चाविश्वात गोव्याची प्रतिमा बनवण्यात आता गोमंतकीय अग्रेसर नसून हे गोवा विकणारे दलाल पुढाकार घेत आहेत. एकेकाळी बोरकरांच्या कवितेतून, मारियो मिरांडांच्या व्यंगचित्रातून, मारिया कुटो किंवा पुंडलिक नाईकांच्या साहित्यातून गोव्याची प्रतिमा बनत होती. आता ती जागा इन्स्टाग्रामवर ह्या दलालांनी घेतली आहे.
गोव्याविषयी बरीच चुकीची माहिती हे लोक निर्धास्तपणे आपल्या रील्समधून सांगत असतात. तर आता ह्या ब्रोकरच्या मते अंतर्गत गोवा म्हणजे काय - तर आल्दोना (हळदोणे नाही), मोयरा (मयडे नाही), नाचिनोला (नास्नोडा नाही) हे गांव. म्हणजे ह्यांचा अंतर्गत गोवाही बार्देसपलिकडे नाही. भारतीय महानगरांतील लब्धप्रतिष्ठित वर्ग आता गोव्यातल्या ह्या गांवामध्ये राहतो. इथल्या सुपरमार्केट्समध्ये असे जिन्नस मिळतात जे आमच्या तीन पिढ्यांत कुणी ऐकले किंवा पाहिले नसतील.
किनारपट्टी भाग हा उथळ पर्यटकांसाठी तर बार्देसमधील ही गावे आता गर्भश्रीमंत भारतीयांसाठी राहण्यास उपयुक्त आहेत, असाच तिचा मतितार्थ असावा. ह्या सर्व प्रकियेतून गोव्याचा एक नवीन सांस्कृतिक भूगोल हे लोक तयार करत आहेत.
त्यात गोव्यात राहणाऱ्या लोकांचे स्थान नगण्य आहे. गोव्याच्या ह्या नकाशात केवळ गोव्याबाहेरचे लोक कुठे राहतात, त्यांना त्यांचा दुसरा बंगला कुठे घ्यायचा आहे, ते कुठल्या कॅफेत न्याहारी करतात, कुठल्या म्यूझियममध्ये जाऊन कलेचा आस्वाद घेतात आणि रात्री कुठल्या ताव्हेर्नात जाऊन पाचशे रुपयाची फेणी पितात इतक्यापुरता मर्यादित आहे. ह्या वर्गाला सामान्य गोव्याशी काहीही घेणेदेणे नाही.
गोव्यातले प्रश्न, इथल्या लोकांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांच्या महत्वाकांक्षा ह्या सगळ्याकडे हा वर्गच कमालीचा अनभिज्ञ आहे आणि तो तसेच राहणे पसंत करतो. कारण तो इथे चिल करायला आला आहे! ते राहत असलेली शहरे काँक्रीटची जंगले बनली म्हणून ते गोव्यात येऊन प्रशस्त फ्लॅट आणि बंगले विकत घेतात. गोव्याचे काँक्रीट जंगल होते आहे ह्याविषयी त्यांना काहीच पडलेले नाही.
आता ह्या लोकांचा उपद्रव आधीच कमी का होता म्हणून गोव्याची प्रतिमा बनवण्याचा, तिला आकार देण्याचा ठेकाही आता ह्या लोकांच्या हातात जाणे चिंताजनक आहे. हे लोक एका अशक्य फॅंटसीच्या शोधात गोव्यात येतात. गावात राहण्यात त्यांना एका प्रकारचे थ्रील वाटते. पण गावात राहणे म्हणजे केवळ एक जमीन अडवून त्यावर घर बांधून राहण्याएवढे ते सोपे असते का? गोव्यातील गावचेच उदाहरण घ्या.
गावात राहणे म्हणजे कोणाच्या घरी लग्न, बारसं, मरण किंवा देऊळ चर्चमधील सण, अजूनही नावावर न झालेली मुंडकारी जमीन, घर दुरुस्ती करायला परवानगी नाकारणारा भाटकार, एकमेकांना खेटून उभी असलेली घरे, एकाने गाडी पार्क करून दुसऱ्याची अडवलेले पायवाट अशा प्रश्नांना गोव्यातील ग्रामस्थांना तोंड द्यावे लागते.
आपल्या इथल्या पिढ्यान्पिढ्यांच्या जगण्याचे वास्तवाचे रूपांतर ह्या रियल इस्टेट मार्केटमध्ये अस्सलतेचे लेबल लावून खरेदी-विक्रीच्या बाजारात मांडले जात आहे आणि सामान्य गोमंतकीयाला ह्याविषयी मागमूसही नाही कारण जी वर्तमानपत्रे, चॅनल्स आपण बघतो आणि वाचतो तिथे ह्या चर्चा होत नाहीत. ह्या चर्चांचे व्यासपीठही आपल्यापासून कोसो दूर आहे, पण त्याने निर्माण होणार धोका हा आपल्या उंबरठ्याशी येऊन ठेपला आहे. सर्वण-कारापूर येथे जे येऊ घातले आहे, ते त्याचेच द्योतक आहे. गोव्याची पावणी सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.